मराठीतील प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म २३ मे १८९६ रोजी अमरावती येथे झाला.
मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे.
केशवराव भोळे १९२६ साली पुण्यात आले. गायक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या भोळ्यांनी गाण्यांना चाली बांधणेही आरंभले. १९३१ सालाच्या सुमारास मराठीत बोलपटांचे प्रमाण जसजसे वाढू लागले, तसतसे प्रसंगाच्या मांडणीस व पात्ररचनेस सुसंगत व उठावदार संगीत देण्याचे प्रयोग होऊ लागले. भोळ्यांनी त्या दृष्टीने सांगीतिक प्रयोग करून पाहिले. पार्श्वगायनाचा पहिला प्रयोग त्यांनी ‘कृष्णावतार’ या चित्रपटामध्ये केला. प्रभात फिल्म कंपनीमध्ये असताना त्यांनी ‘अमृतमंथन’, ‘माझा मुलगा’, ‘संत तुकाराम’, ‘कुंकू’ इत्यादी चित्रपटांना संगीत दिले.
१९३२ साली त्यांचे दुर्गा केळेकरांशी लग्न झाले. लग्नानंतर त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या. केशवराव भोळे यांनी १९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर, के.नारायण काळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनी भूमिका केल्या होत्या. नायिका-बिंबाच्या भूमिकेत ज्योत्स्ना भोळे होत्या. ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्ना भोळे त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या.
‘एकलव्य’ ह्या टोपणानावाने केशवराव भोळे ह्यांनी वसुंधरा ह्या साप्ताहिकात लिहिलेले अभिजात गायक-गायिकांविषयीचे अनेक लेख त्यांच्या रमणीय शैलीमुळे आणि माहितगारीमुळे विख्यात झाले. तेच लेख पुढे आजचे प्रसिद्ध गायक (१९३३) ह्या पुस्तकात संग्रहीत करण्यात आले. ह्या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती म्हणजे संगीताचे मानकरी (१९४९) होय.
त्यांनी नंतर ‘शुद्धसारंग’ ह्याही टोपणनावाने लेख लिहिले. त्यांत त्याची चिकित्सावृत्ती, परखडपणा, बोचरेपणा इ. विशेष दिसून येतात. आवाजाची दुनिया (१९४८), अस्ताई (१९६२), वसंतकाकाची पत्रे (१९६४), माझे संगीत (१९६४), अंतरा (१९६७) आणि जे आठवते ते (१९७४) हे आत्मचरित्र ही त्यांची ग्रंथसंपदा.
केशवराव भोळे यांचे ९ नोव्हेंबर १९७७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply