नवीन लेखन...

मराठी कवी, गीतकार, ना.धों. महानोर

महानोरांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. ते सगळ्यांत थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली, कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामंही केली. मॅट्रिक झाल्यानंतर ते जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत दाखल झाले. या महाविद्यालयात म. ना. अदवंत, राजा महाजन अशा ‘साहित्यिक’ प्राध्यापकांकडून महानोरांना भरपूर प्रोत्साहन मिळालं, परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना त्यांची गरज होती. महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले.

ना. धों. महानोर या रानकवीने मराठी साहित्यावर अमीट नाममुद्रा उमटवली आहे. त्यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी, त्यातल्या रंग-गंधांनी, नदीच्या प्रवाहासारख्या नाद-लयींनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे. रानात राहणारा हा कवी निसर्गाची भाषा बोलतो, निसर्गाशी संवाद करतो, रसिकाचं बोट धरून त्याला निसर्गात घेऊन जातो. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. या कवितेत निसर्गाचे विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत, निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला व रोमांचित करणारा शृंगार आहे. या कवितेत मातीशी जडलेली नाती आहेत, त्यातल्या वेदना-संवेदना आहेत. महानोरांची उत्कट अभिव्यक्ती रोमँटिक-भावनिक वळणाने जाते. महानोरांनी गद्य लेखनही भरपूर केलं आहे. ‘गांधारी’ ही कादंबरी, ‘गपसप’ व ‘गावाकडच्या गोष्टी’ हे लोककथांचे संग्रह, ‘ऐशी कळवळ्याची जाती’ हा व्यक्तिचित्रणात्मक ललित लेखांचा संग्रह असं विविधांगी ललित लेखन त्यांच्या नावावर आहे. याशिवाय ‘यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार’, ‘शरद पवार आणि मी’ तसेच ‘आनंदयोगी पु.ल.’ या पुस्तकांमधून त्यांनी महाराष्ट्रातील ही मोठी व्यक्तिमत्त्वं उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, महानोरांचं पहिलं प्रेम कवितेवरच आहे. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी कवितेत त्यांचं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. त्यांचे ११ कवितासंग्रह व ‘अजिंठा’ हे खंडकाव्य प्रकाशित आहे. ‘वही’ आणि ‘पळसखेडची गाणी’ हे त्यांच्या लोकगीतांचे संग्रह आहेत. त्यांनी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. ‘जैत रे जैत’ या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्यांच्या रूपाने आविष्कृत झाल्या आहेत.

महानोरांचं लोकसाहित्याबद्दल प्रचंड प्रेम व जिव्हाळा आहे. या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीतं व लोककथा शोधून, एकत्रित करून संग्रहरूपाने त्यांचा परिचय महाराष्ट्राला घडवला आहे. यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. ‘वही’ हा मराठवाड्यात लोकप्रिय असलेला लोकगीतांचा प्रकार. महानोरांनी लिहिलेल्या ‘वह्या’ त्यांच्या ‘वही’ या संग्रहात आहेत.
‘चांद केवड्याची रात आलीया सामोरा
राजा माझ्या अंबाड्याला बांधाया गजरा’
अशी भावुक, मधाळ शब्दकळा लाभलेल्या ‘वही’चं राजस रूप असं आहे,
‘राजसा… जवळि जरा बसा
जीव हा पिसा तुम्हाविण बाऽईऽ
कोणता करू शिणगार सांगा तरि काऽही!’

विलक्षण लयकारी लाभलेल्या या कवीने मुक्तछंदही भरपूर लिहिला आहे. ‘प्रार्थना दयाघना’ मुक्तछंदात आहे, ‘अजिंठा’तली गिल-पारूची कथा मुख्यत्वाने मुक्तछंदात आहे आणि ‘तिची कहाणी’सुद्धा. महानोरांच्या कवितेचे असे विविध पैलू आहेत. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..