यु.एस. रूट नंबर ६ हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध रस्ता! मॅसेच्युसेट्स राज्यातल्या केपकॉड पासून ते कॅलिफोर्नियातल्या लॉंग बीच पर्यंत जाणारा. अटलांटिक आणि पॅसिफिक अशा दोन महासागरांना जोडणारा. ५१५८ कि.मी. (३२०५ मैल) लांबीचा आणि १४ राज्यांतून जाणारा. खर्या अर्थाने देशव्यापी किंवा खंडव्यापी असा रस्ता! (तुलनाच करायची झाली तर, भारतातील सर्वात मोठा हायवे, म्हणजे नॅशनल हायवे नंबर ७. हा उत्तर प्रदेशातील वाराणसी पासून तामीळनाडूतील कन्याकुमारी पर्यंत जातो आणि त्याची लांबी आहे २३६९ कि.मी.)
हा यु.एस. रूट नंबर ६ मॅसेच्युसेट्स राज्यातून सुरू झाला की र्होड आयलंड, कनेक्टिकट, न्यू यॉर्क, पेनसिल्व्हेनीया, ओहायो, इंडियाना, इलीनॉय, आयोवा, नेब्रास्का, कोलोरॅडो, यूटाह, नेवाडा अशा राज्यांतून जात जात कॅलिफोर्नियात जाऊन संपतो. या चौदा राज्यांपैकी, पाच राज्यांच्या राजधान्यांमधून (प्रॉव्हिडन्स – र्होड आयलंड, हार्टफोर्ड – कनेक्टिकट, द मॉईन – आयोवा, लिंकन – नेब्रास्का आणि डेन्व्हर – कोलोरॅडो ) जाण्याचा मान त्याला लाभला आहे.
ह्या यु.एस. रूट नंबर ६ ला “ग्रॅंड आर्मी ऑफ रिपब्लिक हायवे” असं देखील एक मोठं भारदस्त नाव आहे. अमेरिकेचा हा सर्वप्रथम खंडव्यापी आणि सर्वात लांब रस्ता! आता जरी हे त्याचं प्रथम स्थान (लांबीच्या दृष्टीकोनातून), इंटरस्टेट नंबर २० ने बळकावलं असलं, तरी देखील यु.एस. रुट नंबर ६ चा दिमाख आणि सौंदर्य थोडं देखील कमी झालेलं नाही. आपल्याकडे कशी शताब्दी आली, इंटरसिटी एक्सप्रेस आली तरीही डेक्कन क्वीन ती डेक्कन क्वीनच! १९८७ साली हारले – डेव्हीडसन या मोटरसायकलींसाठी जगप्रसिद्ध असलेल्या कंपनीने, ह्या यु.एस. रुट नंबर ६ ला, अमेरिकेच्या ५० सर्वोत्कृष्ट रस्त्यांच्या यादीमध्ये स्थान देऊन सन्मानित केलं होतं. तसंच ह्या यु.एस. रुट नंबर ६ चा पेनसिल्व्हेनीया राज्यातून जाणारा जो भाग आहे, त्याची “Car and Driver” ह्या मासिकाने, अमेरिकेतल्या १० सर्वोत्कृष्ट सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रस्त्यांमध्ये गणना केली आहे.
नवीन इंटरस्टेट हायवेज प्रमाणे यु.एस. रूट नंबर ६ हा काही सहा किंवा चार पदरी नाही, निदान मी फिरलेल्या भागात तरी तो दोन पदरीच आहे. त्याचं रूपही तसं जुन्या वळणाचं. सर्वसाधारण इंटरस्टेट हायवे प्रमाणे याच्यावर मोठमोठे फलक नाहीत किंवा Exit च्या मोठमोठ्या पाट्या नाहीत. हा आपला बर्यापैकी भारतीय रस्त्याचा भाऊबंद शोभेल असा आहे.
नवीन इंटरस्टेट हायवेज जितके प्रशस्त, आखीव आणि काळजीपूर्वक जपलेले आहेत, तितकाच हा यु.एस. रूट नंबर ६, गरीब आणि बापुडवाणा! नवीन इंटरस्टेट हायवेज म्हणजे आपल्याच तोर्यात असणारे, कोरडे, काटेकोर, अलिप्त आणि रुक्ष; तर यु.एस. रूट नंबर ६ म्हणजे गबाळा, दिलखुलास आणि अघळपघळ. एखाद्या शिष्ठ माणसाने कपड्याची घडी मोडू नये म्हणून पोरांपासून दोन हात दूर रहावं तसे इतर इंटरस्टेट हायवेज, शक्यतो वस्तीपासून दूर, शहराला वळसे घालून जाणारे. तर एखाद्या आजीने दोन चार शेंबडी लेंबडी नातवंडं अंगाखांद्यावर खेळवावीत तसा यु.एस.रूट नंबर ६, छोट्या छोट्या गावांना, वस्त्यांना अल्लाद कुरवाळत जाणारा!
Leave a Reply