वसंत कृष्णा देसाई यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील सोनवडे या गावी झाला. लहानपणापासून त्यांना व्यायामाची आवड असल्यामुळे शालेय शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंतच झाले. सुरवातीच्या काळात त्यांनी उस्ताद अलम खान यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आणि त्यानंतर उस्ताद ईनायत खान यांच्याकडे ते गाणे शिकले. धृपद-धमार या शास्त्रीय गायनपद्धतीसाठी त्यांनी डागर बंधूंकडे शिक्षण घेतले. उत्तम गळा , दमदार आवाज , बळकट कमावलेले शरीर आणि जबरदस्त आलापी आणि गुरुकडे केलेला रियाज ह्यामुळे त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक तयार झाली. त्यांनतर ते ठिकठिकाणी गाण्याच्या मैफली करू लागले . त्यामुळे त्यांना इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीतर्फे गाण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा त्यांनीच संगीत देऊन स्वतःच्याच आवाजात गाणी गायली.
वसंत देसाई १९३० मध्ये प्रभात फिल्म कंपनीत नोकरीला लागले. त्यांना उत्तम शरिरयष्टी असल्यामुळे त्यांना चित्रपटात अभिनय करावा असे वाटत होते आणि त्यांनी ‘ खुनी खंजीर ‘ या मूकपटात भूमिका केली. त्याशिवाय त्या चित्रपटातले ‘ जय जय राजाधिराज ‘ हे गाणेही गायले. त्यांनतर ‘ धर्मात्मा ‘ , ‘ कुंकू ‘, ‘ माझा मुलगा ‘, ‘ संत ज्ञानेश्वर ‘ ह्या चित्रपटात भूमिकाही केल्या.
राजकमलचा ‘ लोकशाहीर राम जोशी ‘ हा वसंत देसाई यांनी संगीत दिलेला पहिला मराठी चित्रपट होता. परंतु अकरा वर्षांपूर्वी मा. विनायक यांच्या ‘ छाया ‘ चित्रपटातील दोन गाण्यांना संगीत दिले होते. १९५२ साली आचार्य अत्रे यांच्या ‘ ही माझी लक्ष्मी ‘ या चित्रपटाचे संगीत दिले त्यात बारा गाणी होती. त्यानंतर आचार्य अत्रे यांच्या सुप्रसिद्ध ‘ श्यामची आई ‘ ह्या चित्रपटाला संगीत दिले . ह्या चित्रपटाला सुवर्णपदक मिळाले . ह्या चित्रपटाचे संगीत आजही कोणी विसरू शकत नाही. त्यानंतर त्यांनी भालचंद्र पेंढारकर यांच्या ‘ माझी जमीन ‘ या चित्रपटाला संगीत दिले. १९५४ साली माधव शिंदे आणि लता मंगेशकर यांची निर्मिती असलेल्या ‘ कांचनगंगा ‘ चित्रपटाला वसंत देसाई यांनी संगीत दिले. भालजींची कथा आणि पी. सावळाराम यांची सात गाणी त्यात होती. ‘ बाप माझा ब्रह्मचारी ‘ या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले त्यात महेंद्रकपूर हे वसंत देसाई यांच्याकडे सर्वप्रथम गायले, हा चित्रपट गजानन जागीरदार यांचा होता. त्यानंतर त्यांचे छोटा जवान , मोलकरीण , स्वयंवर झाले सीतेचे , इये मराठीचिये नगरी ‘ धन्य ते संताजी धनाजी , लक्ष्मणरेषा अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.
ऋशिकेष मुखर्जी यांच्या ‘ आशीर्वाद ‘ आणि ‘ गुड्डी ‘ या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. ‘ गुड्डी ‘ ह्या चित्रपटातील ‘ बोल पपिहरा ..’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे हे गाणे वाणी जयराम यांनी गायले होते , तर मराठीतील ‘ आज कुणीतरी यावे..’ हे गाणे आजही कोणी विसरू शकत नाही. अमर भूपाळी , आशीर्वाद , गुड्डी , गूंज उठी शहनाई , झनक झनक पायल बाजे , दो आँखे बारा हाथ , राम जोशी , शकुंतला ह्या चित्रपटांना वसंत देसाई यांनी संगीत दिले. त्यांनी सुमारे ६५ हिंदी-मराठी चित्रपटांना संगीत दिले. १९६२ च्या युद्धात ‘ जिकूं किंवा मरू ‘ ह्या ग.दि. माडगूळकर यांच्या सुप्रसिद्ध गाण्याला वसंत देसाई यांनी चाल लावली होती. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांचे ‘ए मालिक तेरे बंदे हम’ हे गीत पाकिस्तानमध्ये देखील गाजले.
१९६० साली ‘ पंडितराव जगन्नाथ ‘ या नाटकाला त्यांनी प्रथम संगीत दिले . त्यानंतर जय जय गौरीशंकर , देव दिनाघरी धावला , प्रीतिसंगम , मृत्युंजय , स्वरसम्राट तानसेन यासारख्या एकूण पंधरा नाटकांना चाली दिल्या. त्यातील सर्वच गाणी गाजली. त्यांचे ‘ प्रीतिसंगम ‘ हे नाटक खूपच गाजले. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटांना पाश्वसंगीत दिले त्या चित्रपटांच्या गाण्यांना संगीत दुसऱ्या संगीतकारानी दिले होते. मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रमाची सुरवात, प्रसारणाची सुरवात वसंत देसाई यांच्या सुरावलीने झाली होती. १९६७ साली त्यांना भारत सरकारने ‘ पद्मश्री ‘ देऊन त्यांचा गौरव केला होता.
वसंत देसाई एका गीताचे ध्वनिमुद्रण करून ते १२ डिसेंबर १९७५ या दिवशी घरी परतताना उंच इमारतीच्या लिफ्टच्या दारात अडकून त्यांचे दुःखद निधन झाले.
सतीश चाफेकर.
Leave a Reply