नवीन लेखन...

माझी घोडसवारी

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक श्री.रवींद्र कल्याणराव देशमुख, गुरुजी यांचा लेख


साल कुठलं नेमकं आठवत नाही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावी गेलो होतो.नुकताच नोकरीला लागलो होतो.सकाळच्या अकरा वाजल्या असतील. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या रविवारचा दिवस असल्याने डवरी पतर भरण्यासाठी ( वाळलेल्या भोपळ्याचे पात्र,डमरु त्रिशूळ वगैरे घेऊन) भिक्षा मागण्यासाठी आला होता.त्यांच वय बरंच झालं होतं पण तरीही ते घोड्यावरून फिरत असतं.मला नवागत बघून विचारलं.
” कोण गावचं पाव्हणं, म्हणायचं ? ” असा प्रश्न केला.
माझा भाचा आहे.काटीचा माझ्या माहेरचा आहे.आत्यानं ओळख करून दिली तसं ते पुढं म्हणाले,
असं व्होय, नाव काय हाय पावणं ?
मी माझं नाव सांगितले.
नावातलं आडनाव ऐकून ते म्हणालं मग काय मोठी असामी हाय की ? पाटलीणबाय.असं आत्याकडे बघून म्हणालं आणि आत्याच भाबडं मन मनोमन सुखावलं.
माझं लक्ष मात्र त्यांनी आणलेल्या घोड्याकडं होतं.
घोडं तसं मध्यम बांध्याचं होतं.पण दिसायला तेवढं रुबाबदार नसलं तरी चांगलं होतं.मी सर्व बाजूंनी ते पहात होतो पण झालं काय, डव-याला वाटलं मी घोडेपारखी आहे.माझ्याजवळ येत ते म्हणाले,” आमची कशाची घोडी वं, इथं आमची खायची पंचाईत.पण तुमच्याकडं चांगली चांगली घोडी असणार की, तुम्ही मोठी माणसं.”
पाहुण्याकड आल्यानं अंगावर बरी कापडं, आडनाव देशमुख आणि त्यादिवशी का कसं माहिती नाही पण उगीचच अश्व व इतिहासात घुसलो होतो.सारा मावळा व मावळ अनुभवत होतो.
तसं ते डवरीमामा पुढं आलं, घोड्याचा इतिहास सांगू लागलं, त्यांच्या गुणांचे कौतुक करु लागलं इथंपर्यंत सारं ठीक होतं पण ते अचानक म्हणालं, ” तुम्ही एक रपेट मारुन बघा, म्हणजी तुमच्याही लक्षात येईल.”
त्यांचा रपेट शब्द ऐकूनच हातपाय लटपटायला लागले.कारण माझा आणि घोड्याचा शिमोल्लंगनाला रामोशांनी धरलेल्या घोड्यावर बसून वेशीपर्यंत जाण्या पलीकडं काहीच नव्हता आणि आत्ता हे काय ? कसं जमणार ? सारंच अवघड होतं.
त्यानं तोंड लहान करित म्हणालं, ” तुमचंबी खरं आहे म्हणा, तुम्ही मोठं, तुमची घोडी मोठी आण् तुम्ही कशाला आमच्या या असल्या घोड्यावर बसशीला ? ”
त्याचं हे ऐकून मला फार वाईट वाटलं.मी त्याना समजावायचा खुप प्रयत्न केला पण त्याचं आपलं एकच तुम्ही कशाला गरिबाच्या असल्या घोड्यावर बसशीला ?
त्याची समजूत कशी काढावी काहीच कळत नव्हतं ते पुढे म्हणालं, ” बरं फुढं कधी येणार ते सांगा ? चांगली खोगीर बिघीर घालून आणतो.मीबी येडाच हाय.तुम्ही एवढी मोठी माणसं ! आण् या पोत्याच्या खोगीरीवर बसायला सांगतोय.माफी करा पाटील.”
तो पाटील म्हणतो का काय यापेक्षा मला त्याला वाईट वाटल्याचे फार वाईट वाटलं.आत्ता त्याला समजावून सांगण्यात अर्थ नव्हता.मी ठरवलं नुसतं बसून बघू. कुठं जायचं नाही ना काही करायचं नाही.त्याचंही समाधान आणि आपलीही वाचंल.
माझ्या या कल्पनेने मी फार सुखावलो.आत्या कामात गुंतली सारे बाहेर गेलेले.वस्तीवर मी डवरी व त्याचा घोडा एवढेच होतो.
मी त्यांना समजावले,” मामा, तसं नाही वो.तुमचं घोडंबी चांगलंच आहे.मला आवडलं ही.”
तुम्ही उगं म्हंताव. आवडलं असतं तर बसला नसता का तुम्ही ?
बरं मामा. चला बसतो मी घोड्यावर.असं म्हणून आणखी थोडं धाडस करित मी घोड्याजवळ गेलो व बसण्याचा विचार करु लागलो तसा पोटात गोळाच उठला
कारण त्यांच्या पाठीवर फक्त पोतं होतं, असू द्या.पण पाय ठेवायला रिकीबही नव्हती आता त्यावर चढणार कसं ?
प्रश्न मोठा गंभीर होता.घोडा माझ्या उंचीच्या मानाने ब-यापैकी उंच होता.पण आता काही झालं तरी मागं हटायचं नाही,असं मीही ठरवलेलं.
मी प्रयत्न करु लागलो पण दोन तीन वेळा प्रयत्न करुनही जमलं नाही शेवटी सगळी ताकत एकवटून प्रयत्न केला, पण झालं काय की, एकीकडून चढलो खरा पण दुसरीकडून तसाच खाली आलो.
तुम्ही लय इनोदी दिसताव पाव्हणं,लय मजा करताव राव.म्हाता-या माणसांची उगं गंम्मत लावलीय.
मी बळंच हसलो.व पुन्हा प्रयत्न केलो.व कसाबसा बसलो
जागच्या जागी थोडी पोज घेतली आणि त्याला बरं वाटावं म्हणून म्हणालो.चांगलं भारीच हाय बरं का मामा घोडं.
अंगापेरानं नाजूक हाय पण तालेवार रुबाबदार आहे. आवडलं आपल्याला.असं म्हणून मी उतरु लागलो.
तसं ते आणखीच तोंड बारीक करून म्हणालं,असू द्या देसाई.तुमची घोडी कुठं ? आमचं कशाचं वं.
आत्ता मात्र तो पुरती अब्रू खाणारच असं वाटू लागलं.
घोडं शांत उभा होतं, मी वर बसूनच बोलत होतो माझा आत्मविश्वास हळूहळू वाढत होता पण उभ्या जन्मात कधी मी घोड्यावर बसलो नव्हतो हे मात्र याला सांगून कळंत नव्हतं.काय करणार.तरी मनातून म्हटलो आता याचं बास झालं.असं म्हणत उगाचच दुखापत नको म्हणून उतरु लागलो.
डवरीमामा उदासपणे म्हणालं, ” तरी मी म्हणलं व्हतं, तुमचं घोडं कुठं ? आमचं कुठं ?उतरा बाबा.तुम्ही कशाला चक्कर मारताल आमच्या घोड्यावरुन ?
मला फार वाईट वाटलं. आत्तामात्र मला चक्कर यायची वेळ आली होती.मी थोडं धाडस करित घोड्यावरून चक्कर मारायचीच ठरवलं.पण वावरातल्या वावरात. कारण आपटलो तरी कमी मात्र लागावा.घोडं हाकारु लागलो पण ते काय जागचं हालंना आणि डवरी काय चक्कर मारायचा हट्ट सोडंना. अशी माझी स्थिती झाली.काय करावं काहीच कळंत नव्हतं.
मामांनी घोड्याला टाच हाणली. घोडं चालू लागलं वावरातल्या वावरात माझी घोडसवारी नव्हे रपेट सुरू झाली.कसंबसं घोडं वळवलो व हळूहळू वस्तीला आलो.
ढवरीमामा ऊभा व्हतंच. घोडं थांबवायचं कसं काहीच माहिती नाही.शेवटी घोडं मामाजवळ आपोआप थांबलं. माझा जीव भांड्यात पडला.सुटलो रे बाबा एकदाचा,असं वाटलं.
बाकी काही म्हणा, मामा घोडं छान आहे ? असं म्हणंत मी घोड्यावरुन उतरु लागलो तस मामा म्हणालं, ” पाटील, एवढं चांगलं हाय तर जरा लांब पल्ल्याची रपेट मारा की,त्याचं हे वाक्य ऐकून माझ्या डोळ्यासमोर भर दिवसा चांदण्या दिसू लागल्या.उन्हाळ्याचे दिवस डोक्या वर भर बाराचे ऊन.मामाचा हट्ट आणि माझा हार न मानण्याचा स्वभाव असं हे युद्ध चालू होतं.म्हटलं, आता काय होईल ते होईल.म्हणून निघालो.
मनात पक्कं ठरवलं की, घोड्यांच्याच मनावर चालायचं आपण काहीच करायचं नाही.उगी जवळच असणाऱ्या झेड.पी.शाळेपासून येऊ असं ठरवलं व जाऊ लागलो.

