आज हार्मोनियम वादक,अभिनेते व संगीतकार,पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक,गोविंदराव टेंबे यांची पुण्यतिथी.
जन्म :- ५ जून १८८१
मा.गोविंदराव टेंबे ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक, होते. त्यांनी ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटात हरिश्चन्द्राची भूमिका करून ते भारतभर गाजलेले नट होते. संगीत नाटकांचे लेखक, ‘मानापमान’ नाटकाचे संगीतकार व त्याच नाटकात धैर्यधराच्या भूमिकेने मराठी रंगभूमि गाजवणारे गायक नट, ‘माझा संगीत विहार’ व ‘माझा जीवन विहार’ या आत्मचरित्रपर रसाळ ग्रंथांचे लेखक अशीही मा. गोविंदराव टेंबे यांची ओळख सांगता येईल. ’अयोध्येचा राजा’, ’अग्निकंकण’, ’मायामच्छिंद्र’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. पेटीचे सूर महाराष्ट्रात कायमचे उमटून ठेवणारे मा.गोविंदराव टेंबे यांची यांची खूप माहिती इंटरनेट वर नाही.
‘माझा जीवन विहार’ या ग्रंथात गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आयुष्याचा आढावा पुढील शब्दात घेतलेला आहे.
” मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असतांना मला असे दिसून येत आहे की लाभ, हानि, सुख, दुःख, यशापयश इत्यादी महत्वाच्या प्रसंगापासून तो नित्याच्या क्षुल्लक गोष्टीपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शैल शिखरावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळायचे आणि अचानक तेथून पुन्हा मला कोणीतरी अज्ञात शक्तीने शिखरावर आणून बसवायचे, अशा सतत अनुभवांमुळे बुद्धीच्या टोचणीविरुद्ध देखील माझा परमेश्वरावरील विश्वास अढळ राहिला आहे. आचारात मी नास्तिकातला नास्तिक आहे आणि विचारामध्ये भावी पिढीच्याही पुढे आहे. मात्र पुरातन आचार विचारांना केवळ पुरातन म्हणून लाथाडायचे ही माझी वृत्ती नाही. परमेश्वर आहे की नाही, या विषयीची मी पंचाईत करत नाही. पण तो मजेने मला खाली पाडतो, माझी धडपड पाहतो आणि मी हताश झाल्यावर कारुण्याच्या एका कटाक्षाने मला वर काढतो ही एकच भावना माझ्यात दृढमूल झालेली आहे, आणि कोणत्याही कारणाने ती मुळातून यत्किंचितही सुटलेली नाही. अर्थात या विश्वासामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विधीनिषेध मानीत आलो नाही. जे जे प्राप्त होईल ते ते भोगायचे; त्याच्या परिणामाचा विचार करावयाचा नाही — मग तो परिणाम इष्ट असो वा अनिष्ट असो. यामुळे कोणाचेही बरे केले हा अहंभाव नाही व कोणाचे वाईट व्हावे व माझे बरे व्हावे ही आतून रुखरुखही नाही. मनात आलेली गोष्ट योग्यच असणार तेव्हा ती करायची; मग ती बरी असो के वाईट असो. वाईट असेल तर त्यातून ईश्वरेच्छेने आपोआप मुक्तता होईलच; तोपर्यंत ती मला मानवतेच. चांगल्या वस्तूला मी मुकलो तर त्याहीपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळणार आहे अशीही खात्री ठेवायची ; आणि ती केवळ अंधविश्वासाची खात्री नव्हे, तर अनुभवाची खात्री. या मीमांसेनंतर माझ्या वरवर दिसणा-या बेपर्वा व बेगुमान बेछूट वृत्तीची तरफदारी करण्याचे क्वचितच कारण पडेल. मा.गोविंदराव टेंबे यांचे ९ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.गोविंदराव टेंबेयांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- स. ह. मोडक
Leave a Reply