पंडित भास्कर चंदावरकर यांचा जन्म १६ मार्च १९३६ रोजी पुणे येथे झाला. त्यांच्या मावशी सीता माविनकुर्वे या गायिका होत्या, त्या पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या शिष्या होत्या. चंदावरकर हे बालपणापासून पुण्यातील सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यासारख्या संगीतप्रेमीच्या सहवासात आल्यामुळे चंदावरकर यांच्या संगीतप्रेमास प्रोत्साहन मिळाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण वाडिया महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यलय येथे झाले. भास्कर चंदावरकर यांनी पं. रविशंकर आणि पं. उमाशंकर मिश्र यांच्याकडून सतारीचे शिक्षण घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी परदेशी संगीताचे पद्धतशीरपणे शिक्षण घेतले. फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया मध्ये त्यांनी १९६५ ते १९८० पर्यंत संगीताचे प्राध्यापक म्ह्णून काम केले. त्याचप्रमाणे अह्मदाबादची नॅशनल इस्न्टिट्यूट ऑफ डिझाइन, पंजाब-हरियाणा विद्यापीठ, दिल्लीचे जवाहरलाल विद्यापीठ, बंगलोर येथील मॅनेजमेट इन्स्टिटयूट या संस्थांमध्ये त्यांनी अतिथी प्राध्यापक म्ह्णून काम केले. अमेरिकेतही अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, भारतीय संगीत शिकवणे असे विविध प्रकारचे संगीतविषयक कार्यही त्यांनी केले.
भास्कर चंदावरकर यांनी १९६२ ते १९७८ आणि १९८५-८६ या दरम्यान भारतात आणि युरोपियन देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंडमध्ये सतारवादनाच्या अनेक मैफली केल्या. १९९२ ते १९९९ या काळात पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, जपान अशा विविध देशात कलाविषयक सल्लागार म्ह्णून काम केले. संगीतकार म्ह्णून त्यांची कामगिरी महत्वाची म्हणावी लागेल कारण त्यांनी मराठी,कन्नड,हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील अनेक नाटकांना संगीत दिले. १९७२ मध्ये त्यांनी ‘ घाशीराम कोतवाल ‘ या नाटकाला संगीत दिले त्याप्रकारच्या संगीताचा वापर आजही मराठी रंगभूमीवर केला जात आहे. त्यांचे आणखी एक गाजलेले नाटक म्हणजे ‘ तीन पैशाचा तमाशा ‘ ह्या नाटकात नंदू भेंडे यांनी जी गाणी गायली आहेत ती कोणीही विसरू शकणार नाही. त्यानंतर त्यांचे येरे येरे पावसा, आषाढ का एक दिन, गिरिबाला, राम नाम सत है, जेतेगिरी बेन चंदेरी ही त्यांची काही प्रमुख नाटके होती. त्याचप्रमाणे जपानी भाषेतील ‘ नागमंडळ ‘ आणि जपानी भाषेतील ;’ मीवा ‘ या नाटकाला संगीत त्यांचेच होते.
भास्कर चंदावरकर यांनी सुमारे चाळीस चित्रपटांना संगीत दिले. त्यात सामना, घाशीराम कोतवाल, सर्वसाक्षी, चांदोबा चांदोबा भागलास का, गारंबीचा बापू, आक्रीत, एक डाव भुताचा, कैरी, बयो, सरीवर सरी, श्र्वास, मातीमाय, या मराठी चित्रपटास संगीत दिले. सामना या चित्रपटातील किंवा घाशीराम कोतवाल कुणीच विसरू शकत नाही.
भास्कर चंदावरकर यांनी हिंदी चित्रपटांनादेखील संगीत दिले त्यांची नांवे जय जवान जय किसान, मयादर्पण, जादू का शंख, अरविंद देसाई की अजब दास्तान, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है, हमीदाबाईची कोठी, खंडहर, परोमा, रावसाहेब, थोडासा रुमानी हो जाए,या हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्याचप्रमाणे वंशवृक्ष, कनक पुरंदर, तब्बलियू नीनदे मगने या कन्नड चित्रपटांना संगीत दिले. ‘ स्वप्नादनम ‘ या मल्याळी तर ‘ मायमिरिग ‘ या उडिया चित्रपटांना संगीत दिले. भास्कर चंदावरकर यांनी ‘ नाईट अवर्स टू रामा ‘ आणि ‘ अ लेप इन द निश ‘ या इंग्रजी चित्रपटांना संगीत दिले.
ज्या काळात समांतर नाटके आणि चळवळ सुरु होती तेव्हा भास्कर चंदावरकर यांचे मोलाचे योगदान आहेच परंतु त्यांनी काही सहा मिनिटांपासून शॉर्ट फिल्म्स केल्या त्याचे संगीत अप्रतिम आहेच त्यांची नांवे डीप ब्लू, कूल फाइव्ह, गोवा पोल्का, फ्लेम, द एलेमेंट्स : फायर अशा अनेक फिल्म्स आपल्याला आजही नेटवर बघता येतात. ‘ नक्षत्राचे देणे ‘ हा काव्य-संगीताचा कार्यक्रम ही त्यांची अमोल देणगी आहे. स्वप्नकोश हा बॅले, प्रतिभा हे नृत्यनाट्य अशा असे अनके प्रकार त्यांनी रंगभूमीवर केले आहेत. नवविचारणाच्या, कलेच्या बाबतीत त्यांचे योगदान फार मोलाचे आहे.
१९४८ साली त्यांना ‘ संगीत नाटक अकादमी ‘ पुरस्कार मिळाला, २००२ साली त्यांना ‘ चैत्र ‘ या मराठी चित्रपटासाठी ‘ सर्वत्कृष्ट संगीतकार ‘ म्ह्णून ‘ राष्ट्रीय चित्रपट सन्मान मिळाला.
२५ जुलै २००९ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी या प्रतिभाशाली संगीतकाराचे आजाराने निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply