नवीन लेखन...

अमेरिकेतील “यु. एस. रुट नंबर ६” – भाग २

My US Route Number 6 - Part 2

आम्ही राहतो ते “क्लार्क्स समीट” हे गाव पेनसिल्व्हेनीयाच्या ईशान्य कोपर्‍यात येतं. पेनसिल्व्हेनीयाचा हा भाग खूप डोंगराळ आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. ह्या भागातल्या डोंगरांच्या रांगांचं नाव “पोकोनो”. हा “अ‍ॅपलाचियन” पर्वतराजीचा एक भाग आहे. अ‍ॅपलाचियन ही काही एक सलग पर्वतराजी नाही. त्यात बर्‍याच छोट्या मोठ्या पर्वतरांगा समाविष्ट आहेत. ही पर्वतराजी कॅनडाच्या आग्नेय भागातल्या न्यू फाउंडलंड भागातून सुरू होते आणि अमेरिकेच्या पूर्वेकडील १४ राज्यांतून जात खाली थेट अलाबामा राज्यापर्यंत जाते. २४०० कि.मी. लांब आणि १६० ते ४८० कि.मी. रुंद अशी ही अजस्र नैसर्गिक भिंत, अमेरिकेच्या पूर्व भागाला इतर भागांपासून वेगळं करते. सुरवातीला जे युरोपियन्स आले ते सारे अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर थडकले आणि तिथेच त्यांच्या वस्त्या वसल्या. हळू हळू सारी पूर्व किनारपट्टी पादाक्रांत झाली. त्याकाळी अ‍ॅपलाचियन पर्वतराजीची ही नैसर्गिक भिंत हीच जणू विस्ताराची सीमा बनली होती. पुढे जसजशी मनुष्यवस्ती वाढूं लागली तसतशी ही भिंत ओलांडून लोकं पश्चिमेकडे जाऊ लागले आणि त्यानंतरच खर्‍या अर्थाने अमेरिकेचा विस्तार सुरू झाला.
ह्या पर्वतराजीचे स्थूलमानाने ३ भाग होतात.

उत्तर भाग – हा बहुतांशी अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू इंग्लंड भागामध्ये मोडतो. यामध्ये मेन राज्यातल्या लॉंगफेलो डोंगर रांगा, न्यू हॅंपशायरमधल्या व्हाईट डोंगर रांगा, व्हरमॉंट मधल्या ग्रीन डोंगर रांगा आणि मॅसेच्युसेट्स तसेच कनेक्टिकट मधल्या बर्कशायर डोंगर रांगांचा समावेश होतो.

मध्य भाग – हा न्यू यॉर्क राज्यातल्या हडसन नदीच्या खोर्‍यातून ते खाली व्हर्जिनीया राज्यापर्यंत पसरला आहे.

दक्षिण भाग – हा व्हर्जिनीया राज्याच्या खालच्या अंगापासून दक्षिणेला अलाबामा राज्यापर्यंत पसरला आहे.

अ‍ॅपलाचियन पर्वतराजीच्या आजूबाजूच्या छोट्या डोंगर रांगा, टेकड्या, पठारे या सर्वांची मिळून ही एक प्रचंड साखळी झाली आहे. ह्या मुख्य पर्वतराजीच्या पश्चिमोत्तर दिशेला टेकड्या आणि पठारांचा एक लांबच लांब पट्टा येतो. यात फारसे उंच डोंगर नाहीत. न्यूयॉर्क राज्यातली कॅटस्कील डोंगरराजी आणि पेनसिल्व्हेनीयातील पोकोनो डोंगरराजी ही दोन ठळक उदाहरणे. अ‍ॅपलाचियनच्या दक्षिण पूर्वेला, ब्ल्यू रिज अशी थोडीशी उंच अशी पर्वतराजी येते. ही टेनेसी, नॉर्थ कॅरोलायना, साऊथ कॅरोलायना या दक्षिणेकडील राज्यांतून जाते.

अ‍ॅपलाचियन पर्वत राजीतल्या शिखरांची सर्वसाधारण उंची आहे ३००० फूट (९०० मीटर). ६००० फूटांवरील सर्व शिखरे, दक्षिणेच्या ब्ल्यू रीज पर्वतराजीमध्ये एकवटली आहेत. त्या पर्वतराजीतले सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट मिचेल (नॉर्थ कॅरोलायना : उंची६६८४ फूट /२०३७ मी.)

पेनसिल्व्हेनियातली पोकोनो डोंगरराजी त्यामानाने खूजी. साधारण उंची १००० ते २००० फूट. २५०० फूटांपेक्षा उंच अशी जवळपास ६० शिखरे. पण एकंदर सर्व प्रदेश म्हणजे टेकड्या आणि डोंगरांच्या रांगांमागून न संपणार्‍या रांगा! (अ‍ॅपलाचियन पर्वतराजीची सह्याद्रीशी तुलना करण्याचा मोह आवरता येत नाही. सह्याद्रीचा विस्तार त्यामानाने कमी आहे – १६०० कि. मी. लांब, पण उंची मात्र जास्त. सह्याद्रीची साधारण उंची आहे ३६०० फूट (१२०० मी.) तर कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे ५४०० फूट (१६४६ मी.)

उत्तर दक्षिण पसरलेली अ‍ॅपलाचियन पर्वतराजी (त्यातल्या पेनसिल्व्हेनीयातल्या पोकोनो डोंगररांगा) आणि त्यातून वाट काढत पूर्व पश्चिम जाणारा यु.एस. रूट नंबर ६, यांच्या संगमाशी आमचं छोटसं क्लार्क्स समीट हे गाव आहे. माझी लॅब देखील यु.एस. रूट नंबर ६ वरच, पश्चिमेला ३० मैलावर आहे. त्यामुळे माझा लॅबला जायचा यायचा रोजचा ६० मैलांचा प्रवास हा गर्द झाडीने भरलेल्या, डोंगर टेकड्यांच्या, खळाळत्या नद्यांच्या आणि ओढ्यांच्या सान्निध्यातून जातो.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..