आज २६ ऑक्टोबर.. प्रसिद्ध संगीतकार,महाराष्ट्राचे भावगंधर्व हृदयनाथ मंगेशकर यांचा वाढदिवस.
हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. १९५५ पासून आपल्या संगीताची कारकीर्द सुरू करणाऱ्या हृदयनाथ मंगेशकर यांनी आपले वडील दीनानाथ मंगेशकर यांचा थोर वारसा जतन करीत आपली वाटचाल सुरू केली.
अनेक कवींच्या गाण्यांना त्यांनी सुंदर चाली दिल्या. प्रत्येक गाणे, गाण्यातील काव्यरचना आणि त्यांतील विचार आशयासहित त्यांनी गानरसिकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचविण्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. अनेक गाण्यांची लयकारी, ते गाणे आणि त्याची निर्मिती होण्यापूर्वीच्या त्याच्या अनेक बारीकसारीक गोष्टींची त्यांना अगदी तंतोतंत आणि सुरस अशी माहिती असते. गाणे उमलण्यापूर्वी त्यातील प्रतिभेच्या स्पर्शाची त्यांना सर्वांगाने जाणीव होते.
आपल्या वडिलांकडून मिळालेल्या संगीतांतील सूरांच्या प्रतिभेचा स्पर्श ते आपल्या अनवट गाण्यांमधून समर्थपणे आविष्कृत करतात. मराठी जनमानसाच्या ओठावर रुळलेली आणि प्रतिभेच्या स्पर्शाने संस्कारीत झालेली त्यांची असंख्य गाणी आठवणींच्या हिंदोळ्यावर नेहमीच आपल्या मनाला परमानंद देत राहतात. उदा. ‘मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो….’ ‘त्या फुलांच्या गंधकोषी…’ ,‘गेले ते दिन गेले’ हे त्यांचे भावगीत, तसेच ‘गजानना श्री गणराया…’श्यामच्या आईतील ‘छडी लागे छम छम’, ‘नको देवराया अंत असा पाहू’, ‘अशी धरा असे गगन’, ‘का चिंता करसी’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘या रे या सुजन’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’,‘ गोड गोजिरी, लाज लाजरी ताईच होणार नवरी’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ अशी त्यांची कितीतरी गाणी आपल्या ओठांवर रुळतात. ती त्यांनी दिलेल्या अभिजात संगीतामुळे. गीतेतले अनेक श्लोकसुद्धा त्यांनी संगीतबद्ध केले आहेत.
त्यांनी स्वरबद्ध केलेल्या ज्ञानेश्वरांच्या अनेक रचना लता मंगेशकर यांनी गायल्या आहेत. हृदयनाथांच्या संगीतात राष्ट्रभक्तीची मोठी जादू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रचना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनीच मराठीत खऱ्या अर्थाने अजरामर केल्या. संतसज्जनांचा वारसा त्यांच्या गाण्यातून भावपूर्णरीत्या आनंदाच्या परिमळासारखा झिरपतो. त्यांनी काही निवडक मराठी (उदा. चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग) आणि हिंदी (उदा. धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब) चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले असले आणि यांतील बरीचशी गाणी गाजली आहेत. मा.सुरेश भट,चिंतामणी त्र्यंबक खानोलकर,ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाउन घेऊन अजरामर केले आहेत. त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्यातरी त्यातही ते अनेक नवनवीन प्रयोग करतात. आपले वडील आणि संगीत नाटकांच्या जमान्यातले प्रख्यात गायक-नट मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पदेही ते आपल्या संगीतरचनांमधे वापरतात.
मराठी मनाचे भावविश्वा अभिरुचिसंपन्न आणि समृद्ध करण्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. प्रतिभासंपन्न गायक आणि संगीतदिग्दर्शक या दोन्ही भूमिका त्यांनी सव्यसाचित्वाने बजावल्या. भा. रा. तांबे यांची ‘रिकामे मधुघट’, बी कवींची ‘चाफा’, बालकवींची ‘आनंदी आनंद’, वसंत बापटांची ‘गगन सदन तेजोमय’, ग्रेस यांची ‘ती गेली तेव्हा’, ना. धो. महानोर यांच्या ‘मी कात टाकली’ व ‘जांभुळपिकल्या झाडाखाली…’, आरती प्रभू यांच्या ‘ये रे घना’, ‘कसे हसायचे आहे मला’ व ‘ही वाट दूर जाते स्वप्नातील गावा’ आणि ‘काय बाई सांगू कसं ग सांगू’ इत्यादी रचना लोकप्रिय होण्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताचा आणि त्यांनी दिलेल्या चालींचा फार मोठा वाटा आहे. मा.हृदयनाथ मंगेशकर यांना २००९ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
आपल्या संगीतातील काही आठवणी सांगताना मा. हृदयनाथजी म्हणतात,
‘मोगरा फुलला.., हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ज्यावेळी दिदींनी हे गाणे सुरुवातीला गायले त्यावेळी त्या म्हणाल्या मला मी गायलेले हे गाणे आवडले नाही. मी गाण्याला न्याय देऊ शकले नाही. त्या म्हणाल्या हे गाणे गाताना मला एकही वाद्य किंवा माणूस नको आहे आणि त्यानंतर केवळ तंबो-याची साथ घेत त्यांनी हे गाणे गायले.
एकदा रस्त्यांना जाताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुस्तक विक्रेत्याकडे सुरेश भटांचे पुस्तक मिळाले. त्यावेळी त्यांची व माझी ओळख नव्हती. त्या पुस्तकातील ‘मेंदीच्या पानावर, मन अजून झुलतंय गं’.. ही कविता मला आवडली आणि त्याला मी चाल लावली व गाणे ध्वनीमुद्रित केले. कविता निवडताना थोडासा अभ्यास केला पाहिजे असे सांगून ते म्हणतात हे प्रेम गीत नाही तर आईने आपल्या मुलीसाठी गायलेले गाणे आहे.
१९६६ साली मी कोळी गीते करण्याचा प्रयोग केला आणि त्यातून ‘मी डोलकर डोलकर ..या गाण्याची निर्मिते झाली व या गाण्याने पुढे क्रांती केली. नारळी पौर्णिमेला समुद्रावर गेलो असताना जोराचा वर सुटला होता त्यावरून गाणे तयार केले व त्याला चाल दिली. ते गाणे शांता शेळके यांना ऐकवले. त्यांच्याच शब्दातील ते गाणं म्हणजे ‘वादळ वारं सुटलो ग…
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply