नवीन लेखन...

अमेरिकेतील “यु. एस. रुट नंबर ६” – भाग ३

My US Route Number 6 - Part 3

हा ३० मैलांचा रस्ता बहुतांशी ग्रामीण भागातून जातो. फारशी कुठे सपाटी नाही. सगळा उंच सखल, टेकड्या दर्‍यांचा प्रदेश. छोटेखानी डोंगरांच्या, गर्द झाडीने भरलेल्या रांगांच रांगा. रस्ता सगळा घाटाच्या वळणाचा. रस्त्याला समांतर अशी सस्कुहाना नदी वाहते. ही वरती न्यूयॉर्क राज्यातून येऊन पेनसिल्व्हेनीयातून वाहत जाते. टेकड्यांच्या अधून मधून जातांना, काही वेळा ती यु.एस. रूट नंबर ६ ला बिलगून धावते तर काही वेळा एखाद्या वळणाआड अचानक नाहीशी होते. नदी आहे छोटीशीच. प्रवाह देखील एकंदरीत संथच. उन्हाळ्यात अगदीच आपल्या इंद्रायणीसारखी किंवा अहमदाबादच्या साबरमतीसारखी कोरडी पडत नाही एव्हढंच! काही वेळा रस्ता एखाद्या टेकडीच्या माथ्यावरून जात असतो आणि नदीचं बरंच मोठं पात्र वळणावळणानी खालून जातांना नजरेस पडतं. पावसाळ्याच्या दिवसांत कधी मधी नदी दुथडी भरून वाहते. झाडांच्या फांद्या, काटक्या, पाचोळा, मातकट रंगाच्या पाण्यातून वहात जात असतात. क्वचित पूर आलाच तर आजूबाजूच्या शेतांत, छोट्या रस्त्यांमधे पाणी शिरतं. पण एकंदरीत सस्कुहाना नदी ही दयार्द्र आणि सरळमार्गी!

नदीला मिळणारे चार-पाच छोटे छोटे ओढे यु.एस.रूट नंबर ६ च्या आजूबाजूनी किंवा रस्त्यावरच्या छोट्या पुलांखालून खळाळत जातात. त्यांना देखील पाणी कमीच. त्यामुळे दगड गोटे, मोडून पडलेल्या झाडांच्या फांद्या, पाला, पाचोळा असं सारं पाण्यावर तरंगत किंवा पाण्यातून डोकं बाहेर काढून बसलेलं दिसतं. कधी लख्ख ऊन पडलेलं असलंच तर या खळाळत्या पाण्यामध्ये सहस्र आरसे चमकताना दिसतात. काठावरच्या झाडांच्या सावल्या अंगावर वागवत, फारसा गाजावाजा न करता देखील, हे ओढे आपल्या अंगभूत सौंदर्याने आपलं अस्तित्व जाणवून देत असतात.

माझ्या लॅबला जायच्या रस्त्याला इतके लहान लहान रस्ते मिळतात की विचारता सोय नाही. बहुतेक सगळे खालच्या दरीतून चढून वर येणारे किंवा बाजूच्या टेकाडावरून उतरत येणारे. बरेचसे आपल्या लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर सारखे. काही तर चक्क कच्चे, मातीचे. कधी कधी त्या रस्त्यांवरून एखादी चुकार गाय किंवा डोक्यावर टोपल्यांतून करवंद घेतलेल्या कातकरी बायका येतील की काय असं वाटतं.

लॅबला जाण्यासाठी यु.एस.रूट नंबर ६ पकडला आणि आमच्या क्लार्क्स समीटच्या बाहेर पडलं की रस्त्यात थोडी फार घरं लागतात. त्यानंतर ५-६ मैलांवर एक कम्युनिटी कॉलेज लागतं. या कॉलेजचं छोटंसं प्रांगण सोडून आजूबाजूला काही वस्ती आणि एक गॅस स्टेशन लागतं. त्याच्या पुढे थोड्या अंतरावर फॅक्टरीव्हील नावाचं एक २००-४०० वस्तीचं छोटं गाव लागतं. ३० मैलांच्या या रस्त्यावर साधारण मधोमध टंकॅनीक हे त्यातल्या त्यात मोठं (३००० वस्तीचं) गाव येतं. गावाचं मोठंपण सार्थ करायला वॉलमार्ट आणि मॅकडोनाल्ड सारखी पूर्णपणे अमेरिकन संस्कृतीची खूण पटवणारी दुकानं आणि उपहारगृह आहेत. टंकॅनीकमधून रूट नंबर ६ बाहेर पडला की पुढे आणखी दोन-तीन अगदी लहान गावं आणि एक-दोन अगदी चार- पाच घरांच्या वस्त्या!

ही छोटी गावं, यु.एस. रूट नंबर ६ ने विभागलेली. रस्त्याच्या दुतर्फा जेमतेम २०-२५ घरं, एखादं चर्च, एखादं गॅसस्टेशन आणि त्याला लागून असणारं किराणा मालाच्या दुकानासारखं छोटसं कन्व्हीनीयन्स स्टोअर, एखादं रेस्टॉरंट, की गाव संपलं. गॅसस्टेशनवर, जुने खोचे पडलेले, पिक-अप ट्रक्स चालवणारे, फाटक्या जीन्स, अघळपघळ कपडे आणि बेसबॉल कॅप्स घातलेले एक-दोन गावकरी, गप्पा मारता मारता, रस्त्यावरच्या गाड्यांमधे कुणी ओळखीचा चेहरा दिसतोय का, हे न्याहाळत राहणारे. रेस्टॉरंट्स देखील अशीच घरगुती, मॅकडोनाल्ड किंवा के.एफ.सी. सारखी नव्हेत. सकाळी आठ नऊच्या सुमारास गावातले आजी, आजोबा आपापल्या गाड्यांतून उतरून हळूहळू चालत रेस्टॉरंट्समध्ये ब्रेकफास्टसाठी जाताना दिसतात. ही रेस्टॉरंट्स सकाळी कधी चालू होतात कुणास ठाऊक पण दुपारी चार पाच वाजेपर्यंत ती बंद झालेली दिसतात.

वाटेतली गावं, गॅसस्टेशन्स सोडली तर इतर बहुतांशी जमीन दाट झाडीने आणि उघड्या गवताळ कुरणांनी भरलेली. मधे मधे फार्मस् विखुरलेले. बहुतेक फार्मसवर थोड्याफार मोडकळीस आलेल्या शेड्स, धान्य साठवायच्या उंचच उंच कणग्या (tower silos) ट्रॅक्टर्स आणि इतर शेतीची अवजारं, अर्धवट मोडलेली कुंपणं, असा सगळा परिचित देखावा. इथे दुधाळ गायी आणि बीफ गायी अशा दोन्ही प्रकारच्या गायींचे फार्मस् आहेत. त्यामुळे कुरणामध्ये काळ्या पांढर्‍या दुधाळ गायी किंवा तांबड्या काळ्या बीफ गायी चरतांना दिसतात. काही घरांच्या आसपास, एखाद्या छोट्या, वेगळ्या कुंपणामध्ये घोडे चरताना दिसतात. रस्त्यापासून थोडे आंत असे दोन मेंढ्यांचे फार्मस् आहेत. त्यामुळे झाडांच्या आणि घरांच्या मधून किंवा मागे, कधी कधी मागच्या टेकडीच्या उतारावर चरणार्‍या मेंढया आणि त्यांची बछडी दृष्टीस पडतात.

मधेच दोन चार ठिकाणी रस्त्याकडेच्या माळरानावर, एखाद्या छोट्याश्या टेकाडावर १५-२० थडगी दिसतात. ही कधी काळी वापरात असलेली दफनभूमी. आता त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसलेली. आसपास उगवलेल्या रानगवतांतून डोकावणारे हे थडग्यांचे दगड मोठे केविलवाणे दिसतात. कोण असतील ते लोक? कुठली जुनी वस्ती असेल कुणास ठाऊक. कधी काळी आजूबाजूला काही घरं असतील, लोकांनी शेतीभाती करायचा प्रयत्न केला असेल आणि मग काही कारणाने, सारं गावठाण उठून दुसरीकडे निघून गेलं असेल. किंवा १५०-२०० वर्षांपूर्वी, जेंव्हा रस्ते नव्हते आणि लोकं अ‍ॅपलाचियन पर्वतराजी ओलांडून चालत किंवा घोडागाड्यांतून मजल दरमजल करत, पश्चिमेकडे नवीन जीवन सुरू करण्याच्या आशेने जात होते, तेंव्हा वाटेत मरण पावलेल्यांना असंच रस्त्याच्या कडेला दफन करत असत. तशी तर ही थडगी नसतील? किंवा इथल्या स्थानिक नेटीव्ह अमेरिकन टोळ्यांबरोबरच्या संघर्षात मरण पावलेले लोक तर नसतील?

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..