हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ‘संगीतकार दत्ताराम’ हे नाव एके काळी खूपच गाजले होते. दत्ताराम हे डिचोली तालुक्यातील. त्यांचे मुळ नाव दत्ताराम शिरोडकर, मुळगावी त्यांच्या वडिलांचे किराणा दुकान होते. पुढे आई ९ वर्षाच्या दत्तारामला घेऊन सांवतवाडीला गेली, तिथे शाळेत घालताना शेजारच्या मुलाने त्यांचे नाव ‘दत्ताराम वाडकर’ सांगितले आणि तेच नाव कायमचे लागले. शिक्षणात त्यांचे फार लक्ष नव्हते. त्यामुळे आई त्यांना घेऊन मुंबईत गेली. तिथे तबला शिकले, ढोलक शिकले, त्यातूनच पुढे पृथ्वी थिएटर हुस्नलाल – भगतराम, संगीतकार शंकर आदीशी त्यांचा संबंध आला. राजकपूर तेव्हा ‘आग’ चित्रपटाद्वारे निर्माते झाले, पण ‘आग’ आपटला. पुढे ‘बरसात’ जोरदार चालला. दत्ताराम त्यावेळच्या दर्दभ-या गाण्यात ढोलकचा ठेका धरायचे. ‘चोरी चोरी’ चित्रपटात ‘ये रात भिगी भिगी’ या गाण्यात ढोलकचा अप्रतिम ठेका दत्ताराम यांनी दिला आणि तोच हिंदी चित्रपटसृष्टीत ‘दत्ताराम ठेका’ म्हणून गाजू लागला. त्यातूनच पुढे राजकपूरने दत्ताराम यांना ‘अब दिल्ली दूर नही’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनाची संधी दिली. या चित्रपटातील ”चुन चुन करती आयी चिडिया, मोरभी आया चूहाभी आया, बंदरभी आया” हे गाणे हिट झाले.
दत्ताराम यांचा सुवर्णकाळ म्हणजे ‘परवरिश’ चित्रपटातील एकापेक्षा एक हिट गाणी होय. यमन रागातील चाल दत्ताराम यांनी बांधली आणि हसरत जयपुरीने त्याचे शब्द लिहिले. “ऑसू भरी है ये जीवन की राहें, कोई उनसे कहदे, हमे भूल जायें ” या गाण्याने लोकप्रितेचा कळस गाठला. राज कपूर भलताच खुश झाला. राजकपूर हा ग्रेट शोमन होता. तसाच संगीताचा जाणकार होता. १९५९ साली ‘कैदी ने ९११’ मधील लताच्या आवाजातील ”मिठी मिठी बातोंसे बचना जरा” हे गाणेही खूप लोकप्रिय झाले. ”आसू भरी है ये जीवन की राहे” हे मुकेश यांचे गीत आजही रसिकांच्या लक्षात आहे. ही गीते संगीतबध्द करणारा माणूस होता मा.’दत्ताराम’. १९५० नंतरची ही गाणी आहेत, पण त्यामध्ये आधी चाल बांधण्यात आली आणि हसरत जयपुरींनी त्या चालीवर शब्द गुंफले. दत्ताराम त्यावेळी संगीतकार जय-किशन आणि राजकपूर यांच्याएवढेच लोकप्रिय होते. ढोलक या लोकवाद्याचा वापर प्रतिष्ठित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खुबीने केला. असे हे दत्ताराम काळ बदलल्यानंतर अज्ञातवासात गेले. १५ – १६ चित्रपटांना दत्ताराम यांनी संगीत दिले. तो जमाना वेगळा होता. आजच्या लाखाच्या, कोटीच्या आकडयांत मानधन कधी मिळाले नाही, ‘परवरिश’ साठी जेमतेम पाच हजाराचे मानधन मिळाले होते असे दत्ताराम सांगत. पुढे जमाना बदलला, शंकर-जयकिशन यांना साथ देत दत्ताराम यांनी मुबंईत बरीच वर्षे काढली. मा.दत्ताराम यांचे ८ जून २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / शरद कारखानीस
Leave a Reply