रोजची पहाट या प्रसिद्ध दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट, श्री सूर्याजीराव रवीसांडे आपल्या दाढीचे खुंट खाजवत अत्यंत खिन्न मुद्रेने बसले होते. दर आठवड्याला एक विशेषांक ही रोजची पहाट ची खासियत आणि त्यातूनही गुढीपाडव्याचा विशेषांक हा तर खूप मानाचा.धूम धडाक्यात काढायचा त्यांचा शिरस्ता. परंतु ही त्यांची मक्तेदारी ज्यांच्या जीवावर चालायची, ते त्यांचे मुख्य वार्ताहर आणि मुलाखत तज्ञ – काका सरधोपट गेले चार दिवस झाले अजून फिरकले नव्हते. आपली विशेषांकाची परंपरा खंडित होतेय की काय या विवंचनेने सूर्याजी रावांच्या काळजाचा ठोका चुकत होता.
हे काका एक अवलिया पत्रकार. दिवसाला चार चार मुलाखती चुटक सरशी उडवणे हा त्यांच्या डाव्या हाताचा मळ होता. चार दोन मुख्य प्रश्न विचारायचे आणि बाकीचे मुलाखती तर भरमसाठ पण चटकदार मजकुराने भरायची यात त्यांचा हातखंडा. ते कोणाची आणि कशी मुलाखत घेतील हे ब्रह्मदेवाच्या बापालाही कळणे कठीण. त्यांनी एकदा एक रात्र एका बेवारशी कुत्र्यांच्या टोळीत काढून एका पिसाळलेल्या कुत्र्याची घेतलेली मुलाखत फारच गाजली. ती ह्रदयद्रावक मुलाखत वाचून प्राणीमित्र संघटनेने त्या पिसाळलेल्या कुत्र्यालाच आपल्या अध्यक्षपदी बसवले. असो. सांगायचा मुद्दा, अशा या अवलियाने कुठे दडी मारली या विचाराने सूर्याजी रावांचा सूर्य पहाट होऊनही मावळल्यासारखा वाटत होता. तेवढ्यात काका आले.
काय काका? अहो आहात कुठे? पाडवा उंबरठ्यावर आला. अजून खास मुलाखतीचा पत्ता नाही? सूर्याजींचा सूर्य मध्यानीच्या सूर्यासारखा तापला.
साहेब, गेली बारा वर्षे झाली. मी पगार वाढ अल्पविराम बोनस साठी ठणाणा करतोय. प्रत्येक दिवाळीचा वायदा करता. आता काहीतरी ठोसा मिळाल्याशिवाय मी एकही मुलाखत घेणार नाही मी आता ज्येष्ठ नागरिक आहे याचा थोडा विचार करा.
काका, त्या नगर पालिका सफाई कामगारांच्या नेत्या सारखा पावसाळा आला की संप करून लोकांना नाक दाबायला लावून आपली मागणी मान्य करून घेण्याचा प्रयत्न करू नका.
छे, छे, साहेब, त्यापेक्षाही जालीम उपाय आहे माझ्याकडे.
म्हणजे?
साहेब, मी अशी एक मुलाखत घेणार आहे की, तशी यापूर्वी कोणी कधी घेतली नसेल.ती प्रसिद्ध होताच रोजची पहाटचा विशेषांक फटाके फुटल्यासारखा खपेल.
काय सांगता? मग वाट कसली पाहताय? चला लागा कामाला.
साहेब आधी पगारवाढ, बोनस, मग काम.
काका, एवढा अंक निघू द्या, मग पाहू.
ठीक आहे, जशी तुमची मर्जी.नसेल जमत तर हा माझा राजीनामा. दैनिक कर्दनकाळ कडून मला दुप्पट पगाराची मागणी आहे. येतो मी.
अहो थांबा, थांबा. काका हे काय करताय?
सूर्याच्या रागाचा पारा गॅसच्या फुग्याला टाचणी लागावी तसा फुस्स झाला.
काका, हे पहा मी आत्ताच तुमचा पगार दुप्पट करतो, बोनसही देतो, मग तर झाले?
आता ठीक झाले. साहेब मुंबई महापालिकेने मुंबईच्या समस्यांवर तोडगा काढून त्यावर एक योजना तयार केली आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त पी. चंद्रा यांनी मला आज मुलाखतीला बोलावले आहे. या खटपटीत होतो म्हणून तर चार दिवस आलो नाही. मग काय मुलाखतीला जाऊ की, कर्दनकाळांना भेटू?
सुर्याजी रावांनी तात्काळ काकांच्या पगारवाढीचा आणि बोनस आदेश काढला. पगार आणि बोनस पदरात पाडून काकांनी आयुक्तांचे कार्यालय गाठले.
दारावर पी. चंद्रांचा शिपाई गुटखा चघळत बसला होता.काकांनी त्याची मूठ दाबताच त्याने पी. चंद्रांच्या केबिनची मूठ फिरवली. दरवाजा उघडला.
मी येऊ का आत?
या या काका, अगदी वेळेवर आलात , काय घेणार?
तूर्तास मुलाखत घेईन.
वा काका, शब्दात पकडलेत, हं, विचारा प्रश्न.
साहेब, मुंबईच्या विकासासाठी काही ठोस उपाय योजना आखली आहे असे ऐकतो. खरे आहे?
काका, खरे आहे ते. ही योजना वार्ताहर परिषद घेऊनच जाहीर करायला हवी. अशी कोणा एका वर्तमानपत्रात देणे योग्य नाही.
मग साहेब, तशी परिषद का नाही घेत?
काका मी लवकरच निवृत्त होत आहे. आमचा महापौरांना ही योजना एवढ्यात जाहीर करायची नाही. पुढच्या निवडणूक पूर्वी, म्हणजे अजून एका वर्षाने जाहीर करावी असे त्यांना वाटते.
मग ठीकच आहे की, एवढी घाई कशाला?
काका, या योजनेची मूळ कल्पना माझी. मी निवृत्त झाल्यावर त्याचे श्रेय इतरांनी उपटावे हे मला पसंत नाही. त्यामुळे ही खास मुलाखत तुम्हाला द्यायचे मी ठरवले. धडाक्यात छापा. महापौरांना कर उद्या काय ठणाणा करायचा तो.
ठीक आहे, आपल्याला हरकत नसेल तर आम्हाला कसली हरकत? अगदी धूम धडाक्यात छापू. काय आहे आपली योजना? तिचे काही नामकरण झाले आहे का?
हो आहे तर. तिचे नाव आहे मुंबईची का. क. योजना.
काक योजना? म्हणजे कावळा योजना? हे असे कसे विचित्र नाव?
छे,छे, अहो ते काक नव्हे. ते का. क. असे आहे. त्याचा दीर्घ मथळा मुंबईची, काहीतरी करू योजना.
काका, आज पर्यंत मुंबई बाबत अनेकांनी अनेक योजना सुचवल्या. माजी मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईचे कॅलिफोर्निया करू, आजी मु. मं म्हणतात, मुंबईचे सिंगापूर करू.माजी पंतप्रधान म्हणाले मुंबईचे न्यूयॉर्क करू, आजी पंतप्रधान म्हणतात मुंबईचे शांघाय करू. माजी राष्ट्रपती म्हणाले, मुंबईचे लंडन करू, आजी रा.प. म्हणतात मुंबईचे व्हेनिस करू. प्रत्येक महनीय व्यक्ती मुंबईचे काहीतरी करू असे म्हणते. त्यामुळेच या योजनेचे नाव मी मुंबईची काहीतरी करू योजना असे ठेवले.
वा. अत्यंत समर्पक. यामुळे मुंबईचे काहीतरी करायला प्रत्येकालाच भरपूर वाव मिळणार असे दिसते.
होय काका, या नावापासूनच माझ्या या योजनेतील सहभागाला सुरुवात होते. विद्यमान प्रशासन आणि भविष्यकाळातील प्रशासन या सर्वांना या योजनेअंतर्गत काहीतरी करून दाखविण्याची सोय आहे. शिवाय या महानगरात भेट देणाऱ्या प्रत्येक देशी-विदेशी महान व्यक्तींना, गोरगरिबांना, स्थानिकांना, परप्रांतीयांना, प्रत्येकालाच काहीतरी करायला वाव आहे. पी. चंद्र योजना म्हणून ही योजना अजरामर होईल.
या पी. चंद्र योजनेची माहिती सांगता का?
या योजनेत मघाशीच सांगितल्याप्रमाणे सर्व लहान थोर व्यक्तींनी सुचविलेल्या कल्पनांचा समावेश तर असेलच शिवाय मुंबईच्या स्वतःच्याच काही खास समस्या आहेत त्याही विचारात घेतल्या आहेत.
काय आहेत या खास समस्या?
काका, रस्ते, त्यावरचे खड्डे , जगात कुठे नसतील असे पदपथ नावाचे अद्भुत प्रकरण, लोकल गाड्या, तुंबणारी गटारे, रस्त्यावरच्या नद्या, नाले, पूर, प्रचंड झोपडपट्ट्या, भटकी कुत्री, जनावरे, पंचतारांकित हॉटेल, भिकारडे धाबे, अति श्रीमंत वस्त्या, गलिच्छ वस्त्या, ट्राफिक जाम, कानफाटे आवाज, अशा एक ना अनेक, ज्या हातात हात घालून या शहराचे वैशिष्ट्य वाढवतात त्यांची जपणूक करणे, ज्याला हेरिटेज म्हणतात. ती सगळी जपली जातील.
साहेब ही वैशिष्ट्ये की लाज आणणाऱ्या गोष्टी ?
काका हीच तर खरी मुंबई ची खासियत. अहो, चकाचक रस्ते, आखीवरेखीव वस्त्या, शिस्तबद्ध लोक, प्रदूषण विरहित परिसर, शांतता हे तर काय जगातल्या सर्व सुधारित शहरात पाहायला मिळतेच. आपणही तेच केले तर आपले वैशिष्ट्य काय ? सब भूमी गोपाल की म्हणत रस्त्याचे उकिरडे, भिंतींच्या पिकदाण्या अशी आपली थोर परंपरा काय विसरायची? भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. त्या महासत्तेचा आदर्श जगासमोर उभा करायचा तर या परंपरा जतन करायला नको.
साहेब मला तर काही समजले नाही. आपण ही आदर्श योजना जरा समजावता का?
काका योजना तशी भव्यदिव्य आहे. जो सुचवेल त्याला काहीतरी करायला वाव असल्यामुळे ही एक अक्षय योजना आहे.तिच्यात वेळोवेळी तज्ञांच्या सूचनांनुसार बदल, फेरफार करण्याचा लवचिकपणा ठेवला असल्याने आज तिचे जे स्वरूप दिसते ते भविष्यात काय आकार घेईल त्याची कल्पना आपणास करू शकणार नाही. नमुन्यादाखल काही प्रस्ताव सांगतो. संपूर्ण योजना नंतर महापौर सांगतीलच.
फार छान. सांगा साहेब .
काका, मुंबईत बसगाड्यांसाठी थांबे आहेत. तुम्हाला माहित आहेच की मुंबईचे नागरिक या थांब्यांचा उपयोग करीत नाहीत. थांब्यांच्या बाहेरच रांगा लावतात. बस आल्यावर ही झुंबड उडते तेव्हा रांगेतला शेवटचा प्रवासी प्रथम चढतो आणि पहिला प्रवासी जागेवरच राहतो, अशी गंमत असते. यावर मी एक सुंदर तोडगा या योजनेत सुचविला आहे.
वा, काय आहे तो तोडगा?
काका, आमच्या सर्व्हेमध्ये असे सापडले की या थांब्यांचा उपयोग गोरगरीब, भिकारी कुटुंबे आपले संसार थाटण्यासाठी करतात. जागतिक मानवाधिकार संघटनेच्या तत्त्वांनुसार अशा बेघरांची गरज भागविण्याची मुं.का.क. योजनेतून आम्ही अशा थांब्यांची संख्या हजारोंनी वाढविणार आहोत. अशा बेघरांची आश्रयस्थाने असतील. त्यांना जागेवरच त्यांचा धंदा, जसे की, भीक मागणे, खिसे कापणे, चोऱ्या करणे, गिऱ्हाईक गटवणे इत्यादी करता येतील. शिवाय असे थांबे दुमजली, तिमजली करण्याचीही तरतूद करण्याची कल्पना आहे.
वा फारच अफलातून.
काका, तसेच मुंबईचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इथले पदपथ. मुं.का.क.योजनेच्या आखणीसाठी जागतिक बँकेचे तज्ञ आले होते. मुंबईच्या पदपथांचा अजब व्यापारी उपयोग पाहून त्यांनी तोंडात बोट घातलं.
काय सांगता?