हळूहळू घोड्याचा वेग वाढत व्हता.मलाही सुरुवातीला बरं वाटलं पण आत्ता मात्र खाली बुडाला मार बसू लागला पाय ठेवायला रिकीबही नसल्याने पार बेकार हालत झाली.वाटलं घोडं इथंच थांबवावे व उतरुन घरी नेऊन सपशेल हार पत्करावी.

म्हणालो खरं पण आता घोडं थांबवायचं कुणाच्या बापाला माहिती आहे ? ऐकीव माहितीवर थांबवू लागलो तर ते जास्तच पळू लागलं.
माझी स्वारी आत्ता वस्तीवरून गावात आली.घोडं पळंत होतं,खाली मार बसंत होता आणि रस्त्यावर ओळखी चे पाहुणे,पाहुण्यांची पोरं,मित्र कंपनी माझ्याकडं बघत, ” पाव्हणं, जोरातच की,मी कसंबसं हसायचो, दुसरं काय करणार ? घोडं आता डांबरी रस्त्याला लागलेलं माझ्या घशाला कोरड पडलेली खुप त्रास होत होता.घोडं थांबत नव्हतं आणि मला ते थांबवता येत नव्हतं काहीच सुचत नव्हते.बाजूनी मोठी मोठी वहाणं जायची.मरण दिसत होतं.झक मारली आणि घोड्यावर बसलो.सारी मस्ती उतरली होती.जराशी हार मानली असती तर ? असं वाटू लागलं.

तिकडं घरी आत्त्याला जेव्हा कळालं की,मी घोडं घेऊन गेलोय तेव्हा त्यांना काहीच कळेना कारण मी कधी घोड्यावर बसलेलो नाही आणि मी त्यांचा एक भाच्चा होतो आणि आज नेमकं घरी कुणीच नव्हतं.
अत्यानंच ढव-याचीच आरती करायला सुरुवात केली.तो म्हणाला, ” अवं, पाटलीणबाई, काळजी करु नका.पाव्हणं हुशार हायती,त्यांना माहिती आहे सारं.मला माणूस तवाच कळतंय.”

तुझं थोबाड बंद कर आधी. आत्ता मी काय करु ? लेकरु कुठं गेलं असलं ? काय झालं असंल ?
ढवरीमामा धीर देत म्हणाला, ” अवं माझं घोडं लय गुणांचं हाय आणिल पावण्याला ते व्यवस्थित.”
आत्याला काळजीनं काहीच सुचत नव्हतं.बरं त्यानं गप तर बसावं का नाय ? त्याचं घोडे पुराण चालूच होतं.
तशी आत्त्या त्याला म्हणाल्या, ” तुझं घोडं घाल चुलीत.माझ्या भाच्याला काही होऊ दे मग तू हाय आणि मी.जा बघ जा आधी कुठं गेलंय ते ” आत्ता मात्र डवरी घाबरला.त्याला सारा प्रकार लक्षात आला.पण तो तिथंच बसला.
घोडं बघता बघता वस्ती गावापासून दोन किलोमीटर लांब आलं.तिथं त्या डव-याची वस्ती होती.तिथं ते थांबले.

घोडं तर आपलं हाय आणि माणूस वेगळा दिसतोय. हे पाहून तिथं वेगळाच गोंधळ चालू झाला.त्याच्या बायकोने काही इचारपाचार न करता हात बडवून बोंबलायला सुरुवात केली.लेकरानंबी सुरात सुर मिळवला. मी कसाबसा मोठ्या ओठ्याच्या आधाराने घोड्यावरुन उतरलो.मला नीट ऊभाही राहता येईना चालणं तर लांबच कसाबसा त्यांच्या जवळ जाऊन सारा प्रकार सांगितला.

तेंव्हा कुठं वातावरण शांत झालं.मला पाणी वगैरे दिलं.मी पाणी घेऊन निघालो.मला समोर आत्त्या व तिची अवस्था दिसत होती.परत हिम्मत करून बसलो व घोडं घेऊन व निघालो.हळूहळू वस्ती गाठली.मला बघून आत्त्याचा जीव मोठा झाला.मी सुखरूप घरी आलो पण बुडाचं हाल लय खराब झालेलं.समोर डवरीमामा दिसलं.

ते पुढं येत म्हणालं, ” बघा मी म्हणालो नव्हतो का ? पाव्हणं हुशार आहेत.अवं त्यांच्यासारख्या मोठ्या माणसांनी आमच्या घोड्यावर बसणं आमचं नशीबच की.”

आत्ता मला साक्षात मृत्यू बघून आल्यासारखं वाटंत होतं.आत्याही शांत झाल्या होत्याचं.मला खुप भूक लागली होती.नीट बसताही येत नव्हतं.फार हाल झाले खरे. सावरायला खुप वेळ गेला पण समोर तरळत होता अवघा शिवकाल.

खरंच त्या काळात घोडा हेच साधन होतं ना ? त्यांच्याही योगदानाबद्दल कृतज्ञता भाव जागा झाला.मी त्याचं विचारात होतो तेवढ्यात डवरीमामा म्हणालं, “पाव्हणं, पुढच्या वक्ताला लय भारी घोडं आणतो बघा.तुम्ही नुसतं बघंतंच रहाल.चांगली रपेट करा ”
त्याचं ते ऐकून माझं पेकाट अधिकच दुखू लागलं आणि मी खरंच फक्त बघंतंच राहिलो.

तर अशी झाली माझी घोडेस्वारी. काय ? कशी वाटली ? वाचून नक्कीच मजा येईल.जरुर कळवा.चला तर मग.

श्री.रवींद्र कल्याणराव देशमुख, गुरुजी
( काटीकर) सोलापूर.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..