नवीन लेखन...

‘नॅक’चे शिवधनुष्य

‘नॅक’ ही विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या गुणवत्तेच मुल्यमापन करणारी राष्ट्रीय संस्था आहे. नॅकचे शिवधनुष्य विद्यापीठ व महाविद्यालयांनी पेलले तर शैक्षणिक इंद्रधनुष्य अवतरायला वेळ लागणार नाही. नवीन मुल्यांकन प्रणाली एप्रिल २०१८ पासून आली आहे.

नवीन मुल्यांकन पध्दती – ६५% मुल्यांकन संगणक आणि गणिती पध्दतीने होणार, व्यक्तिनिष्ठ मूल्यमापनाला यात थारा नाही. पीअर टीमला पूर्वी पूर्ण अधिकार होते. त्यामुळे काही ठिकाणी गोंधळ झाला. अपात्र पात्र झाले, काहींनी वरचे ग्रेड मिळविले, पीअर टीमच्या सहकार्याने, आता पीअर टीमचे अधिकार ३०% वर आणले, ५% विद्यार्थ्यांकडून आलेल्या माहितीतून तयार झालेले संगणकिय गुणदान आहे (६५ + ३० + ५ = १००%) अशी गुणदान पध्दत नवीन मूल्यांकन पध्दतीत आहे. प्रत्येक
उच्चशिक्षण संस्थेला आपला स्वयं अभ्यास अहवाल ऑनलाईन, अन्य माहिती, पुरावे सुध्दा ऑनलाईनच द्यावे लागतील. त्यामुळे महाविद्यालयाचा आरसा वास्तवच दाखवेल. जेथे अंतर्गत गुण आहेत तेथील विद्यार्थी नॅकसमोर संस्थेविरुध्द मत, पुरावे देतील काय? ज्या महाविद्यालयात परराज्यातील विद्यार्थी व परदेशातील प्राध्यापक नाहीत त्यांना २० गुणांना मुकावे लागेल.

महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा तपासून त्यांना ‘नॅक’चे प्रमाणपत्र देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीत हाती घेण्यात आली होती. महाविद्यालये तेवढ्यापुरती सजली, नटली; पण नंतर पुन्हा पहिल्यासारखीच वागू लागली का? किती महाविद्यालयांनी ‘नॅक’ प्रक्रिया गंभीरपणे घेतली? असे अनेक प्रश्न आता सामोरे येऊ लागले आहेत. अनेक महाविद्यालयांनी समितीसमोर फसवे चित्र निर्माण केले व ग्रेड मिळवली. काही महाविद्यालये व त्यांना मिळालेली ग्रेड यांचा सर्व्हे केला, तर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण होतात.

नॅकमुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुधारली का? नॅक ‘जजमेंट’साठी होते, ती ‘पनिशमेंट’ नव्हती, पण शैक्षणिक प्रक्रिया सुधारण्यासाठी आपली काही बांधिलकी आहे, याची जाण कुणाला व किती आहे? भव्य इमारत, तज्ज्ञ प्राध्यापक, समृध्द ग्रंथालय असे जाहिरातींतून बिबवणे म्हणजे चांगले महाविद्यालय नव्हे. अनेक महाविद्यालयांकडे यातील काहीतरी असले तर निकषांप्रमाणे नसते. महाविद्यालयात अध्ययन-अध्यमापन प्रक्रिया कशी चालते, भव्य इमारतीत सोयीसुविधा कशा आहेत? चांगल्या परंपरा आहेत का? मूल्य, शिस्त रुजवण्यासाठी काम केले जाते का? अभ्यासोत्तर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल याचा विचारही आवश्यक आहे. केवळ निकाल चांगले म्हणून महाविद्यालय चांगले असे नव्हे. निकाल चांगला लागणे व लावणे यासाठी विद्यार्थी, परीक्षक, घोटाळे, अध्ययन-अध्यापन इ. प्रक्रिया कारणीभूत असते.

नॅकसाठीच फक्त सर्व पूर्तता करायची, नंतर जैसे थे होणार असेल, तर शिक्षणप्रकियेस मोठा फटका बसेल. आदर्श महाविद्यालय रोज आदर्श असलं पाहिजे. भौतिक सुधारणा पैशांनी करता येतात. नैतिक सुधारणांचे काय? नैतिकता एका रात्रीतून येणार नाही, ती रुजवायला लागते. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया शैक्षणिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, शिक्षक विद्यार्थी अंतर्क्रिया अशी आणि अन्य अनेक संकल्पना काही गोष्टी महाविद्यालयांनी करायच्या असतात हे नॅकमुळे महाविद्यालयांना जाणवायला लागले आहे. अभ्यासक्रम व जीवनक्रम यांची सांगड शैक्षणिक संस्थेत घालता आली पाहिजे. ध्येयधोरणे जरी शैक्षणिक संस्था ठरवत असल्या तरी अभ्यासक्रम विद्यापीठ तयार करते. संस्था स्थापन करताना पूर्वी काही ध्येयधोरणे असत, त्यात कालानुरुप बदल होणे अपेक्षित आहे. अलीकडेच काही संस्थांनी कोणत्या मंत्र्यामाप््तर्त महाविद्यालय मिळते हा विचार केला. आधी दुकान, मग माल अशा स्वरुपात ही दुकाने उघडली.

मंत्र्यांची पहिली सही वाळते ना वाळते, तोच दुसरे महाविद्यालय दिले गेले. विद्यापीठाचा मास्टर प्लॅन कागदावरच राहिला, असेही मध्यंतरी झाले. त्यामुळे अशा महाविद्यालयांच्या भौतिक सुविधांचा प्रश्न निर्माण झाला. नॅकमुळे निदान इमारतीला रंग, हिरवळ लावणे हे सुरु झाले. मूळ प्रश्न अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुधारली का? विद्यार्थी तासाला बसतात का? तास होतात का? मग कोचिग का बहरतय? व कॉपीला आळा का नाही? हे प्रश्न अनुत्तरीतच रहातात.

नॅकमुळे शैक्षणिक संस्थांमध्ये आमूलाग्र बदल व्हायला हवा. यापुढे दर पाच वर्षांनी नॅक समिती येणार, यापुढे मूल्यांकन ई-मेलने होणार. त्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक युगात महाविद्यालये सज्ज हवीत. अनेक योजना, प्रकल्पांची माहिती हवी असेल तर इंटरनेट हवे. ऑनलाईन परीक्षा सुरु होणार, यासाठी ही महाविद्यालये सज्ज हवीत. प्रदूषणमुक्त वाहन किवा आय.एस.आय. ट्रेडमाकर्प्रमाणे केवळ शिक्कामोर्तब होणार नसून, ग्रेडमुळे महाविद्यालयांत स्पर्धा वाढेल. जाहिरातीत महाविद्यालये आपल्या ग्रेडचा उल्लेख करतात.

नॅकच्या स्वयंमूल्यमापन अहवालात भौतिक सुविधेला १५ गुण आहेत. जाहिरातीतून अवतरलेल्या महाविद्यालयांना एका रात्रीतून भौतिक सुविधा कशा प्राप्त होणार? नॅक समितीसाठी महाविद्यालये केवळ रंगरंगोटी करु शकतील. रात्रीतून चित्र बदलणार नाही, पण या निमित्ताने इमारतीची देखभाल होते. इमारती सुसह्य होतात, हे मान्य करावे लागेल. काही महाविद्यालये लाज वाटावी अशी आहेत. काही लाज राखणारी आहेत. काही ‘ताज’सारखी आहेत. नॅकसाठी बर्‍याच ठिकाणी जे नाही ते दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. अहवालानुसार ‘रेकॉर्ड’ तयार केले जात आहे. शिक्षणाच्या विकासाबरोबर सुधारणाही आवश्यक आहेत. बदलते संदर्भ लक्षात घेऊन स्पर्धेला तोंड देण्यासाठी बदलणं आवश्यक आहे.

नाविन्यपूर्ण निकडीचे अभ्यासक्रम याची दखल शैक्षणिक संस्थांना घेण्याची वेळ आली आहे. सशक्तीकरण होण्यासाठी आहे त्या साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त विनियोग, संधी, क्षमता यांचा योग्य वापर नॅकमुळे आवश्यक ठरत आहे. नॅकमध्ये विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचे मूल्यांकन करायचे आहे. प्राध्यापकांची तयारी कशी असते, ते चर्चा करतात का? शंकानिरसनासाठी उपलब्ध असतात का? विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठीच्या प्रश्नावल्या आहेत. आता विद्यार्थी प्रत्यक्ष व परस्पर नॅक समितीशी संपर्क करु शकतील.

नॅकला सामोरे कसे जायचे, एवढ्यापुरतेच उद्दिष्ट ठेवून चालणार नाही. नॅक ही परीक्षा नव्हे, शैक्षणिक प्रक्रिया आहे याचा विसर पडता कामा नये. नॅकमुळे शैक्षणिक जागृती अपेक्षित आहे. लाखो रुपये खर्चून महाविद्यालये हा शैक्षणिक विधी करवून घेण्यासाठी प्रतीक्षा यादीत आहेत.

नॅक समितीसमोर विद्यार्थ्यांना काय विचारलं जाईल. त्याला त्यांनी काय उत्तरे द्यायची, माजी विद्यार्थी, पालक, अध्यापकांनी काय व कसे सामोरे जायचे याची प्रात्याक्षिके व प्रशिक्षण रंगीत तालमी महाविद्यालयात चालू आहेत, पण अध्यापनक्रिया अव्याहत सुरु राहणारी आहे. नॅकपुरता देखाव्याचा डोलारा निर्माण केला, तर शिक्षण प्रक्रियेतला मूळ आत्माच हरवला जाईल. महाविद्यालयात विद्यार्थीच तासाला बसत नसतील तर हे व्यर्थ आहे. अनेक महाविद्यालयांसमोर ही समस्या आहे. प्रवेश व परीक्षा यापेक्षाही महाविद्यालये काही करु शकतात हे समाजासमोर यायला हवं व नॅक ही संधी आहे. नॅकमुळे अनुदानावर काही परिणाम होणार नाही, या भ्रमात राहून चालणार नाही. महाविद्यालये हेल्थ सर्व्हिसेस पुरवितात का? सेल्फ फिनान्सिंग कोर्सेस आहेत का? विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी कारखाना, उद्योगसमूह, व्यवस्थापन यांच्याशी त्यांचे लिकेजेस आहेत का? विद्यार्थ्यांना पदवी मिळवून देणे एवढेच ध्येय व उद्दिष्ट आहे का? अनेक गोष्टी करायला हव्यात, हे महाविद्यालयांना माहीत आहे, पण क्षमता, आर्थिक मर्यादा व दृष्टीशिवाय हे शक्य नाही. प्रमाणीकरण करण्यासाठीच्या बाबी महाविद्यालयांना माहीत आहेत, पण यासाठीचा शैक्षणिक संस्कार कही महाविद्यालयांवर झालाच नाही. एक सोपस्कार म्हणून काही महाविद्यालये चालू आहेत. वशिल्याचे प्राध्यापक, व्यवस्थापनावर सर्व नातेवाईकच, महाविद्यालयाला अर्थप्राप्तीचे साधन समजणे, राजकारण करणे यासाठीच महाविद्यालय असेल तर नॅकला ते सामोरे कसे जाणार? स्थानिक सल्लागार समितीचा वैधानिक इशारा न मानणारी महाविद्यालये चालूच आहेत. नॅक तपासणी करणार नाही. गुणदोष दाखवणार नाही, फक्त स्वयंमूल्यमापन अहवालाची पडताळणी करणार. नॅकमुळे शैक्षणिक दारिद्रयरेषेखालील महाविद्यालये उघडकीस येतील का? प्रत्येकाचा बुध्द्यांक ठरलेला, त्यात फार वाढ होत नाही. प्रत्येक महाविद्यालयाला व्यक्तिमत्व असते. ते सुधारताही येते. इमारत रंगवता येईल, पण नॅकच्या आदर्श वास्तव चित्रात रंग भरुन शैक्षणिक इंद्रधनुष्य अवतरणार आहे का? सर्वांनाच हे शिवधनुष्य पेलणार आहे का?

आज देशातील सुमारे सहा टक्के विद्यार्थी उच्चशिक्षण घेतात. सध्या ३०० विद्यापीठे व लाखों विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विस्तार झाला, पण गुणवत्तेत आपण कुठे आहोत? मूल्यमापन आवश्यक आहे. विस्ताराबरोबर सिहावलोकनही आवश्यक आहे. बदललेले संदर्भ लक्षात घेऊन शिक्षण प्रक्रिया बदलायला हवी. मानसिकता बदलायला हवी. नॅकमधील सातत्य महाविद्यालयांना तारणार आहे. नॅकमुळे जास्तीचे अनुदान मिळेल. महाविद्यालयांना शैक्षणिक शिस्त लागेल. भविष्याचे नियोजन करण्याची शिस्त लागेल, भविष्याचे नियोजन करण्याची शिस्त लागेल. स्पर्धेमुळे स्पर्धेत टिकण्याची धडपड सुरु होईल, चैतन्य येईल. महाविद्यालयांना मिळणारा दर्जा ही त्यांची ऊर्जा ठरेल.

जाहिरातीच्या युगात प्रमाणीकरण आवश्यक आहे. महाविद्यालयांनाही त्यामुळे संजीवनीच मिळणार आहे, पण त्यासाठी नॅककडे विधायक दृष्टिकोनातून बघायला हवे. नॅक ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हे मान्य करावे लागेल, अन्यथा सारी शैक्षणिक प्रक्रिया गोंधळाची होऊन जाईल.

– डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 30 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..