MENU
नवीन लेखन...

मृत्यूपश्चातचे विधी – माझी भूमिका

जातस्य ही ध्रुवो मृत्यु: ध्रुवं जन्म मृतस्य च |

तस्मात् अपरिहार्येर्थे न त्वं शोचितुमर्हसि || गीता २.२.७

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला जन्म नक्की आहे त्यामुळे तू याविषयी शोक करणे योग्य नाही असे गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत.

मृत्यू हा अटळ आहे, त्याला पर्याय नाही , ती मनुष्य जीवनाची अनिवार्यता आहे. असे असले तरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही नक्कीच सुखावह घटना नाही. जवळच्या आप्ताचा, स्नेहीजनाचा मृत्यू अनुभविताना कोणत्याही सहृदय माणसाचे मन हेलावते, शोकमग्न होते.

भारतीय विशेषत: हिंदू परंपरेत संस्कार या संकल्पनेला विशेष महत्व  आहे. सं म्हणजे चांगले आणि कृ म्हणजे करणे. संस्कार म्हणजे ज्याच्यायोगे मानवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढवली जाते असे क्रिया-कलाप. मानवी जन्माच्या आधीपासून( गर्भाधान संस्कार) ते त्याच्या मृत्यूनंतरही ( दाहकर्म व श्राद्ध) केले जाणारे संस्कार हिंदू  जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था,प्रेम , सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म  व श्राध्द या विधीकडे पाहिले पाहिजे  असे वाटते.  आपण शतकानुशतके  अनेक  धार्मिक विधी अतिशय आस्थेने व श्रद्धेने करीत असतो. तथापि त्यामागील आशय समजून घेण्याची मानसिकता आपल्यामध्ये अभावानेच आढळते.त्यामुळे दाहकर्म आणि विशेषत: श्राद्धविधी  याविषयीचे विवेचन-

भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणा-या वैदिक साहित्यात ;मृत्यूनंतर केल्या जाणा-या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ  आढळतात.दहनप्रसंगी म्हटल्या जाणा-या प्रार्थनेत मृत शरीराला स्वत:मध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे.  दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे.जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले आहे. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून  प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा.  त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा.

दहनविधी करीत असताना तो पर्यावरणाला घातक नसावा असेही वाटते. काही समाजगटात चिता रचून दहन करण्याची पद्धत दिसून येते. झाडे तोडून पर्यावरणाचा होणारा –हास थांबविणे काळाची गरज आहे, त्यामुळे त्यावर सर्वांनी मिळून विचार करणे स्वागतार्ह आहे.

काही ठिकाणी  व समाजगटात स्मशानभूमीत शव घेऊन जाताना सोबत अग्नी नेण्याची प्रथा आहे. वैदिक काळात प्रत्येक अग्निहोत्री  गृहस्थाच्या घरात तीन प्रकारचे अग्नी स्थापन केली असत. आहवनीय म्हणजे दररोजच्या आहुती देण्याचा अग्नी. गार्हपत्य म्हणजे स्वयंपाकाचा अग्नी. आणि दक्षिण अग्नी म्हणजे दहन प्रसंगी वापरला जाणारा अग्नी. अग्नी प्रज्वलित करणे ज्या काळात व्यवहारत: कठीण होते त्याकाळात प्रज्वलित असा नीट सांभाळलेला अग्नी मडक्यात घालून सोबत नेला जात असे ज्याच्यायोगे चिता पेटविणे सुलभ होत असे.

दिवंगत व्यक्तीचे प्रतीक म्हणून अश्मा आणला जातो. दहनविधीमध्ये पाण्याने भरलेला घडा मृत शरीराभोवती अप्रदक्षिण म्हणजे उलट दिशेने फिरविला जातो. पाण्याने भरलेला घडा हे चैतन्यमय शरीराचे प्रतीक आहे. तो घडा ज्या खड्यामुळे फोडला जातो त्याला अश्मा किंवा जीवखडा म्हटले जाते. घडा फुटल्यावर त्यातील सर्व पाणी निघून जाते. म्हणजेच शरीरातून चेतना बाहेर पडल्याचे हे प्रतीक आहे. घटाकाशातून चैतन्य बाहेर पडले आणि महाकाशात विलीन झाले याचेही हे प्रतीक ! अग्नीच्या ज्वालांना प्रतिरोध करणे हे ही पाणी फिरविण्याचे व्यावहारिक कारण असू शकेल असे वाटते.

दहनविधीनंतर अस्थीविसर्जन केले जाते. त्यावेळी विसर्जनापूर्वी अस्थींवर दूध शिंपडले जाते.माक्याची पाने आणि पांढरी फुले अर्पण केली जातात. दहनप्रसंगी मृत शरीराला दाह होतो. तो दाह शांत व्हावा, थंडावा मिळावा अशी हृद्य भावना या कृतीमागे असावी असे वाटते. माका , पांढरी फुले ही दहनोत्तर पूजनात दिवंगतासाठी वापरली जाता असा संकेत रूढ आहे.

यानंतर दहा दिवसपर्यंत दिवंगत व्यक्तीसाठी भात व पाणी घराबाहेर ठेवण्याची पद्धत आहे. त्याच्यासाठी दिवा लावून ठेवण्याची पद्धत आहे. चालत्या-बोलत्या जिवंत व्यक्तीला ज्या गोष्टी दैनंदिन म्हणून आवश्यक असतात त्या त्याच्या मृत्यूनंतरही त्याला आवश्यक वाटत असाव्यात अशी हृद्य भावना यामागे असावी.

दहाव्या दिवशी केला जाणारा काकस्पर्श विधी हा अशाच हृद्य भावनेचे प्रतीक आहे असे वाटते. जिवंतपणी  मनात असलेल्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्याचा एक उपाय या विधीद्वारे आपल्याला मिळतो.आपल्या जवळच्या व्यक्तीच्या इच्छा त्याच्या निधनानंतरही पूर्ण करण्याची संधी आपण घेणे व त्यानिमित्ताने दिवंगताला आपली श्रद्धांजली अर्पण करणे महत्वाचे आहे.

अकराव्या दिवशी केले जाणारे श्राध्द म्हणजे एकोद्दिष्ट. ज्याप्रमाणे आपण देवतांचे पूजन करतो त्याप्रमाणे काळे तीळ, माका,लोकर, गोपीचंदन , पांढरी फुले अर्पण करून आपण दिवंगताचे पूजनच करतो. अन्नमय शरीराचे  प्रतीक म्हणून आपण भाताचे पिंड करतो. आपल्याकडे तांदूळ सहज उपलब्ध आहे, त्याप्रमाणे गुजरात प्रांतात कणकेचे पिंड करतात.

बाराव्या दिवशी आपण दिवंगत आणि त्याच्याजोडीने त्याच्या आधीच्या तीन दिवंगत पिढ्या आमंत्रित  करतो आणि चार पिढ्यांचे एकत्र पूजन करतो. नंतर दिवंगताच्या पिंडाचे तीन समान भाग करतो आणि एक-एक भाग तीन पिढ्यांच्या प्रत्येक पिंडात मिसळतो. निधनापूर्वी व्यक्ती आपल्या कुटुंबियांबरोबर रहात असते. समूह जीवनाचाही आनंद घेत असते. तोच अनुभव त्याला मृत्यूनंतरही मिळावा अशी भावना यामागे असावी.

श्राध्द या शब्दामध्ये श्रद्धा असा मूळ शब्द आहे. श्रद्धया क्रियते यत् तत् श्राद्धम् | जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध. त्यामुळे श्राद्धविधीमधे दिवंगताबद्दल आस्था, प्रेम, आदरभाव असणे महत्वाचे आहे.

श्राद्धप्रसंगी दिवंगताच्या संतोषासाठी छत्री, चपला, वस्त्र,घडा, बिछाना, धान्य, अशा विविध गोष्टी दान करण्याची प्रथा आहे. सुवासिनी स्त्री दिवंगत असेल तर सौभाग्यवाण, चांदी व सोन्याचे दागिने देण्याची प्रथा अजूनही प्रचलित असल्याचे दिसते. वस्तुत: अशा दानांमुळे दिवंगताला काय लाभ होईल हे सांगणेही कठीण आहे. पण गरजू व्यक्ती वा संस्था शोधून त्यांना उपयुक्त वस्तू दिवंगताच्या स्मरणार्थ देण्याची पद्धती आधुनिक काळात अवश्य वापरावी.

ज्या विधीची अनिवार्यता आपल्या प्रत्येकाच्या  आयुष्यात अटळ आहे त्याविषयी आपली भूमिका प्रत्येकानेच ठरविली पाहिजे. आधुनिक काळात दहन संस्काराऐवजी  देहदान केले जाते. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणा-या  विध्यार्थ्यांना आपला देह उपयोगी पडतो. मरणोत्तर नेत्रदान केल्याने मरावे परी नेत्ररूपी उरावे हा विचार जोपासला जाईल. अवयव, त्वचादान  यासारखी दानेही मरणोत्तर करण्यासारखी आहेत.

बदलत्या काळाला अनुसरून , तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपण आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत. नवे बदल, विचार सहजपणे आत्मसात करीत आहोत. असे असताना मात्र गेली अनेक शतके चालत आलेल्या परंपरा नव्याने मांडण्याचा विचार आपण  फार पटकन स्वीकारत नाही ! त्यामुळे अशुभ, अपवित्र मानल्या गेलेल्या मृत्यूपश्चातच्या विधींकडेही आपण गूढ भावनेने पाहतो!

गीतेत सांगितले आहे की  मनुष्यजन्मात केलेल्या चांगल्या-वाईट कर्मानुसार आपल्याला गती मिळते. आपण केलेल्या धार्मिक कृत्यांमुळे  दिवंगताला शांती मिळेल की नाही याचा अनुभव आपण घेवू शकत नाही हे हे खरे! त्यामुळे सामाजिक स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने मृत शरीराची  आदरपूर्वक योग्य व्यवस्था लावणे आणि श्रद्धेने  दिंवगताचे स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे स्वागतार्ह ठरावे असे मत नोंदवावेसे वाटते.

— आर्या आशुतोष जोशी

Avatar
About आर्या आशुतोष जोशी 21 Articles
संस्कृत विषयातील विद्यावाचस्पती पदवी. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, इतिहास या विषयातील संशोधन आणि लेखन, व्याख्याने आणि शोधनिबंध

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..