नागू दुपारची भाकरी खावी म्हणून औत सोडून बैलायला पाणी पाजवू लागला.डोबी पाण्यानं ठिल भरलेली होती.सूर्य नारायण आग ओकत व्हता.बैलायनं पूर sपूर करत खाली मुंडी घालून गटागटा पाणी पेलं.मध्येच डोबीत बसण्यासाठी आलेल्या कुत्र्याला ढुसणी देत बैलानं कुत्र्याला लांब दामटून लावलं.नागूनं जराजरा पाणी वंजळीत घेत बैलाव्हाच्या पाठीवर टाकलं.तसे बैलं सावध होत अंगानं हालले.आपली मुंडी पाठीकडं वळून आपल्याच कासेत एक पाय उचलून एकबार इकून अन् एकबार इकून ढुसणी मारली. शेपूट इकडून तिकडं फिरविलं .पाणी पेल्यावर नागूने आंब्याखालच्या पालवीला बैलाला गुतविलं अन् कडब्याच्या वळई कडं गेला बघतो तर काय कडबा खलास झाला होता.शाबूत पेंडी एकही नव्हती.चार दोन पेंड्यायचा गळाटा तेवढा इकडं तिकडं पडलेला होता.डोस्क्यावरचं मुंडासं काढून नागूनं ते गळाटा तेच्यात भरला.अन् लगबगीनं बैलाम्होरं वतू लागला तोच बैलं हावरटल्या सारखे त्याच्या धुडक्यातच तोंड घालू लागले.नागूने सरक sसरक करत कसाबसा धुडका रिकामा केला अन् जांभळीच्या बुडाला टेकला.लांबवर नजर टाकली तर कारभारीण डोक्यावर टोपलं घेऊन येऊ लागली.मिरुग आजून महिनाभर राह्यला व्हता,आत्ताच कडबा सरलाय बैलाव्हासनी काय खाऊ घालावं ह्याच विचारात बुडलेल्या नागूला बायली कवा आली अन् हातावर भाकरी देऊन पिठलं कवा वाढलं याचा पत्ताच लागला नाही.
“आवं काय झालं वं ,कयाची काळजी लागून -हायली एवढी”
“अगं काय सांगू तुला आता वर्सानं वरीस ह्या कडब्यालाच हेंडगा लागालया.आता कामाच्या दिसात कडबा सरला बघ.आता ह्या जित्राबाला कसं जगवावं.असा ह्यै कडक उन्हाळा अन् बैलाम्होरं काय टाकावं ?.ह्या सोयाबीनानं जवारीचे पेरे कमी झाले अन् इकून तिकून पेरली जवारी तर डुकरं सळवायलेत.सोयाबीनाची गुळी अन् राखून राखून दोनचारशे पेंढ्या ठुलेल्या व्हत्या ,आजवर पुरल्या आता पुढी काय घालावं ? घोर लागून -हायलाय बघ ”
“व्हय माय ह्या परदेशा गावात तर पाण्याची सुदीक बोंब उठलीया,हिरीला उलीसं पाणी असलं अस्त़ं तर मका तरी जराशी जोपली असती.”
“आता हे पाचवं सहावं वरीस असंल बघ वर्सा बैलायची मिरगाच्या तोंडावर उपासमार व्हालीय.कडबा काही राहीना झालाय.ते तरी बरं हाय गंगथडीला किसना भाऊ बैलं घेऊन या म्हणतंया वर्सा,दाजी आनमान करायचा न्हाई,आमच्या इकडं वैरणीची कमी न्हाई.असं म्हणून बलवितंय नाही तर बैलं कडब्यावाचून मरयचीच पाळी.किती बी ठरविलं की यंदा कडबा कमी पडू द्याचा न्हाई तरी बी कमी पडतंच -हातंया.कोणाकडं हातं पसरु न्हाई म्हणून किती बी म्हणलं तरी बी तीच नौबत येतीया बघ.”आपलं दलिद्रिंपण म्हणजे न संपणारा रस्ताच हाय जणू!
संतोष सेलूकर ,परभणी
७७०९५१५११०
Leave a Reply