“मी मोबाईल डायेट करनार आहे.” मी फार मोठा बॉम्ब वगैरे टाकतोय या थाटात बोललो.
“हे काय नवीन फॅड?” माझा बॉम्ब हा एक फुसका फटाका आहे अशा तुच्छतेने तिने उत्तर दिले.
“अग फॅड नाही. मी मोबाइल वापरनार नाही, मी व्हाटस ऍप वापरनार नाही, फेसबुक बघनार नाही, ट्वीट करनार नाही, युट्युब बघनार नाही म्हणजे माझ्याकडे किती रिकामा वेळ असेल, मी तो वेळ तुम्हा लोकांना देउ शकेल. तुझ्याशी गप्पा मारील, मुलांशी खेळेल.” भाजी निवडता निवडता टिव्हिवरील किर्तन ऐकावे तसे ती ऐकत होती.
“त्याने काय होणार?“
“डेटा पॅक वाचेल.”
“आपल्या घरी अनलिमिटेड डेटापॅक आहे.”
“डेटाच जाउ दे, डायेटच बोलू” माझ चुकले आहे हे लक्षात आल्याने मी सावरायचा प्रयत्न केला.
“काय बोलायच त्यात. मोबाइल डायेट म्हणजे हॉटेलात जाउन मिसळपाव न खाता साबुदाणा खिचडी खाण्यासारख आहे का? दोन दिवस टिकनार नाही हे सोंग.”
“सोंग? तू याला सोंग म्हणतेस. मग तू ओळखल नाही मला. मी संयमाचा महामेरु, माझा संयम कधीही ढळू देणार नाही.”
“तुझा संयम, माहीती मला किती टिकतो ते. बायको आहे तुझी.”
बायकोच्या अशा कुचक्या बोलण्याकडे मी अजिबात लक्ष देत नाही. तिचे असे कुचके बोलणे ही कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची नांदी असते. मी सदागुरु सर्चानंद श्री गुगळेमहाराज यांनी शोधून दिलेला मोबाइल डायेटचा प्लॅन वाचायला घेतला.
मोबाइल डायेट हा अत्यंत कठीण प्रकार आहे. मनुष्य अन्नपाण्याविना चार दिवस काढू शकतो पण मोबाइलशिवाय नाही. अचानक मोबाइल बघणे बंद केल्यास वेड लागण्याची शक्यता आहे. अशा शारीरीक आणि मानसिक गरजांचा अभ्यास करुनच हा मोबाइल डायेट प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर हा डायेट करीत आहेत यात काहीही शारीरीक किंवा मानसिक बाधा झाल्यास आम्ही जबाबदार नाही.
मोबाइल डायेट करताना पाळायची काही पथ्थे
१. सर्वप्रथम आमची ऍप डाउनलोड करा म्हणजे तुम्हाला रोज काय करायचे याची माहीती मिळेल. कितीही डायेटवर असा पण आमची ऍप जरुर बघा.
२. सकाळी झोपेतून उठल्यानंतर कमीत कमी दोन तास मोबाईलला हात लावू नये.
३. या डायेटच्या सप्ताहात फेसबुकवर वर्गमैत्रीणीचे फोटो बघू नये. त्यामुळे बुकवर कमी आणि फेसवर जास्त लक्ष केंद्रीत होते.
४. मोबाइल गेम खेळू नये. पबजी किंवा तत्सम ऍप डायेट सुरु करताच अनइंस्टॉल कराव्या.
५. कॉलेज, शाळा, राजकारण अशा ग्रुपमधून बाहेर पडावे. अशा ग्रुपमधील चर्चा डायेट पाळण्यात बाधा आणू शकतात असे आमचे संशोधन सांगते.
महत्वाची सूचना: डायेट सुरु करायच्या आधी रोज चारवेळा बायकोला फोन करावा. असे केल्याने मोबाईलवर सुद्धा कमी बोलायची सवय लागते आणि मोबाईल वापरायची इच्छा हळूहळू कमी होत जाते.
