रत्नागिरीतील प्रसिद्ध संगीतकार आंनद उर्फ सुनिल शामराव प्रभूदेसाई यांनी संगीतातील एम.ए. पदवी प्राप्त केली होती. त्यांना संगीत तज्ज्ञ डॉ. भारती वैशंपायन व अरूण तसचे मुंबईतील डॉ. अशोक रानडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. याचबरोबर नाट्यसंगीत अभिनयाबाबत जयमाला शिलेदार-पुणे यांच्याकडून त्यांना धडे मिळाले होते.
खल्वायन संस्था निर्मित ‘संगीत. घन अमृताचा, संगीत. शांतीब्रह्म, संगीत राधामानस’ या नव्या संहितांच्या संगीत नाटकांसह ‘सं. कट्यार काळजात घुसली’ या नाटकांसाठी त्यांना संगीत राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट गायन, अभिनयासाठी ४ वेळा उत्कृष्ट गायक अभिनेता पारितोषिक प्राप्त झाले आहे. याचबरोबर नवी दिल्ली येथील नाट्य स्पर्धेतही २००२-०३ साली उत्कृष्ट गायक अभिनेता म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.
खल्वायन निर्मित संगीत स्वरयात्री या नाटकाचा १३ नोव्हेंबर १९९८ रोजी रत्नागिरीत पहिला प्रयोग सादर झाला. यादिवशी त्यांनी संगीत रंगभुमीवर पदार्पण केले. त्यांनी ‘सं. स्वरयात्री, सं. घन अमृताचा, सं. शांतीब्रह्म, सं. मत्सगंधा, सं. राधामानस, सं. ऐश्वार्यवती, सं. कट्यार काळजात घुसली, सं. प्रितीसंगम, सं. सौभद्र’ या नाटकातून गायक अभिनेता म्हणून कारकिर्द गाजवली होती. रत्नागिरीच्या स्टार थिएटर्समधूनही एकांकिका ‘चटाटो’, तर ‘म्हाराज मेले’ या नाटकातून गद्य रंगभुमीवरही सहभाग घेतला होता.
प्रभूदेसाई यांच्या सांगितिक कारकिर्दीची दखल महाराष्ट्रातील विविध मान्यवर संस्थांनी घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले होते. मुंबई मराठी साहित्य संघाचा भालेराव पुरस्कार, २०१२ साली कोरेगाव-सातारा येथे स्वरराज छोटागंधर्व गुणगौरव पुरस्कार, तर संगीत व नाटकातील योगदानाबद्दल प्रभूदेसाई यांना १९ जुलै २०१४ रोजी पुणे येथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले होते.
रत्नागिरीतील प्रसिद्ध संगीतकार गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई श्री गगनगिरी महाराज आश्रमात दत्तजयंती, गुरुपौर्णिमा या दिवशी दरवर्षी विनामूल्य गायन सादर करत असत.
आनंद प्रभुदेसाई यांचे २० डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply