२३ मार्च १९३१ हा शहीद दिवस म्हणून ओळखला जातो.. ज्या ऐतिहासिक दिवशी भगत सिंह ,सुखदेव आणि राजगुरु हे तिघे वीर पुरुष हसत हसत, भारतासाठी फासावर चढून शहीद झाले. त्या काळी कितीतरी जवान वीरांनी क्रांतिकारी होण्याचा निर्णय घेऊन कायमचा घराला राम राम केला असणार आणि त्याची दखलही आपल्या इतिहासाने घेतली नसेल. पण हे क्रांतिकारी म्हणजे नेमके कोण? कशापासून बनले असतील असा प्रश्न नेहमी पडतो. ही नुसती हाडामासाची माणसं असती तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक? केवळ देशासाठी फासावर जाण्यातच त्यांची देशभक्ती दिसून येत नसेल हे निश्चित. मग असा काय पैलू असेल बरं जो त्यांना असामान्य ठरवतो? याचं उत्तर मला मिळालं या पुढील प्रसंगातून.
आज या दिवसाचं औचित्य साधून भगत सिंह यांच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगांबद्दल लिहावंसं वाटलं ..
“शेतात बंदूक पेरली तर त्यातून हजार बंदुका उगवतील”…लहानग्या भगत चे हे विचार..
भारत देशाप्रति असलेली नितांत श्रद्धा व समर्पण भाव, आपल्या देशावर असलेलं नितांत प्रेम आणि देशाला सशस्त्र क्रांतीतून स्वातंत्र्य मिळावं हे रक्तातंच असलेलं, भगत सिंह नावाचं हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होतं.
देशासाठी आपलं घरदार सोडण्यापासून ते पंडित चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान सोशलिस्ट रीपब्लिकन असोसिएशन ची स्थापना होईपर्यंतचा मोठा काळ भगत सिंह यांनी पाहिला..
या सगळ्या दरम्यान अनेक घडामोडी घडत गेल्या..
रिकाम्या पोटी काहिही काम करणं जिथे अशक्य असतं, तिथे पोटाला चिमटा लावून , वेळप्रसंगी 8-8 दिवस उपासमार करून, भगत सिंह आणि त्यांचे साथीदार लढत राहिले ते भारत भूमी स्वतंत्र व्हावी या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर.
त्यांची क्रांती ची संकल्पना ही म्हणजे बॉंब- गोळ्या- हिंसा-विध्वंस कधीच नव्हतीच. जुलमी राजवटीचा विध्वंस करून जेव्हा समाज व्यवस्थेत अमूलाग्र बदल होईल आणि देशासाठी एक सशक्त समाज उभा राहील तेव्हा खरी क्रांती घडेल हे उदात्त हेतू ते उरी बाळगून होते..
हे सगळं वाचून सर्वसामान्यांचा असा समज होईल की या साठी मनाने कोडगं, भावना शून्य असावं लागतं..पण इथेच भगत सिंह सर्वांपेक्षा वेगळे ठरतात..त्यांच्याविषयीचा पुढील अनुभव वाचल्यानंतर जाणवते ती त्यांची हळवी बाजू..
फाशी ची शिक्षा मिळाल्यानंतर एक दिवस जेलर साहेब भगत यांना मोठ्या संकोचाने पण शेवटची इच्छा विचारायला आले..त्यावर “मला बेबेजींच्या हातची रोटी खायची आहे” असं उत्तर त्यांनी दिलं..
भगत सिंह यांच्या माताजी दूर होत्या तेव्हा रोटीची व्यवस्था करायची कशी असं त्यांनी विचारलं..भगत हसून म्हणाले,” माताजी इथेच आहेत शेजारी..थांबा मी बोलावतो”.. जेलर जरासे गोंधळले..
भगत सिहांनी हाक मारताच शेजारून मेहेतर आत आला आणि मुजरा करत” मला बोलावलं धनी?” असं विचारलं..जेलर साहेब,” मला याच्या हातची रोटी खायची आहे”.
हे ऐकून जितका जेलर गोंधळला त्याहूनही अधिक मेहेतर ओशाळला..” नाही नाही..माझ्या हातचं खायला घालायचं पाप माझ्याच हातून होणार नाही धनी..मेरे हाथ ऐसे नही की उनसे बनी रोटी आप खाये”
त्यावर भगत सिंह मेहेतरचे दोन्ही खांदे थोपटत जे म्हणाले ते असं..
“अरे असं म्हणू नकोस भाई, तुझे हे हात मला माझ्या बेबेजींची आठवण करून देतात..म्हणून तर मी तुला बेबेजी म्हणतो..”
जेलरकडे वळून पुढे भगत सिंह म्हणाले;” जीवन मे दो को ही मेरी गंदगी उठानेका काम मिला है। एक मुझे जन्म देनेवाली माँ, मेरी बेबेजी और दुसरी यह, मेरी जमादार माँ।
हे ऐकताच तो जमादार आनंद आश्रुंमधे न्हाऊन निघाला..कमळ जिथे चिखलात वाढतं तिथेच एक दिवस अचानक त्या चिखलाला कमळ होण्याचा मान मिळाल्यावर त्याला जसं वाटेल तितकाच विलक्षण आनंद त्या जमादाराला त्या दिवशी झाला.
त्याच्या घाणीत काम करणा-या हातांना भगत यांनी आईपणाचा मान दिल. एवढेच नाही तर आई ज्या हक्काने घाण साफ करेल तशी प्रेमाने दोन घास खाऊही घालेल तेव्हा मला तुझ्या हातची गरम गरम रोटी खायची आहे असा प्रेमाचा हट्ट सुद्धा या जमादाराकडे भगत सिंह यांनी केला..त्या सोबत भाजी कुठलीही आण बरं का..मला सगळं आवडतं..किंवा नुसती चटणी सुद्धा चालेल..असं सहज भाष्य करून भगत यांनी वातावरण अलगद हलकं केलं..
स्पृश्य अस्पृश्य च्या मर्यादाच गळून पडल्या जणू..तूही माणुस आणि मीही..तूही तेच जेवतोस जे मी जेवतो..मग कर्मावरुन कुणाला कमी लेखण्याचा प्रश्नच कुठे आला? भगत सिंहाने जमादाराला मोठेपण दिलं नाही तर त्याच्यातल्या माणसाला मोठेपण दिलं..
या सगळ्या बद्दल वाचत असताना डोळे पाणावले आणि तेव्हा या बद्दल नक्की लिहावं हे ठरवलं.
भगत सिंह यांच्या सारख्या क्रांतीकारक पुरुषाकडून केवळ त्यांची धडाडीच घेण्यासारखी नाही.. त्या सोबत शिकण्यासारखी आहे त्यांची विनम्रता, संवेदनशीलता आणि जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन. राजकैदी म्हणून आपल्याला मानाची वागणूक मिळावी यासाठी आपल्या साथीदारांसह 58 दिवसांचं उपोषण करणारे भगत सिंह, जमादाराचा सन्मान करायलाही चुकले नाहीत. आपल्या देशात काम करणारा एक जमादारही या देशाचा सन्माननीय नागरिकच झाला आणि त्याला भारतीय नागरिकांकडून मनाची वागणूक मिळणं ही सुध्दा देशभक्तीच झाली हे विचार ज्यांच्यात
बीजरूपाने असतात, ते म्हणजे क्रांतिकारी , जे सर्वार्थाने देशाची उन्नती, प्रगती आणि क्रांती करायला झटत असतात. क्रांती म्हणजे आपला देश आणि आपल्या देशातील माणसाला मोठं करणं . क्रांती म्हणजे असा विचार प्रत्येक भारतीय नागरिकाला करायला शिकवणं.
आज शहीद दिवसाचं औचित्य साधून सरदार भगत सिंग संधू यांच्या , आपण न जाणून घेतलेल्या पैलूबद्दल लिहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे.
भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्यासारख्या संवेदनशील क्रांतीकारी महावीरांनी जिथे जन्म घेतला त्याच भारत देशात जन्म घेण्याचा मान आपल्याला मिळाला याचा सार्थ अभिमान वाटतो..
— गौरी
संदर्भ: इन्कलाब (सौ. मृणालिनी जोशी )
Image : google
फारच सुंदर विचार आणि लिखाण.खूपच छान
धन्यवाद?