एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. हिंदी सिनेमात एन. दत्ता हे नाव प्रथितयश संगीतकारांच्या श्रेणीत आदराने घेतलं जावं अशी नेत्रदीपक सांगीतिक कामगिरी त्यांच्या नावावर जमा आहे. एकापेक्षा एक सरस व यादगार गाणी एन. दत्तांनी या चित्रपटात दिली आहेत. एन. दत्ता यांचे खरे नाव दत्ता नाईक.
एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते. मा.एन. दत्ता हे गोवेकर अगदी लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
एस.डी. बर्मन यांच्या ‘बुजदिल’ मधील लताबाईंचं शास्त्रीय सुरावटीतील ‘झन झन झन पायल बाजे’ हे लोकप्रिय गाणं एन. दत्ता यांचं असल्याची चर्चा त्या काळी सर्वत्र होत होती. पुण्यातील एका समारंभात पु.ल. देशपांडेंनी एन. दत्ता यांचे नाव न घेता या गाण्याचे श्रेय एका मराठी माणसाचे असल्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. लता मंगेशकरांबरोबर महेंद्र कपूरने गायलेलं ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ हे शायरी ढंगातलं युगुलगीत व ‘धडकने लगी दिल के तारों की दुनिया’ हे महेंद्र कपूर व आशाभोसलेच्या स्वरातलं चिरतरुण प्रेमगीत एन. दत्तांनी अप्रतिम सुरावटीत बांधलं आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे अर्थपूर्ण गाणं रफीच्या, तर ‘कासे कहूं मन की बात’ हे गाणं सुधा मल्होत्राच्या अजरामर गाण्यांपैकी एक समजलं जातं. ‘झुकती घटा गाती हवा सपने जगाए.’ या कर्णमधुर गाण्याच्या मुखडय़ाची चाल गजानन वाटवेंच्या ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या गाण्यावर बेतलेली आहे, हे एका मुलाखतीत एन. दत्तांनी सांगितले होते. बी.आर. चोप्रांचा ‘साधना’ हा चित्रपट एन. दत्तांच्या कारकिर्दीच्या दृष्टीने ‘टर्निग पॉइंट’ होता. या चित्रपटात त्यांनी मुजरा, कव्वाली, भक्तिगीत, प्रेमगीत व सामाजिक आशयाची गाणी देऊन आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं.
लता मंगेशकर यांच्या स्वरात ‘कहोजी तुम क्या खरीदोगे’ हा साहिरच्या अभिजात काव्याने नटलेला मुजरा एन. दत्तांच्या लाजवाब प्रतिभेचा उत्तुंग आविष्कारच म्हणावा लागेल. मोहम्मद रफी आणि बलवीरने गायलेल्या ‘आज क्यों हमसे परदा है’ या कव्वालीला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रफीने आशा भोसलेबरोबर गायलेलं ‘संभल ऐ दिल तडपने और तडपाने से क्या होगा’ या अवीट गोडीच्या गाण्याची खुमारी औरच होती. ‘औरत ने जनम दिया मर्दों को’ हे ठाय लयीतलं अजरामर गाणं एन. दत्तांच्या मुकुटात मानाचं शिरपेच खोवून गेलं. ‘साधना’मुळे एन. दत्तांचं नाव प्रथितयश संगीतकारांच्या बरोबरीने घेतलं जाऊ लागलं. १९५९ साली आलेल्या ‘ब्लॅक कॅट’ चित्रपटात ‘सितारे राह तकते है चले आओ’, ‘नशे में तुम नशेमे हम’, ‘कौन मुझे रोके कौन मुझे टोके’ यांसारखी चांगली गाणी एन. दत्ता यांनी दिलेली असली तरी हा चित्रपट आठवतो तो लता मंगेशकरांनी गायलेल्या ‘मैं तुम्हीसे पुछती हूं’ या सदाबहार गाण्यामुळेच! त्यांनी तेरा मराठी चित्रपटांना संगीत दिले होते. १९८० साली प्रदर्शित झालेला ‘चेहरे पे चेहरा’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. महाराष्ट्र शासनाने नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. मा.एन.दत्ता राहत असलेल्या अंधेरी भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळच्या रस्त्याला मुंबई महापालिकेने ‘एन. दत्ता पथ’ असे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर
संदर्भ :- इंटरनेट
मा.एन. दत्ता यांनी संगीत दिलेली काही चित्रपटगीते.
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
धुंदीत गाऊ मस्तीत राहू
माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, संसार मांडते
निळे गगन, निळी धरा
तेरे प्यार का आसरा चाहता हूं
कासे कहूं मन की बात
Leave a Reply