खरंच काका. शिवाय हे लोकोपयोगी फूटपाथ हा जागतिक वारसा म्हणून जतन करावा आणि या पदपथांच्या वाढत्या व्यापारीकरणासाठी असे पदपथही दुमजली, तिमजली करून रस्त्याच्या मधून जे उड्डाणपूल होत आहेत त्यांना दर पन्नास फुटांवर जोडावेत म्हणजे उड्डाण मार्गावरून जाणाऱ्यांसाठी पदपथावरच्या फेरीवाल्यांची सुविधा उपलब्ध होईल.शिवाय हा पदपथ व्यवसाय दुपटीने तिपटीने वाढून महापालिका, वाहतूक पोलीस , आर.टी.ओ. वगैरेंचे उत्पन्नही चांगले वाढेल अल्पविराम असा बहुउद्देशही साधला जाईल.
साहेब, या दुमजली , तिमजली पदपथांमुळे पदपथांचा बाजूच्या इमारतीमधल्या दुकानांची आणि वर राहणाऱ्यांची हवा, उजेड, बंद होईल त्याचे काय? शिवाय आवाजाने त्यांना कायमचे बहिरेपण आले तर?
काका, हे पदपथ इमारतीच्या गॅलरी प्रमाणे उघडे असतील त्यामुळे हवा आणि उजेडाचा प्रश्न उद्भवणार नाही. शिवाय त्यांना पावसा पाण्यापासून संरक्षण मिळेल. शिवाय या पदपथावरील फेरीवाल्यांना त्यांनी सामान ठेवायला जागा दिली तर वाढीव उत्पन्नाचे एक साधन होईल. आवाजाचे म्हणाल तर आम्ही सर्व्हे केला तेव्हा असे आढळून आले की, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना या आवाजाची इतकी सवय झालेली असते की, गावाकडे गेल्यावर तिथल्या शांततेनेच ते वेडे होतात आणि दोन दिवसातच परत येतात.
वा साहेब आपण फारच खोलात शिरून या योजनेची आखणी केलेली दिसते. शिवाय या योजनेने मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा, त्यांच्या राहण्याचा आणि व्यवसायाचा प्रश्नही चांगलाच सुटेल. पावसाळ्यात तुंबणारी गटारे, रस्त्यांवर येणारे पूर यासाठीही आपल्या काही योजना आहेत का?
आहेत ना. ती तर आमची स्टार योजना आहे. तिला आम्ही व्हेडॅम योजना असे नाव दिले आहे.
वेडॅम? हे कसले नाव?
वेडॅम नाही हो, व्हेडॅम, व्हेडॅम. म्हणजे व्हेनिस आणि ॲम्स्टरडॅम या दोघांचे मिळून व्हेडॅम. ही दोन्ही शहरे त्यांच्या कालव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांच्या होणाऱ्या नद्या पाहून मला ही योजना स्फुरली. समुद्राला भरती आली आणि तेव्हाच पाऊस आला तर मुंबईत पाणी तुंबते. समुद्राचे पाणीच बारमाही रस्त्यांवर आणून या रस्त्यांचे कालव्यांचे जाळे करून त्याचा उपयोग जलवाहतुकीसाठी करायचा, अशी ही अद्भुत योजना आहे.
साहेब, योजना तर चांगलीच आहे. पण अशा या कालव्यांमुळे तळमजले जलमय होतील त्याचे काय?
काका, त्यासाठी सध्याच्या इमारतींच्या ज्योताची उंची ही पूरनियंत्रण रेषा न ठेवता ती पहिल्या मजल्याच्या उंची इतकी ठेवणार आहात. त्यामुळे पुरामुळे होणारी नुकसान भरपाई देणे टाळता येईल. शिवाय त्याच इमारतींवर एक मजला वाढविण्याची सूटही मिळेल. हा सगळा खर्च जागतिक बँक देणार आहे. या योजनेमुळे मुंबईचे व्हेनिस, ॲम्स्टरडॅम होईल आणि परदेशी पर्यटकांसाठी ते एक आकर्षण ठरेल.
वा फारच छान, साहेब, इतक्या छान छान कल्पना आपल्याला कशा सुचतात?
काका, जागतिक बँकेचे आणि युनोचे तज्ञ मुंबई ची समस्या समजावून घेण्यासाठी आले होते. त्यांच्या चर्चेतून मला या कल्पना सुचल्या. आमचे महापौर म्हणत होते की, त्यांची थट्टा मस्करी चालली होती. पण आमच्या महापौरांना खरं म्हणजे त्यांचं इंग्रजी कळत नव्हतं. मी मात्र ते मुद्दे अचूकपणे उचलले. त्यांच्या चर्चेतून आपल्याला काय हवे ते घ्यायची कुवत हवी ना?
होय साहेब, आपल्या हुशारीची दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. साहेब रस्त्यांवरचे खड्डे, झोपड्या इत्यादी बऱ्याच समस्यांचा, खरेतर वैशिष्ठ्यांचा आपण उल्लेख केलात. त्यांच्यावर काय तोडगे आहेत या मुं.का.क. योजनेत?
हो, आहेत तर. रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी चांद्रयान योजना, झोपडपट्ट्यांसाठी जमिनीखाली आणि जमिनीवर शंभर शंभर मजली इमारती, भटक्या कुत्र्यांसाठी रॅबीएटर मॅरेथॉन स्पर्धा अशा अनेक योजना आहेत. पण मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे मी फक्त काही नमुने दाखल योजना सांगेन असे म्हणालो होतो. त्या सांगितल्या. आता सविस्तर योजना माननीय महापौर पत्रकार परिषदेत सांगतीलच. आज एवढे पुरे.
वा पी. चंद्र साहेब खरोखरच ही मुं.का.क. योजना फारच अफलातून आहे. भटक्या कुत्र्यांसाठी रॅबीएटर स्पर्धा योजना हे काहीतरी वेगळेच दिसते. तेवढे जरा सांगाल का?
काका, जादा हुशारी करू नका. तुम्ही तर हळूहळू सगळी योजनाच पदरात पाडून घ्यायचा विचार करताय. असो. तूर्तास एवढेच सांगतो की, या समस्येवर फार उपयुक्त तोडगा आहे. पण त्यात काही आंतरराष्ट्रीय कायदे समस्या आहेत. त्यावर युनोत विचार विनिमय चालू आहे. लवकरच ही समस्या ही सुटेल.
धन्यवाद साहेब, आपल्यासारख्या आयुक्त मुंबईला मिळाले हे मुंबईचे भाग्यच. मुंबईची कीर्ती अखंड जगातच नव्हे तर चांद्रयान योजनेसारख्या योजनेतून थेट अंतराळातच आपण पोहोचवणार यात काही शंका दिसत नाही. ही क्रांतीकारी योजना आपण थोडक्यात आमच्या रोजची पहाट च्या वाचकांसाठी सांगितलीत या बद्दल धन्यवाद.
मुलाखत रोजची पहाट मध्ये प्रसिद्ध झाली आणि सुनामी ने दिला नाही असा तडाखा वृत्तपत्र व्यवसायाला मिळाला. रोजची पहाट च्या आवृत्त्यांवर आवृत्त्या खपल्या. दै. कर्दनकाळ ते संपादक आणि इतर सर्व दैनिकाचे संपादक पी. चंद्रांवर चांगलेच संतापले. कर्दनकाळच्या नेतृत्वाखाली त्यांनी पी. चंद्रांच्या कार्यालयावर मोर्चाच नेला.
त्यांचे स्वागत नवे आयुक्त टी. चंद्रा यांनी केले. त्यांनी खुलासा केला की पी. चंद्रांनी दिलेली मुलाखत ही अनधिकृत होती. त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांची योजना दप्तरात गुंडाळून फळीवर म्हणजे शेल्फ केली आहे. पुढच्या पावसात ती रस्त्यावर येणाऱ्या पुराच्या पाण्यात सोडून देण्यात येईल.
ते ठीक आहे साहेब, दैनिक रोजची पहाटचे काय करणार? कर्दनकाळ यांनी विचारले.
त्यासाठी तुम्ही उद्याचा रोजची पहाट पहा.
दुसऱ्या दिवशी दैनिक रोजची पहाट मध्ये खुलासा प्रसिद्ध झाला.
दैनिक रोजची पहाट च्या नववर्ष विशेषांकात मुं.का.क. योजना हा आलेला लेख आमच्या नववर्ष हास्य विशेषांकातील एक भाग होता. त्याच्याखाली ही हास्य कथा आहे अशी टिपणी चुकून छापली गेली नाही. क्षमस्व.
संपादक, रोजची पहाट.
— विनायक रामचंद्र अत्रे
ठाणे
Leave a Reply