नवीन लेखन...

संगीतकार श्रीनिवास खळे

श्रीनिवास खळे ह्यांचा जन्म ३० एप्रिल, इ.स.१९२६ रोजी बडोदा येथे झाला. बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली.

बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळेअण्णा मुंबईत आले. पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के. दत्ता म्हणजे दत्ता कोरगावकर ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकरसाहेबांचे साहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली. ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळेसाहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरूप बाहेर काढले. बऱ्याच हालअपेष्टांनंतर इ.स. १९५२ साली त्यांची ‘ गोरी गोरी पान ’ आणि ‘ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ’ दोन गाणी असलेली पहिली रेकॉर्ड प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांची तिच्यातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर श्रीनिवास खळे हे नावदेखील.

१ मे इ.स. १९६० हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीते लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत. हे गीत शाहीर साबळे ह्यांनी गायले आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधली आहे. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला व शाहिरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीतालादेखील आहे. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान, हे गीतसुद्धा खूपच गाजले.

संगीत पाणिग्रहण ह्या प्रल्हाद केशव अत्रे लिखित संगीत नाटकाला खळ्यांनी संगीत दिले होते.

इ.स. १९६८ सालापासून खळे साहेबांनी एचएमव्हीमध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरू केली. त्यानंतर त्यांनी इ.स. १९७३ साली ‘अभंग तुकयाचे’ हा संत तुकारामांच्या अभंगांचा संग्रह लता मंगेशकरांकडून, तर अभंगवाणी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले. त्यानंतर लताबाई आणि भीमसेन जोशी यांच्या स्वरांत राम-श्याम गुणगान या नावाने एक भक्तिगीतांची रेकॉर्ड काढली. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या आणि सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, वीणा सहस्रबुद्धे, उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांनी गायलेलेल्या गीतांच्या रेकॉर्डस् बनलेल्या आहेत.

श्रीनिवास खळे यांनी फारशा चित्रपटांना संगीत दिलेले नसले तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळले आहेत. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळजवळ १०० हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत. पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, सुलोचना चव्हाण पासून ते हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अरुण दाते, सुरेश वाडकर, देवकी पंडित, कविता कृष्णमूर्ती, सुधा मल्होत्रा, शंकर महादेवन ते अगदी लिटिल चॅम्प आर्या आंबेकर यांच्यापर्यंत कैक नामवंतांनी खळेसाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत.

इ.स. १९६८ सालापासून खळे साहेबांनी एचएमव्हीमध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरू केली. त्यानंतर त्यांनी इ.स. १९७३ साली ‘अभंग तुकयाचे’ हा संत तुकारामांच्या अभंगांचा संग्रह लता मंगेशकरांकडून, तर अभंगवाणी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले. त्यानंतर लताबाई आणि भीमसेन जोशी यांच्या स्वरांत राम-श्याम गुणगान या नावाने एक भक्तिगीतांची रेकॉर्ड काढली. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या आणि सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, वीणा सहस्रबुद्धे, उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांनी गायलेलेल्या गीतांच्या रेकॉर्डस् बनलेल्या आहेत.

खळे यांनी फारच थोड्या चित्रपटांना संगीत दिले आहे. त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावले. परंतु यंदा कर्तव्य आहे, बोलकी बाहुली, जिव्हाळा, पोरकी, सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे…बोलकी बाहुलीतली सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला, देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला; जिव्हाळातले, लळा जिव्हाळा शब्दच खोटे, प्रिया तुज काय दिसे स्वप्नात, या चिमण्यांनो परत फिरा रे, चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकणार नाही .

लता मंगेशकर यांनी गायलेले भेटी लागी जीवा अथवा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेसारखे तुकारामाचे अभंग; नीज माझ्या नंदलाला, श्रावणात घननीळा बरसला सारखी मंगेश पाडगावकरांची भावगीते; भीमसेन जोशींनी गायलेले सावळे सुंदर रूप मनोहर, राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग; अथवा सुरेश फडके यांचे लळा जिव्हाळा शब्दच खोटे सारखे चित्रपटगीत; वसंतराव देशपांड्यांनी गायलेले बगळ्यांची माळ फुले, राहिले ओठातल्या ओठात वेडे; आशा भोसले यांचे कंठातच रुतल्या ताना, टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय ते पाहू.

श्रीनिवास खळे अत्यंत मृदू स्वभावाचे असले तरी काही तडजोडी कधीच स्वीकारल्या नाहीत. त्यांना खूप माणुसकी होती. मला आठवतंय माझा मित्र शाहीर दामोदर विटावकर ह्याचे अकस्मात निधन झाले. गाण्याच्या निमित्ताने ते अनेक वेळा एकत्र आलेले होते. दामोदरचे अकाली जाणे त्यांना खूप लागले होते त्याच्या अंत्ययात्रेसाठी ते विटावा गावात आले . त्यांना खूप दुःख झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. लोक त्यांचे सांत्वन करत होते. खरे सांगायचे झाले तर श्रीनिवास खळे हे मराठी संगीतातील ‘ राजहंस ‘ होते असेच म्हणावे लागेल.

श्रीनिवास खळे यांना खूप पुरस्कार मिळालेले आहेत. भारत सरकारने त्यांना ‘ पदमभूषण ‘ पुरस्कार दिला . त्याचप्रमाणे लता मंगेशकर पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, संगीतरत्न पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, सुधीर फडके पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.

अशा खळे काकांचे ठाण्यात २ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..