आपल्याला शिवाजी महाराज हे कर्तव्यदक्ष, मुत्सद्दी,प्रजेची काळजी वाहणारे म्हणून माहिती आहेत .पण ज्या इंग्रजांनी पुढे आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या इंग्रजांना मूर्ख बनवले होते हे आपल्याला ठाऊक नसते.
महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी इंग्रजाकडून मुंबई येथे तांबे खरेदी केले.प्रत्येक वेळी काही लढायची गरज नसते.व्यापार उदीम सुद्धा करावा लागतो.त्यावेळी इंग्रजांचा डेप्युटी गव्हर्नर होता जेरोल्ड ओंजीअर.महाराज म्हणाले “आमचे सगळे पैसे गड किल्ले बांधण्यात खर्च झाले.आमच्या कडे नगद नाही. तेव्हा आम्ही हुंडी (प्रॉमिसरी नोट ) बनवून देतो.आमचे गोळकोंडा (हैद्राबाद) येथे कार्यालय आहे. कुतुबशहा आम्हाला खंडणी म्हणून पैसे देतो, तेव्हा तिथून तुम्ही पैसे घेऊ शकता,” मुंबईहून इंग्रजांचा टपालवाला गोळकोंडा येथे जात नसे. म्हणून त्यांनी हुंडी सुरतेला पाठवून दिली.(सुरतेला इंग्रजांची मोठी वखार होती.)सुरतच्या इंग्रजांनी ती हुंडी घेऊन टपालवाला गोळकोंडा येथे मजल दरमजल करत पाठवला.तिथे खरच एक कारकून बसला होता.त्यानी ती हुंडी पहिली व म्हणाला “ तुम्ही बरोबर जागी आलात पण थोडी अडचण आहे,हि हुंडी मी वटवू शकत नाही.मला तो अधिकार नाही. ज्याला अधिकार आहे ते प्रल्हाद निराजी नुकतेच रायगडावर गेले आहेत.” टपालवाला चडफडत सुरतेला परतला.सुरतेच्या अधिकार्याने वैतागून ती हुंडी पुन्हा मुंबईला पाठवून दिली.
शेवटी जेरोल्ड ओंजीअरने त्यांचा वकील व दुभाषी नारायण शेणवी याला रायगडावर पाठवले.तो पाचाडला आला. बरेच दिवस खाली राहिल्यावर त्यांना मोरोपंतानी गडावर बोलावले ते म्हणाले “परत तेच, आमच्याकडे नगद नाही.एक काम करा अलिबागला आमची कोठारे आहेत.त्यात लोकं सारा म्हणून नारळ ,सुपाऱ्या देतात त्यापैकी काही चालणार असेल तर बघा.”आता ते घ्यायचे कि नाही याचे अधिकार नारायण शेणवीला नव्हते.तो पुन्हा मुंबईला आला व सगळे घडलेले सांगितले जेरोल्ड ओंजीअर काय समजायचे ते समजला.तो म्हणाला “अरे ते असे आहेत कि आपल्याला अलिबागला पाठवतील व सारा देणाऱ्यांना गुपचूप सांगतील पुढची सूचना मिळेपर्यंत अलिबागला माल आणू नका”शेवटी जेरोल्ड ओंजीअरने शेणवी बरोबर फ्रान्सिस व्हेअरर इंग्रज अधिकारी पाठवला.यावेळी महाराज गडावर होते.त्यांनी सांगितले “ आमच्याकडे नगद नाही हवं असल्यास बदल्यात सोने किंवा चांदी देतो.”आता काय घ्यायचं म्हणून शेणाविला गडावर ठेऊन फ्रान्सिस मुंबईला परतला.सगळा प्रकार पाहून जेरोल्ड ओंजीअर वैतागला म्हणाला “अरे जे देतायत ते घेऊन परत ये “ फ्रान्सिस पुन्हा रायगडावर गेला.महाराजांनी मोरोपंताना सांगितले “जे काही द्यायचे ते देऊन व्यवहार मिटवा”मोरोपंतानी विचारले “काय हवं आहे चांदी कि सोने”फ्रान्सिस म्हणाला”काहीही द्या”मोरोपंत म्हणाले “नक्की काय ते ठरावा चांदी कि सोने “फ्रान्सिस म्हणाला “चांदी द्या “ पंत त्याला दफ्तरात घेऊन गेले आणि सांगितले कि चांदी २८ रुपये शेर आहे (त्यावेळचे).फ्रान्सिस म्हणाला “मुंबईला तर २३ रुपये शेर आहे”पंत म्हणाले रायगडावर २८ रुपये आहे “ शेवटी व्यवहार झाला.आणि जेरोल्ड ओंजीअरने पत्र लिहून इंग्लंडला कळवले कि व्यवहारात इंग्रजांना साडे बावीस टक्के तोटा झाला.
जाणता राजा – शिवाजी महाराज
रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply