अगदी शिरीष कणेकरांच्याच शब्दांत सांगायचे तर आजकालच्या भेसळीच्या आणि बनावटीच्या कलियुगात आम्हाला अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरुपात कॅब्रे आणि तत्सम नृत्यप्रकार दाखविल्याबद्दल माझ्या आधीच्या दोन (पक्षी : माझे पप्पा व माझा थोरला चुलतभाऊ),माझी व माझ्या नंतरची एक (पक्षी : माझा धाकला आत्तेभाऊ ) अशा आमच्या चार पिढया हेलनच्या कायमस्वरुपी ऋणात आहेत. लोणावळ्याला किंवा इगतपुरीला विपश्यनेसारख्या अघोरी शिक्षेला सामोरे जाऊन या ऋणातून मुक्त होण्याचा नतद्रष्ट पापी विचार आम्ही आमच्या आसपासदेखील भटकू देत नाही.या ऋणाचं ओझं न वाटता उलट सोबतच वाटते. ओझं वाटायला तो काय पेट्रोलवरचा अधिभार थोडाच आहे ? “हिंदी चित्रपटसृष्टीतील आजवरील नृत्यचंद्रिका,कमनीय कक्कु ते ‘मुन्नी’ मलायका (व्हाया “मोना डार्लिंग” बिंदू)…एक नाचरा प्रवास” या विषयाच्या डॉक्टरेट मिळविण्याइतक्या पोथीनिष्ठ अभ्यासानंतर बनलेले माझे हे अत्यंत प्रामाणिक मत आहे. “वो अंजाना ढूंढती हूँ…वो दिवाना ढूंढती हूँ “…हे शोधक आणि मादक शब्द तिच्या रसील्या ओठांतून पाझरल्यानंतर ती जणू (पी. एन. अरोराला सोडल्यावर) आपल्यालाच शोधते आहे अशी बहुसंख्य रसिकांची खुळी समजूत झाली.भाबड्या रसिकांच्या पिढ्यांमागून पिढया मग तिच्या नजरेत भरण्यासाठी थिएटरवर चाल करुन गेल्या आणि बेरकी पंजाबी निर्मात्यांच्या सात पिढ्यांचं कल्याण करुन गेल्या. एखाद्या पडेल हॉलिवूडपटाची अस्पष्ट कार्बन कॉपी असणाऱ्या ‘इन्कार’मधे विनोद खन्ना, अमजद खान आणि डॉ.श्रीराम लागू असे एकसोएक अभिनयसिंह होते. ( मात्र अजूनही श्याम बेनेगलांच्या ‘अंकूर’चेच चित्रीकरण चालू आहे अशा घोर गैरसमजूतीतून साधू मेहेरने ‘इन्कार’मधे दाखविलेल्या भयानक अंडरप्लेच्या आठवणीने माझा धाकटा भाऊ आजपावेतो रात्रीबेरात्री दचकून जागा होतो.) वितरकांशी जमलेला व्यवहार फिसकटू नये या हिशेबी वृत्तीने व त्यांच्या आग्रहावरुन, दिग्दर्शक राज सिप्पी फारसा अनुकूल नसतानाही निर्माता रोमू सिप्पीने बळेबळे सिनेमात हेलनच्या “मुंगळा” नृत्याचा समावेश केला.
And the rest is history.
हेलनच्या नशिल्या डोळ्यांनी एकदा “मंगता है तो आजा रसिया” असे उघड आव्हान दिल्यावर मग मागे हटतील ते तिचे निस्सीम चाहते कसले ? मुंगीने मेरु पर्वत गिळावा तसे मुंगळ्याने सर्व अभिनयमार्तंडांना गिळले आणि इन्कारने सहा थिएटरमधे सुवर्णमहोत्सव साजरा केला. निर्माता रोमू सिप्पीच्या कार्टर रोडवरील जुन्या घरावर सोन्याची कौलं चढली.
मध्यंतरी साडेसातीचा फेरा सुरु असताना फरहान अख्तरला “डॉन”चा रिमेक बनविण्याची दुर्बुद्धी झाली होती.(आधीच ‘लक्ष्य’ वरुन नाराज असणाऱ्या जावेद अख्तरने पोराचा ‘डॉन’ पाहिलाही नाही असे सांगतात.) सिनेमात तंत्रज्ञानाचा अतिरेक करणाऱ्या आणि मूळ कथेची वासलात लावणाऱ्या फरहानला हेलनच्या “ये मेरा दिल यार का दिवाना” या गाण्याला मात्र हात लावायची काही हिम्मत झाली नाही. आघाडीच्या नायिकेला आयटम सॉंग देण्याच्या नविन प्रथेप्रमाणे त्याने या गाण्यासाठी सैफ अली खानची पत्नी व तैमुरची आई करीना कपूरची निवड केली.पण करीना काही चोखंदळ रसिकांच्या पसंतीस उतरली नाही. सलीम खानची पत्नी व सलमान खानची आई हेलनसमोर ती फारच सपक आणि अळणी ठरली हाच त्या बिचारीचा दोष.
‘तुम्हारी आंटी साथमे बहोतसे अंकलको लेके आयी है’ हे डॉनने आंटीच्या ज्या भाचीला उपहासाने ऐकवावं ती भाची हेलनच असावी असा जाणकार प्रेक्षकांचा अठ्ठावीस वर्षांनंतरदेखील निर्विवाद कौल होता. ‘हम काले है तो क्या हुवा दिलवाले है’ या गाण्यातील “तुम किधरको जाती तंदाना,क्यू पास ना आती तंदाना ?” या कडव्यावरील तिची बेभान व धुंद अदाकारी बघून गोरेगावच्या (पूर्व बाजू) माझ्या एका चुलत चुलत काकाने त्याचा आजन्म ब्रह्मचारी रहाण्याचा निश्चयच मोडीत काढला.
तिसरी मंझील,गुमनाम,प्यार ही प्यार अशा काही चित्रपटांत तिने बऱ्याच समकालीन नायिकांपेक्षा सहजसुंदर आणि उस्फुर्त अभिनय केला होता.परंतु या नृत्यनारींगीवर फिदा झालेल्या आम्हा रसिकांना तिच्यातील अभिनयगुण दुर्दैवाने कधी दिसलेच नाहीत.
पन्नास वर्षांपूर्वी (हेलनचा) ‘तिसरी मंझील’ बघायला (आईच्या नकळत) माझे पप्पा मला हाताला धरुन कोहिनूर थिएटरला घेऊन गेले होते.अलीकडे दोनएक वर्षांपूर्वी माझ्या बारावीला असलेल्या पुतण्याबरोबर मी टीव्हीवर ‘मोहोब्बते’ बघत असताना तो मधेच उसळून म्हणाला “काका, हेलन ना ही नटी ? मला माहितीए.सॉलिड नाचते ही. मी व माझ्या मित्रांनी युट्युबवर डान्स पाहिलाए हिचा.”
मग तरुण पिढीच्या रिवाजाप्रमाणे त्याने मला ‘हायफाय’ केले. त्याचक्षणी मी अलगदपणे “हेलन” नावाचे बॅटन निर्धास्तपणे पाचव्या पिढीच्या हाती सोपवून माझ्या वांशिक जबाबदारीतून मुक्त झालो.
संदीप सामंत
२१.०१.२०२२
Leave a Reply