गुरवारी सकाळी साईबाबांच्या फोटोला हार घालून मी माझ्या मोबाइल डायेटला सुरवात केली. मोबाइल डायेट नावाचे ऍप डाउन लोड केले. त्यावर Big Brother is watching you थाटात वाक्य होते We are watching you. थोडक्यात काय तर मला बनवू नका. स्टार्ट असे लिहिलेले बटन दाबून डायेट प्लॅन सुरु केला. पहिल्या दिवसाचा प्लॅन वाचायला घेतला.
दिवस पहिला: आज तुम्ही मोबाइल जवळ बाळगायचा, सतत खिशात ठेवायचा पण बघायचा नाही. सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास व्हाटस ऍप, दिवसभर इनकमिंग कॉल आणि दुपारी फक्त बायकोला फोन.
प्लॅनमधे सांगितल्याप्रमाणे सकाळी अर्धा तास पटापट व्हॉटस ऍप बघितले. फोनला आता हात लावायचा नाही असा विचार करुन ऑफिसला गेलो. तासभर ठिक गेला पण नंतर मात्र फोनची तिव्रतेने आठवण आली. काय करावे सुचत नव्हते म्हणून मी रोजच्या सवयीप्रमाणे ऑफिससुंदरी पामेलाच्या क्युब नं N–६०४वर नजर टाकली. ती कुणाशीतरी मोबाइलवर बोलत होती. मला तिचा हेवा वाटून मळमळल्यासारखे झाले. मी उठून कॅफेटेरीयात गेलो, तर तिथे एक मुलगा दुसऱ्या मुलाला त्याचा नवीन फोन दाखवित होता. ते दृष्य बघून मला ओकारीच व्हायची बाकी राहिली होती. मी तडक माझ्या जागेवर आलो. पामेला अजूनही मोबाइलवरच बोलत होती. मी ऑफिसच्या कामात लक्ष घातले. रोज ज्या कामांना रात्रीचे आठ वाजायचे ती सारी कामे दुपारपर्यंत आटपली. कुणी फोनचा विषय काढतील म्हणून जेवायला एकटाच गेलो. डायेट प्लॅनमधे सांगितल्याप्रमाणे बायकोला फोन केला. अर्थातच काही बोललो नाही. मित्रांशी बोलायाची खूप इच्छा होत होती. खूप कुचाळक्या करावशा वाटत होत्या. बॉसच्या नावानी बोंब करावी, जुन्या वर्गमैत्रीणीविषयी बोलाव किंवा कुणाच सूत कुणाशी जुळतय अशा चर्चा कराव्या असे वाटत होत पण दिवसभरात मित्रांचा काय टेलीमार्केटिंग वाल्यांचासुद्धा फोन आला नाही. फोन करायची खूप इच्छा होत होती. माझे हात, पाय, डोळे, मेंदू असतील नसतील ते सारे अवयव फोनला स्पर्श करायला आसुसलेले होते. खिशात फोन होता मी फोनला हात लावू शकत नव्हतो. मधुमेहाचा त्रास असनाऱ्या माणसाने मिठाइच्या दुकानात नोकरी करावी तशी परिस्थिती झाली होती. त्यादिवशी उशीरापर्यंत ऑफिसमधे थांबायचे असल्याकारणाने मी मोबाइल उपवास ऑफिसमधेच सोडला. एका झटक्यात धडाधड मेसेज वाचले. चांगले चारशेबावन्न मेसेज होते. दोन तीन मित्रांना उद्या फोन करा एक मस्त गंमत सांगतो असे मेसेज टाकले. उगाचच विमा आणि पर्सनल लोनचा ऑनलाइन फॉर्म भरला. उद्देश एकच उद्या कुणाचा तरी फोन नक्की यायला हवा.
दिवस काढण सोप होत पण रात्र मात्र वैऱ्याची होती. प्रियकर सोडून गेल्यावर त्याच्या आठवणीने प्रेयसी जशी विव्हळते ‘कटे नाही रात मोरी पिया तेरे कारण कारण‘ तसा मी विव्हळत होतो. कित्येक वर्षे रात्री झोपायच्या आधी मोबाईल बघितल्याशिवाय मी झोपलो नव्हतो. त्याच आठवणीने तडफडत होतो. सारखे कड बदलत होतो. कसातरी दोन मिनिट डोळा लागला. मला झोपेत पामेला माझा फोन घेउन पळतेय अस भयंकर स्वप्न पडले मी धाडकन जागा झालो. रात्रभर तसाच तडफडत होतो.
दुसऱ्या दिवशी उशीराच उठलो. सवयीप्रमाणे डोळे न उघडताच माझा हात बाजूच्या मोबाइलकडे गेला. तसा माझा मुलगा ओरडला
“बाबा नो फोन, डायेट.”
करंट लागल्यासारखा झटक्यात मी हात मागे घेतला. बापरे वाचलो नाहीतर सकाळीच उपवास मोडला असता. एखाद्या शुद्ध शाकाहारी व्यक्तीने चुकुन चिकन लॉलीपॉप हातात घ्यावे तसे झाले होत. बरोबर दोन तासानंतर मी मोबाइल हातात घेतला.
दिवस दुसरा: कालच्या प्रमाणेच सारा डायेट करावा. परंतु आज फोन बंद ठेवावा म्हणजे कुणाचाही कॉल येणार नाही. काल झालेल्या त्रासामुळे तुम्ही तुमच्या बऱ्याच मित्रांना मला फोन कर असे सांगितले असण्याची टाट शक्यता आहे.
काल मी केलेला प्लॅन या डायेट प्लॅनवाल्यांनी पार चौपट केला होता. त्यादिवशी घरात माझ्या उपवासाची फार काळजी घेतली गेली. फोन, चार्जर, हेडफोन अशा अमान्य वस्तू माझ्यापासून दूर ठेवण्यात आल्या. कुणीही माझ्याशी चांगले वागले की मला त्यांच्या हेतुबद्दल शंका येते. ती व्यक्ती जर का घरातली असेल तर ती शंका दाट होते. मला सारखा संशय येत होता मला कडकडीत उपवास करायला लावून यांचा माझा मोबाइल ढापण्याचा प्लॅन आहे. मी सावध होतो. मी जरी मोबाइलपासून दूर असलो तरी माझी नजर मात्र पुर्णवेळ मोबाइलवर खिळून होती. ऑफिसला जायच्या वेळेला न चुकता मी फोन खिशात टाकला. ऑफिसमधे आल्यावर सवयीप्रमाणे क्युब नं N-६०४ वर नजर टाकली. पामेला आजसुद्धा फोनवरच होती. मला तिचा प्रचंड राग आला. असशील तू ऑफिसैश्वर्या म्हणून सतत फोनला चिकटून राहायचे. इतक मोबाइलग्रस्त व्हायच. आता तिच्याकडेच काय पण खरीखुरी ऐश्वर्या जरी आली तरी त्या क्युबकडे बघनार नाही असे मी मनात ठरविले.
फोन बंद होता त्यामुळे कुणाचाही फोन येणार नव्हता. मेंदूला हे पटले होते पण माझ्या बोटांना मात्र हे पटत नव्हते. ते सारखे फोन हातात घ्यायला, त्यावरुन फिरायला तळमळत होते. ऑफिसमधे राहिलो तर ही बोटे मला माझा उपवास सोडायला भाग पडतील अशीच भिती वाटत होती. या साऱ्या त्रासातून वाचण्यासाठी मी लवकर घरी जायचे ठरविले. वाटल होत घरी सर्वांना धक्का बसेल, सारे कौतुकाने विचारतील आज इतक्या लवकर. बायको माझ्या आवडीचे खायला करील, मुल मला येउन बिलगतील. मी घराचे दार उघडले आणि माझा भ्रमनिरास झाला. सोफ्याच्या एका खुर्चीवर बायको आणि दोन खुर्च्यावर मुल मोबाइल घेउन बसले होते. दोन दिवसापासून टेबलवर पडलेल्या पेपरकडे आपण ज्या दुर्लक्षित नजरेने बघतो त्या नजरेने साऱ्यांनी माझ्याकडे बघितले. मी सोफ्यात जाउन बसलो. पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली पण आपल्या बाजूला कुणी हाडामासाचा माणूस बसला आहे, याचे त्या आभासी दुनियेत हवलेल्यांना सोयरसुतक नव्हते. लक्ष वेधून घ्यायला मी जोराचा आवाज करीत जांभई दिली तर तीनही नजरा रागात माझ्यावर रोखल्या गेल्या. घऱात सर्वात जास्त दुर्लक्ष करायची कुठली वस्तू असेल तर ती असते लवकर घरी आलेला नवरा. शेवटी मीच उठून स्वतःसाठी चहा केला आणि चहा घेउन परत त्याच जागी बसलो. हॉलमधे भयाण शांतता होती. लायब्ररीतच काय स्मशानात सुद्धा येवढी शांतता नसते. आयुष्यात मी सारे अत्याचार सहन करु शकतो, अगदी शिर्षासन घालून पाय वर, डोके खाली करुन तासभर टिव्हीवरच्या रडक्या सिरियल्स बघू शकतो (अत्याचाराची परिसीमा आहे ही) पण घरात सारे मोबाइल बघत असताना त्यांच्या तोंडाकडे नाही बघू शकत. शेवटी कंटाळून बेडवर जाउन पडलो. आदल्या रात्री झोप न झाल्याने मला लगेच झोप लागली. त्यादिवशी या मोबाइल उपवासामुळे मला पोटाचासुद्धा उपवास घडला.
दोन दिवस मोबाइल डायेट कसाबसा का असेना पण पार पडला होता. तिसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोबाइल बघायची फार इच्छा होत नव्हती. मी त्यादिवशी चक्क दुपारपर्यंत मोबाईलला हात लावला नाही. मी मोबाईलपासून दूर राहू शकतो हा आत्मविश्वास आता बळावला होता. दुपारी प्लॅन बघितला.
दिवस तिसरा: फोन कालप्रमाणे बंद ठेवावा. फक्त दुपारी बावीस मिनिटे युट्युबवर संस्कारी विडियो बघावा. बायकोला फोन करावा.
शनिवार होता तेंव्हा आऱाम होता. मोबाईल बघायचा नाही तेंव्हा मुलांशी खेळू म्हणून मी मुलांना विचारले.
“चल आपण खाली क्रिकेट खेळायला जाउ या”
“नको मला माझ्या फ्रेंडच्या घऱी फुटबॉल खेळायला जायचे.”
“फ्रेंडच्या घरी कसा फुटबॉल खेळणार?”
“आम्ही मोबाइलमधे खेळतो.”
“फुटबॉल ही काय मोबाइलमधे खेळायची गोष्ट आहे?” मी बडबड करीत होतो पण मुलगा तोपर्यंत निघून गेला होता. बायको युट्युबवर कसलातरी पदार्थ करायचा विडियो बघत होती. आज पोटाचा गिनिपिग होनार हे नक्की होते. तेवढ्यात पोरीने आवाज दिला. ती मोबाइलवर नोट्स बघून किबोर्ड वाजवित होती.
“आई यमन आणि यमन कल्याणमधे काय फरक आहे?”
“बाबांना विचार ते सांगतील गुगल करुन.” बायकोने स्वयंपाक घरातूनच उत्तर दिले.
“अग आई तुलाच बघावे लागेल. बाबा मोबाइल नाही बघू शकत. त्यांचा डायेट सुरु आहे.” हे ऐकून बायकोचा पारा भडकला. ती मोबाइल बंद करुन पोरीजवळ आली पण तिची बडबड चालूच होती.
“मोबाइल डायेट करतायेत, खायचा डायेट नाही करता येत.”
काल रात्री कडक उपवास करुनही आज माझे खाणे काढले गेले होते. आता मलाही राग आला. मी तसाच रागारागात घराबाहेर पडलो. रागातच झपाझप पावले टाकत चाललो होतो. मनातल्या मनात बोलत होतो. ‘मी काही चांगले, उदात्त करायला जावे तर त्याची घरात कुणाला काही किंमत नाही. माझे खाणे काढते. काय खातो असा मी. ही कोण समजते स्वतःला?‘ डोके शांत झाले तेंव्हा लक्षात आले की मी घरातल्या पायजम्यावरच चार किलोमीटर लांब आलो होतो. खिशात एक दमडी नव्हती. आलो तेवढच अंतर परत पायीच जाव लागनार होत. या मोबाइल डायेटने काल उपवास घडला होता, आज पायपीट झाली होती. अजून पुढे काय दाखविनार देव जाणे. पायपीट झाल्यामुळे खूप थकलो होतो त्यामुळे अख्ख्या आयुष्यात मी जितका झोपलो नसेल तितका झोपलो.
डायेटचा चौथा दिवस आला. रविवार होता तेंव्हा मी उशीरा उठलो. बायको मोबाइल बघत चहा पित होती. माझा राग अजूनही गेला नव्हता तेंव्हा फारसा बोललो नाही, शांतपणे सोफ्याच्या त्याच खुर्चीत बसलो. आज तो मोबाईल डायेटचा प्लॅन सुद्धा बघाची इच्छा होत नव्हती. माझा संयम खरच वाढला होता. बायकोचा मोबाइल वाजला तिने मला तिचा फोन दिला. माझ्यासाठीच फोन होता तिकडे तिर्थरुप पेटले होते.
“हॅलो“
“कारे फोन का नाही उचलला. काल कितीवेळा फोन केला मी.”
“काल दिवसभर झोपलो होतो.”
“का काय झाल?”
“डायेट करतोय.”
“का, चांगल खायला पायला मिळत तर तुम्हाला भिकारडे डायेट सुचतातच कसे?”
“तसा डायेट नाही“
“सांगितले तुझे थेर तुझ्या बायकोने.” मोबाइल डायेट म्हणजे थेर, सार कारस्थान आधीच शिजल होत तर. या नारायणरावाला मारायला आता गारद्यांची गरज नव्हती घरचेच पेटले होते. “कशाला करता नसली थेर. आता मला तुला फोन करायचा तर कुणाला करु. तुझ्या आईला तिच्या गोळ्या सांग. तिची चिठ्ठी हरवली. बंद कर तो डायेट आणि फोन चालू कर. गरज पडली तेंव्हा वापरायचा नाहीचर ठेवून द्यायचा इतक सोप आहे ते. याचा कसला डायेट करता तुम्ही. मिळतय ना म्हणून. आमच्या वेळेस कुठे होत हे सार. पुन्हा अस काही खूळ डोक्यात घातल तर याद राख.”
साक्षात तिर्थरुपांनींच आदेश दिल्यावर मी काही करु शकत नव्हतो. माझ्या मोबाइल डायेटचा बळी गेला होता. आमच्या तिर्थरुपांनी माझ्या डायेट प्लॅनला उभा आडवा कापला होता. मी आईचे औषध बघायला म्हणून व्हॉटस ऍप उघडले तसा त्या मोबाईल डायेटच्या ऍपचे नोटिफिकेशन आले
“OOPS, You are failed in your diet; better luck next time.”
— मित्रहो
https://mitraho.wordpress.com/
Leave a Reply