नॅफ्था हे पेट्रोलियम द्रावण साधारणपणे ३० ते १७० अंश सेल्सिअसला ऊर्ध्वपातित होते. खते व पेट्रोरसायने तयार करण्यासाठी इंधन आणि कच्चामाल म्हणून नॅफ्थाचा प्रामुख्याने वापर होतो. नॅफ्थामध्ये पॅराफिनिक, नॅपशॅनिक आणि एरोमॅटिक रसायनांचा समावेश होतो. दोन प्रकारच्या नॅफ्थाची निर्मिती होत असते. एरोमॅटिक अंश जादा असलेल्या नॅफ्थाला ‘हाय एरोमॅटिक (एच.ए.एन.) आणि कमी एरोमॅटिक अंश नॅपथा’ असलेल्या या द्रावणाला ‘लो एरोमॅटिक नॅफ्था’ असे (एल.ए.एन.) संबोधिले जाते. पहिल्या प्रकारचा सर्वसाधारण नॅफ्था कामासाठी उपयोगी पडतो तर दुसऱ्या प्रकारच्या द्रावणातून पेट्रो-रसायने निर्माण केली जातात. खते तयार करण्यासाठी कमी प्रमाणात एरोमॅटिक रसायने असलेले नॅफ्था द्रावण वापरावे लागते.
एखाद्या खत कारखान्याची यंत्रणा ही त्याच्यासाठी उपलब्ध असलेल्या नॅफ्थाच्या रचनेवर अवलंबून असते. त्यामुळेच तर नॅफ्थासाठी इतर इंधने नि द्रावणाप्रमाणे आय.एस. (इंडियन स्टॅण्डर्ड) चे मानद प्रमाण उपलब्ध नाही. एखादा तेलशुद्धीकरण कारखाना आपल्या कुवती नि क्षमतेनुसार नॅपथाची वैशिष्ट्ये ठरवून त्याची निर्मिती करतो. खत कारखान्यात उच्च तापमानाची गरज असते व तिथे नॅफ्था इंधनाची भूमिका बजावीत असते. काही संयंत्रात वायू निर्मितीसाठीसुद्धा वापरतात. ऊर्जानिर्मिती करणाऱ्या गॅस टर्बाइनमध्ये सुद्धा नॅफ्थाचा इंधन म्हणून वापर होतो आहे. एरोमॅटिक रसायने जळताना धूर ओकतात व त्यामुळे त्यांचे नॅफ्थातील प्रमाण रोखण्याचा प्रयत्न असतो. या धुराची काजळी यंत्रभागावर थराच्या रूपात साचून नासधूस होत असते.
नॅफ्थामध्ये असलेली हायड्रोकार्बन असंपृक्त रसायने ही हवेच्या संपर्कात आली की गोंदरूप धारण करतात व या गुणी द्रावणाची गुणवत्ता कमी करतात. तसेच, या द्रावणात गंधकाचा अंश असेल तर खतनिर्मिती करताना उत्प्रेरक म्हणून वापरण्यात येणाऱ्या निकेल धातूच्या भागाला गंज चढतो व तो निष्क्रिय बनतो. तसेच, या द्रावणातील शिसे, व्हॅनेडियम, सोडियम इ.. धातूचे अत्यल्प प्रमाणदेखील उच्च तापमानाला उत्प्रेरकांशी संयोग पावून त्याची कार्यक्षमता ढासळवू शकतात.
नॅपथाची तेलशुद्धीकरण कारखान्यात निर्मिती करताना, या साऱ्या बाबींची काळजी घ्यावी लागते.
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply