‘म्युच्युअल फंड या विषयावर मला लिहायचे होते . विषय माझ्या खूप आवडीचा , परंतु या दोन शब्दांवर किती व कसे लिहावे असा प्रश्न पडला होता . पण जसा जसा विचार करू लागलो तसतसे सुचत गेले . हे दोन शब्द मानवी जीवनाच्या अर्थकारणात म्हणजेच आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव झाली आणि त्याचबरोबर जबाबदारी पण वाढली . मी लिहीत गेलो ….
‘म्युच्युअल फंड काळाची गरज ‘ या शीर्षकानुसार खरोखरच म्युच्युअल फंड ही काळाची गरज आहे . गुंतवणूक या शब्दाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा गुंतवणुकीचा काळ जेवढा मोठा असेल तेवढा जास्त परतावा आपल्याला मिळेल आणि तेव्हाच आपण संपत्ती निर्माण करू शकतो . पारंपरिक बचतीचे अथवा गुंतवणूकीचे प्रकार वाढत्या महागाईनुसार आपल्याला चांगला परतावा नाही देऊ शकत . उदाहरणार्थ प्रॉव्हिडंट फंड ( PF ) चे दर कमी होत जात आहेत , बँकेतील दीर्घ मुदत ( FD ) बचतीचे दर तर वेगाने कमी होत आहेत . असे म्हणतात पुढील काही वर्षांत आपल्याला बँकेत पैसे ठेवण्यासाठी व्याज द्यावे लागेल . पोस्ट ऑफिस , पारंपरिक इंशुरन्स प्लान आपल्याला फारच कमी परतावा देतात . रिअल इस्टेट व सोने यांचा परतावा पण गेली अनेक वर्षे ठराविक ८ ते ९ % वर अडकून पडला आहे आणि म्युच्युअल फंडाचा गेल्या ४० वर्षातील परतावा हा सरासरी १४ % पर्यंत आहे . तेव्हा म्युच्युअल फंड ही काळाची गरज का आहे ? हे अधोरेखित होते .
म्युच्युअल फंडाला मराठीमध्ये ‘ सामाईक निधी ‘ हा शब्द आहे . परंतु व्यवहारात हा शब्द फारच कमी वेळा वापरला जातो . तेव्हा आपण प्रचलित MF हा शब्दच येथे वापरूया .
अठराव्या शतकात अब्राहम व्हॅन केटविक या डच व्यापाराने ” ईनद्राख्त माक्त माख्त ‘ ( म्हणजे एकी बळ निर्माण करते ) या नावाची एक विश्वस्त संस्था काढली . या संस्थेच्या माध्यमातून छोट्या गुंतवणूकदारांना विविध धंद्यांमध्ये भांडवल गुंतवता येत होते . हीच आजच्या MF ची सुरुवात मानली जाते .
१९६३ साली भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी एकत्र येऊन ‘ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’ची स्थापना केली . ही भारतातील पहिली MF कंपनी आहे . १ ९ ८७ साली भारतीय आयुर्विमा महामंडळ तसेच अन्य सार्वजनिक बँकांनी MF उद्योगात प्रवेश केला . १ ९९ ३ साली MF साठी नियम बनविण्यात आले आणि खासगी म्युच्युअल फंडांना परवानगी देण्यात आली . MF चा प्रसार व्हावा तसेच त्यातील गुंतवणूकदारांचे हित जपले जावे यासाठी सर्व नोंदणीकृत MF एकत्र येऊन २२ ऑगस्ट १ ९९ ५ रोजी AMFI- अॅम्फी ( The Association of Mutual Fund of India ) या संस्थेची स्थापना झाली . MF चे सेबीच्या नियंत्रणाखाली वेगवेगळ्या पॉलिसीज , नियम आणि सुपरविजन केले जाते . गुंतवणूकदारांची आवड , रस आणि हित जपले जाते . भारतातील MF हे अतिशय सुरक्षित आहे .
प्रथम आपण MF ची व्याख्या समजून घेऊ . सर्व गुंतवणूकदारांकडून जमा केलेला पैसा ( फंड ) ज्याची वेगवेगळे शेअर्स , बाँड , सिक्युरिटीज , मनी मार्केट इन्स्ट्युमेंटस्मध्ये फंड मॅनेजरच्या सल्ल्याने गुंतवणूक केली जाते . त्याला MF म्हणतात .
एखाद्या परिपूर्ण जेवणाच्या थाळीत वेगवेगळे पदार्थ असतात त्याप्रमाणे MF मध्ये वेगवेगळे फंड असतात . उदाहरणार्थ –
डेट फंड ( Debt Fund ) – यामध्ये लिक्विड ( Liquid ) , Short & Long Term असे तीन प्रकार असतात . हा खूप सुरक्षित फंड आहे . जो गर्व्हमेंट सिक्युरिटीज , बाँड , कॉरपोरेट बाँड मध्ये गुंतविला जातो . कमीत कमी ७ दिवसाच्या मुदतीकरितासुद्धा इथे पैसे गुंतविले जातात .
इक्विटी फंड ( Equity Fund ) – यामध्ये खूप फंड आहेत . हा फंड शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या शेअर्स मध्ये गुंतविला जातो . उदाहरणार्थ –
Large Cap Fund – भारतातील १ ते १०० कंपन्यांचे शेअर्स .
Mid Cap Fund – १०१ ते २५० कंपन्यांचे शेअर्स.
Small Cap Fund – २५१ ते ५०० व अधिक
Multicap Fund – वरील सर्व ३ फंडामधील कंपन्या .
EISS Fund – हा Income Tax Saving Fund आहे . याची गुंतवणुकीची कमीतकमी मुदत ३ वर्षे आहे .
Balance / Hybrid Fund – हा ३५ % Debt Fund व ६५ % Equity Fund यामध्ये गुंतविला जातो .
Sector Fund – उदाहरणार्थ फार्मा , इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे वगैरे .
Gold ETF Fund – हा सोन्यामध्ये गुंतवणूक करतो .
Fund of Fund – एक फंड हाऊस दुसऱ्या फंड हाऊसच्या फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो विदेशी फंडामध्ये सुद्धा .
Index Fund – हा एक्स्चेंज ट्रेडेड फंड आहे . इक्विटी फंड ही गुंतवणूक शेअर बाजारामध्ये होते . मुख्य उद्देश हा संपत्ती अथवा पुंजी वाढविणे हा आहे . इथे मोठ्या काळासाठी गुंतवणूक केली तर परतावा. मोठा मिळतो . अनेकजणांना स्वतःच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणे जिकिरीचे वाटते . एखाद्या प्रोफेशनल फंड व्यवस्थापन कंपनीमध्ये विविध कामांसाठी लोकांना त्यांच्या शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या आधारे नियुक्त करून आपल्या गुंतवणुकीची सुरक्षितता आणि वाढ पाहिली जाते . त्यामुळे डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा MF ची गुंतवणूक जास्त सुरक्षित असते .
–
महागाईचा वाढता दर ही सध्या मोठी चिंता आहे . सरकार जो दर सांगते त्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवहारात तो दर खूप मोठा असतो . त्यामुळे आपण केलेली गुंतवणूक जर आपल्याला महागाई दरापेक्षा जास्त परतावा देत असेल तर आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुदृढ – सक्षम असेल . MF ही आयुष्यभर करावयाची गुंतवणूक आहे . आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला पैशांची गरज भासते म्हणून MF हे सातत्याने करीत रहावे . MF मध्ये आपण Lumpsum = एकत्रित रक्कम किंवा SIP तुकड्या – तुकड्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो . MF ची गुंतवणूक तुम्ही तुमच्या आताच्या आणि भविष्यातील उद्दीष्टांकरिता वेगवेगळे फंड आणि त्याचा काळ हा अगोदरच ठरवून करू शकता .
आपल्या हिंदू परंपरेनुसार बाळाचा जन्म ते त्याचे लग्न एवढा मोठा म्हणजे अंदाजे २५ वर्षाचा काळ ही पालकांची जबाबदारी असते … हे सत्य आहे … हे जर सत्य असेल तर बाळ जन्मताच त्याच्या पालकांनी रु . ४००० ते १५,००० / पर्यंत ( Life Style व मिळकती प्रमाणे ) जर MF मध्ये SIP केली तर त्या बाळाचे बालपण + शिक्षण + अन्य शिक्षण ते लग्न हा सगळा खर्च मुलाचे पालक केवळ त्या SIP च्या माध्यमातून पूर्ण करू शकतात … हे देखील एक सत्य आहे
एक नियम पाळा . मिळकत – गुंतवणूक = खर्च
SIP चालू असताना जर Equity Market वाढले तर तुमच्या गुंतवणुकीची किंमत वाढते आणि जर Equity Market खाली आले तर तुम्हाला जास्त युनिटस् मिळतात म्हणजे दोन्हीकडून फायदा . सोनारासारखे नवीन घ्या अथवा जुने मोडा … सोनाराचा नफा ठरलेला …
सांगण्यासारखे खूप आहे .. तूर्तास इथेच थांबतो . MF ही काळाची गरज आहे हे वेळीच ओळखा आणि त्याप्रमाणे आर्थिक नियोजन करा … स्वस्थ रहा …. मस्त रहा … सुरक्षित रहा …
–विजय वैद्य
(वैद्य अॅड असोसिएट्स)
Leave a Reply