सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचे संगीत अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानलाही त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे.
या जोडीने आपल्या करीयरची सुरुवात विश्वविनायक या प्रसिद्ध अल्बमने केली. विश्वविनायक या अल्बममध्ये पारंपरिक आरती, स्तोत्रं त्यांनी वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली. या वेगळेपणामुळे हा अल्बम जगभर लोकप्रिय झाला. संगीतकार असण्याबरोबरच चांगले गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अनेक काँबो म्युझिकल गाणी आणि लोकगीतं त्यांनी स्वत:च गायली आहेत. त्या गाण्यांना त्यांचा आवाज चपखल आणि साजेसा वाटतो.
त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटातलं ‘वार्यावरती गंध पसरला’ हे गाणं असो किंवा ‘अगंबाई अरेच्चा’मधलं अतिशय मधुर चालीचं ‘मन उधाण वार्याचे’ हे गाणं असो किंवा ‘जत्रा’मधली ‘कोंबडी’, तसंच ‘दे धक्का’, ‘साडे माडे तीन’, ‘उलाढाल’, ‘नटरंग’ ‘जोगवा’, ‘बेधुंद’, ‘एक डाव धोबी पछाड’, ‘सही रे सही’ किंवा ‘लोच्या झाला रे’ सारखी मराठी नाटकांची, मालिकांची शीर्षकगीते, अनेक हिंदी चित्रपट, ‘झी मराठी’चे गौरवगीत… अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे.
सैराट मधील ‘याड लागले‘, “झिंगाट‘, “सैराट झालं जी‘, “आत्ताच बया‘ या चारही गाण्यांनी सर्वांनाच “याड‘ लावलं.
मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी संगीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे का असू शकत नाही? या संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्मिली. इतकेच नव्हे, तर एस्. पी. बालसुब्रमण्यम, हरिहरन, शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, सुखविंदर, शान, चित्रा, सुनिधी चौहान, श्रेया, ऋचा शर्मा, सुजाता अशा अनेक अमराठी गायकांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली आहेत.
अनेकानेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवले गेले आहे.जोगवा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
अजय गोगावलेचा (Ajay Gogavale) जन्म ११ सप्टेंबर १९७४ रोजी झाला.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply