नवीन लेखन...

न संपणारा प्रवास…

पूर्वी प्रवास म्हटलं की कंटाळा यायचा, नको वाटायचं. पण म्हणतात ना ज्या गोष्टींपासून आपण पळतो तिचं गोष्ट आपल्याकडे तेवढ्याच वेगाने येत असते. आता बघा ना माझ्या बाबतीत तेच झालं. लग्नाच्या अगोदर प्रवास म्हटलं की नुसता वैताग यायचा, मी कुठेच जात नव्हते. माझं आयुष्य घर आणि ऑफिस एवढंच होतं. पण नवऱ्याची एन्ट्री झाली आणि न आवडणारा प्रवास माझ्या आयुष्यातला एक घटक कधी झाला हे कळलंच नाही. एखाद्या पक्ष्याप्रमाणे आमचं ही घरटं कधी या झाडावरून त्या झाडावर फिरत असतं. नवऱ्याची फिरती नोकरी असल्यामुळे त्यांची वेगवेगळ्या राज्यात बदली होत असते. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आमचं बस्तान सारखे हलवाव लागतं.

लग्नानंतर काही दिवस तर मला याचा खूप त्रास झाला. नवऱ्याला तर याची सवय होतीच पण ‘घर कोंबडी’ असणाऱ्या मला मात्र हे नकोस वाटायचं. काय सारखं इकडून तिकडे सामान घेऊन फिरायच असच वाटायचं. पण आम्हा बायकांना adjusment करायची तर सवयच, हे बाळकडू आम्हाला लहानपणापासूनच दिले जातात. असो दिवस जात गेले तसे मी पण स्वतःला समजावले आणि याची सवय करून घेतली. आता मला ट्रेन नी प्रवास करायला आणि त्यातच खिडकी जवळची सीट तर प्रचंड आवडते. खिडकीतून सोबत चालणारा चांदोबा मामा, हिरवीगार डोलणारी झाडं वनांतून, डोंगर-दरीतून दिसणाऱ्या नयनरम्य निसर्गाचे अद्भुत दर्शन घडते आणि सोबतीला आमचे राव मग आणखी काय हवं.

सध्या आमची बदली पंजाब राज्यातील जालंधर या शहरात झाली आहे. महाराष्ट्रापासून सुमारे २२०० किलोमीटर दूर. भाषा, खाद्य संस्कृती, पेहराव अगदी सगळच इथे वेगळे, मख्खन ( लोणी) शिवाय तर जेवण अपूर्णच. त्यातच ग्लास भर लस्सी सोने पे सुहागा…. विसरलेच सांगायचे ” मक्के दी रोटी आणि सरसो का साग ” पंजाब मध्ये खाल्ल नाही तर मग काही अर्थच नाही. महाराष्ट्रापेक्षा येथील लोकांचे जेवण थोडे पचायला जड असते, वजन वाढतं पण या जेवणाची मज्जा काही निराळीच. शिवाय लोकांच्या भाषेमध्ये वेगळाच गोडवा जाणवतो, ओळख नसली तरी त्यांच्यात आपुलकी मात्र आपल्या माणसासारखी आहे. खरं सांगायचं तर कधी जाणवलं नाही आम्ही परराज्यातून आलोत. शिवाय तुटकी का होईना पंजाबी भाषा पण शिकले. चंगा जी, ससरीया काल, हांजी, हे काही शब्द मला प्रचंड आवडतात. येथील हिरवी रान, दूरवर पसरलेली डोलदार पिकं अन् पक्ष्यांचा मधुर चिवचिवाट माझं मन प्रसन्न करते. कधी वाटत एखाद्या पक्ष्याप्रमाणे खूप उडावं या रानातून त्या रानात सैर करून यावं.

आमच्या संकटाच्या वेळी हाच प्रवास सोबत होता. कधी हसलो आणि कधी रडलोही पण त्याने साथ सोडली नाही. अनेकदा वाटा भरकटल्या ही पण त्यानेच नवी वाट दाखवली. या प्रवासातूनच मी शिकले, नजरेला वाईट आणि चांगलं दोन्ही दिसतं पण आपण फक्त चांगलं आपल्या पदरी घ्यायचं अन् पुढच्या प्रवासाला निघायच. आयुष्य हा ही एक प्रवासच आहे ना, रोज एका नव्या वळणावर घेवून जातो, पण तिथे कधी थांबत नाही, दुःख आले तरी पुढे जातो आणि सुख आले तरी पुढे जातो. प्रवासाने जीवन जगण्याचा माझा दृष्टीकोनचं बदलला. कुठल्या वळणावर कोण तुम्हाला भेटेल आणि शिकवून जाणार हे सांगता येत नाही. प्रत्येक लहान – सहान गोष्टी आपल्याला खूप काही शिकवुन जातात, फक्त ते आत्मसात करण्याची कुवत आपल्यात असायला हवी.

माझ्या नवऱ्याच्या नोकरी मुळेच मी वेगवेगळ्या संस्कृतींचा मनसोक्त आनंद लुटते आहे. या प्रवासाने मला माणसे जोडायला शिकवलीत. रक्ताची नव्हे पण प्रेमाची, आपुलकीची बरीच माणसे मी कमावली आहेत. आपण ज्या गावात, राज्यात जन्माला आलो तेवढंच जग आपलं, असं समजून आपण जगत असतो. या जगाच्या बाहेर निघण्याचा आपण थोडाही प्रयत्न करत नाही. आपल्या देशाला विविध संस्कृतीने नटलेला देश असे उगाच थोडी म्हटले जाते. प्रत्येक राज्याची वेगळी ओळख, संस्कृती आहे, या विविधतेचा आपण पुरेपूर आनंद घ्यायलाच पाहिजे. पण बरेच जण या गोडीचा आनंद न लुटता आपलं-परकं करण्यातच अखं आयुष्य खर्ची घालतात. तेव्हा मात्र मला वाईट वाटतं.

आपण वेगवेगळ्या राज्यात जन्माला आलो तरी आपली मातृभूमी तर एकच आहे ना, एकाच मातृभूमीची आपण लेकरे आहोत मग हा परकेपणा का?? आपल्या देशातील नयनरम्य निसर्गाला टिपण्यासाठी विदेशातून लोकं इथे येतात मग आपण का आपली संस्कृती, निसर्ग सोडून बाहेरच्या देशात फिरायला जातो, त्यातच फक्त आपलं राज्य आणि आपली माणसं ही मानसिकता संपायला पाहिजे. आपला देश आपली माणसं अस व्हायला हवं तेव्हा कुठे आपल्यात एकता निर्माण होईल.

तुम्ही ही वर्षातून एकदा तरी वेगवेगळ्या राज्यात फिरायला नक्की जा. हा प्रवास जरी मोठा असला तरी जीवनाच्या प्रवासाला कधीतरी ब्रेक लागणारच, त्यामुळे चालत रहा, प्रवास करत रहा. माझा तर हा प्रवास जीवनाच्या शेवटच्या टप्यापर्यंत असाच सुरळीत रहावा आणि सोबतीला आमचे साहेब आणि दोन कप चहा नक्कीच असावा … मग अजून काय हवं बर…

— सौ. शिल्पा पवन हाके

Avatar
About सौ. शिल्पा पवन हाके 6 Articles
'वाचाल, तर वाचाल'
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..