नवीन लेखन...

नाम गुम जायेगा…

जेव्हा नव्या बाळाची चाहूल लागते. त्यावेळी पती-पत्नी येणाऱ्या नव्या पाहुण्याचं नाव ठरवंत. पती म्हणतो, मला मुलगी हवी, मी तिचं नावं अमुक अमुक ठेवणार. पत्नी म्हणते मला मुलगाच हवा, त्याच नाव मी हे ठेवायचं ठरवलं आहे. यथावकाश तो नवा पाहुणा घरात येतो. मग तो मुलगा असतो, मुलगी असते. पती-पत्नी ने ठरवलेलं नाव त्या बाळाची आत्या हळुच त्याच्या कानात सांगते… नामकरण सोहळा थाटात पार पडतो. पाहुणे येतात आशीर्वाद देऊन निघुन जातात… इकडे ते बाळ वाढू लागतं. आई-बाबांच ते फार लाडकं असतं… मग आई त्याला त्याच्या मुळ नावाने हाक मारणे सोडून देते… ती वेगळ्याच नावाने म्हणजे… बबलू, गोलू, मोनू, चिंकी, पिंकी या सारख्या टोपण नावाने (पेट नेम) हाका मारू लागते. तर हे बाळ बाबांचे देखील लाडके असते, ते देखील त्याला सोनू, गुंडू, पिंट्या, छकुली, चिऊ या सारख्या नावाने हाका मारू लागतात… आवाज देऊ लागतात. ही नावे ऐकतच हे बाळ वाढू लागतं. चालू लागतं, धाऊ लागतं, बोलू लागतं.. त्याच्या कानात आत्याने सांगितलेलं नाव, त्यालाही आठवत नाही. ते बाळ आई बाबांनी उच्चारलेल्या टोपण नावालाच होकार देऊ लागतं. मग यथावकाश हे बाळ त्याच्या सवंगड्यात खेळायला जातं. सवंगडी तर सवंगडीच असतात. ते कधीच दोस्ताला एका नावाने हाक मारत नाहीत. जे तोंडात येईल त्या नावाने त्याला बोलावले जाते. त्याच्या मुळ नावाची आणि आई-बाबांनी ठेवलेल्या टोपण नावाची पुरती वाट ही दोस्त मंडळी लावून टाकते. मग या बाळाची शाळेत जायची तयारी सुरू होते. शाळेत गेल्यावर त्याला पुन्हा नवे दोस्त मंडळी मिळते. ते देखील याच्या मुळ नावाच्या पार चिंधड्या उडवून टाकतात. याचे नाव मुकेश असेल तर तो मुक्या होतो, राजेश असेल तर राज्या होतो, संजय असेल तर संज्या, संजू होतो… एक ना अनेक प्रकार होतात त्याच्या नावाबाबत. शिक्षकांचे तर विचारायलाच नको ते विद्यार्थ्यांना आदराने (!) गधड्या, मुर्खा, बेअक्कल या सारखी विशेषण लावून बोलावतात. आतापर्यंत त्या मुलाचा पुरता गोंधळ उडालेला असतो की त्याचे मुळ नाव खरे… की आई-बाबा बोलावतात ते खरे… की दोस्त हाका मारतात ते नाव खरे… की शाळेतील शिक्षकांची विशेषणं खरी… दरम्यान त्याच्या दाखल्यावर त्याचे मुळ नाव चढलेलं असते हे मात्र खरे.. कागदावरच त्याच मुळ नाव कायम राहतं हे देखील तितकच खरं…

पुढे हाच शाळेतला विद्यार्थी महाविद्यालयात जातो, तेथे त्याच्या नावाला आणखी काही विशेषणं जोडली जातात… जसे टपोरी, शाणा, मेरिटवाला, स्कॉलर, चश्मीश वैगरे वैगरे.. लोकांनी दिलेल्या नावांची ही यादी ते मुलं जवळ बाळगत वाढत जातं. स्वत:च कतृत्व सिद्ध करतं. काही तरी प्राप्त करतं. कुठल्यातरी मोठ्या हद्दयावर जाऊन बसतं. तो जेव्हा मोठ्या हुद्द्यावर जाऊन बसतो… तेव्हा देखील त्याचे मुळ नाव मागे पडलेलं असते.. तेव्हा तो आदरार्थी नावाने संबोधला जातो. जसे…

मोठा अधिकारी झाला असेल तर तो साहेब होतो. रावसाहेब होतो. शिक्षक असेल तर मास्तर होतो. डॉक्टर असेल तर डॉक्टरच राहतो. पोलिस असेल तर दादा होतो… राजकारणी असेल तर नाना, दादा, अप्पा, भाऊसाहेब, साहेब या सारखे अनेक प्रकार त्याच्या मुळ नावाला सोडून लावले जातात. त्याच नावाने त्याला बोलावले देखील जाते.….

चित्रपट सृष्टीचं भल्याभल्यांना वेड. त्यातील कलावंतांच अनुकरण अनेक जण करतातही. या सेलेब्रिटीचं मुळ नाव वेगळंच काही तरी असतं आणि ते प्रसिद्ध वेगळ्याच नावाने पावतात हे सर्वश्रृत आहेच ना…

आपल्याकडे तर लग्न झाल्यानंतर मुलीचं नाव बदलण्याची पद्धती काही ठिकाणी पहायला मिळते. तिचं माहेरच नाव बदलून पतीराजाच्या आवडीचं नाव तिला दिलं जातं. काही ठिकाणी तर ते कागदोपत्री देखील केलं जातं. अर्थात लग्नानंतर बायका देखील नवऱ्याच्या नावाचं ‘अहो’ करून टाकतात म्हणा.

आता मुद्दा असा उरतो की लहानपणी आत्याने थाटात कानात सांगितलेलं… ते मुळ नाव कुठे गेलं… मुळ नाव राहते ते फक्त कागदावर… आपले संबोधन होतं राहते ते वेगवेगळ्या नावाने.. टोपण नावाने… आदराने.. विशेषणाने… आणखी बऱ्याच नावांनी… तीच आपली ओळख बनते.. राहते… कारण.. कुणीतरी म्हटलं आहे…

‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाजही पहेचान है, गर याद रहेगा’

— दिनेश दीक्षित (१४ एप्रिल २०१८)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..