रोज रात्री अभ्यासिकेच्या फुटपाथकडील पायरीवर बसून मी तासनतास विचार करू लागलो. घरी जायला उशीर होऊ लागला तशी मित्राकडे अभ्यासाला जातो म्हणून वेळ मारून नेली. पायरीवर बसल्या बसल्या समोरच्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे पहात बसायचो. डोक्यांत मात्र सुडाचेच विचार असत. गावात येणारे सामानाचे ट्रक हायवेवरून या समोरच्याच रस्त्यावरून जात येत. रात्री बारानंतर त्यांची रहदारी वाढत असे.
असाच विचार करीत बसलो असताना कर्कश्श ब्रेकच्या आवाजाने आणि एका कुत्र्याच्या भयंकर केकाटण्याने माझी तंद्री भंग पावली! रस्त्यावरुन आडव्या जाणाऱ्या एका भटक्या कुत्र्याला वाचवावे म्हणून ट्रकवाल्याने करकचून ब्रेक मारला होता! कुत्रे वाचले पण त्यांची तंगडी चाकाखाली सापडली! ते भयंकर केकाटत होते! ट्रक मागे जाताच ते लंगडत केकाटत पळाले! ते दृश्य पाहून माझ्या डोक्यात एक अजब कल्पना चमकून गेली! नागोबाला अद्दल घडवण्याची आणि ती एका नागोबाच्याच साहाय्याने! कोण होता तो नागोबा?
ठाण्याला येण्यापूर्वी आम्ही नाशिकला रहात होतो. नाशिकला गावाबाहेर कालिकादेवीचे मंदिर होते. दरवर्षी नवरात्रांत तिथे यात्रा भरत असे. मी आणि सुनीता आमच्या मित्रांबरोबर त्या यात्रेला जायचो. निरनिराळे खेळ, खाण्यापिण्याचे स्टॉल्स, चित्र-विचित्र वस्तूंची दुकाने, फळे, फुले असे नाना प्रकार असत. वातावरण अगदी उत्साहाने ओसंडत असे. याच यात्रेत एक खेळणी विकणारा असे. एका बांबुवर आडव्या उभ्या बांबूच्या पट्ट्यांवर त्याचे दुकाने सजलेले असायचे त्यात रंगीबेरंगी फुगे, भिरभिरे, प्लॅस्टिकची खेळणी, पिपाण्या, पिसांच्या टोप्या, पुठ्याचे मुखवटे, रंगीबेरंगी मण्यांच्या माळा अशी त-हे त-हेची खेळणी असत. मुलांची ते बघायला आणि खरेदीला झुंबड उडायची. या खेळण्यातच एक मजेदार खेळणे असायचे. घडीचा साप! बांबूच्या पट्ट्या जोडून एक चौकटीसारखी शिडी असायची. तिच्या एका टोकाला पुठ्यांच्या रंगीत सापाचा मुखवटा आणि दुसऱ्या टोकाला कात्रीसारखी दोन टोकं. ही कात्री उघडली की शिडी चांगली चार-पाच फूट लांब व्हायची. मिटली की झाली एक फूटभर पट्टी! हा साप पुढे मागे व्हायचा. खेळणीवाला तो कधी उंच सोडायचा, कधी येणाऱ्या जाणाऱ्या एखाद्या मुलाच्या अंगावर सोडायचा. मुलांना फार आवडायचे ते खेळणे एरवी सापाला घाबरणाराही हा साप खरेदी करायचा मी आणि माझ शेजारी सुधीर आम्ही दोघांनीही हे खेळणे खरेदी केले होते. आमच्या घराच्या बाल्कन्या शेजारी शेजारीच होत्या. तिथे उभे राहून आम्ही हा साप एकमेकांच्या अंगावर सोडायचो. खूप मजा यायची. याच सापाचा उपयोग करून नागेशरावाला धडा शिकवायचा मी बेत आखला.
प्रथम मी बांबूच्या पट्ट्या आणल्या त्याचे एकेक फुटाचे तुकडे केले. लोखंडी चुका (लहान खिळे) ठोकून मी त्याच्या चौकटी केल्या. एका बाजूला दोन टोके कात्रीसारखी ठेवली आणि दुसऱ्या बाजूच्या चौकटीच्या टोकाला जिथे सापाचा मुखवटा असायचा तिथे एक चांगली जाड, भक्कम आणि तीक्ष्ण सुई दोऱ्याने घट्ट बांधली. त्यावर अरलडाईट लावून ती आणखी पक्की केली. शिडीला काळा रंग दिला. घडी केल्यावर हा काळा सर्प एकफुटी झाला. उलगडला की चांगला चार फूट लांब व्हायचा.
पहिला टप्पा पुरा झाला. आता या सापाची मी परीक्षा घेतली. रात्री बागेतल्या झाडापासून पाच-सहा फुटांवर उभा राहून मी साप सोडायचो तो बरोबर झाडाच्या खोडात आपली जीभ म्हणजे सुई खुपसायचा. आता माझी तयारी पूर्ण झाली. आता नागेशरावाला धडा शिकवायला माझा काळा सर्प तयार झाला. मी माझ्या मोहिमेवर निघालो.
रात्री उशिरा नागेश अभ्यासिकेच्या समोरून मेन रोडने त्याच्या क्लबमध्ये चकाट्या पिटल्यावर जात असे. कधी बारा वाजता. कधी एक दोन पण वाजायचे त्याचे दोस्तही त्याच्याबरोबर असत पण ते अलीकडच्या चौकातूनच वळत. नागेशराव एकटाच पुढे जात असे. अभ्यासिकेच्या समोर फुटपाथच्या कडेला एक झाडाचा पिंजरा होता मी त्याच्या आडोशाला उभा राहून संधीची वाट पहात राहिलो. चटकन कोणी ओळखू नये म्हणून मी नाटकात वापरल्या तशा दाढी मिश्या लावीत असे. अर्थात इतक्या रात्री त्या काळोखात सगळीकडे शुकशुकाटच असे. रस्त्यावर वाहनांखेरीज फारसा वावर नसे. अभ्यासिका बारा नंतर बंदच होत असे. तसाही तिचा वापर फारसा नव्हताच.
मला हवी ती संधी मिळायला चांगले सातआठ दिवस प्रतीक्षा करावी लागली. पण शेवटी ती संधी मिळालीच! मेनरोडवरून दुरून नागेशची मोटरसायकल येत होती आणि त्याच सुमारास हायवेवरून गावात येणारा ट्रकही आत वळून गावाकडे निघाला होता. मोटारसायकल डावीकडून आणि ट्रक उजवीकडून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालले होते. माझ्या अंदाजाप्रमाणे ते एकाच वेळी विरुद्ध बाजूने पण समोरासमोर येतील असा माझा होरा होता. नागेशची मोटरसायकल जशी माझ्या पुढून गेली तसा मी क्षणात आडोशाहून बाहेर पडलो आणि पुढे जाणाऱ्या नागेशच्या मागून मी साप असा झटक्यात सोडला की त्याने बरोबर त्याच्या डाव्या हाताच्या मागच्या बाजूला दंश केला! सुई जोरात टोचताच प्रतिक्षिप्त क्रियेने त्याने डाव्या हँडलवरचा हात झटकला आणि त्याच वेळी काय होतेय हे कळण्यापूर्वीच त्याच्या उजव्या हाताचा हँडलवर हिसका बसला आणि त्याची गाडी उजवीकडे वळून समोरुन येणाऱ्या ट्रकच्या पुढ्यातच आली! एक भयंकर किंकाळी आणि ट्रकचा कर्णकर्कश्श ब्रेक यांनी रात्रीची शांतता भेदून काढली! मी झटकन मागे येऊन झाडाच्या पिंजऱ्यामागे लपलो. दाढीमिशा काढल्या. सापशिडीचे तुकडे केले आणि ते बाजूच्या गटारात टाकून दिले.
मागून येणारी गाडी त्या आवाजाने तिथे थांबली. ट्रकमधली माणसेही खाली उतरली. शिवाय त्या भयंकर किंकाळीच्या आवाजाने काही आसपासचे लोकही धावले. दहा-पंधरा माणसं गोळा झाली. तसा मीही त्यांच्यामागे गेले.
नागेशच्या मोटरसायकलीवरून ट्रकचे पुढचे चाक मोटरसायकलचा आणि त्याचा चेंदामेंदा करून पुढे गेले होते आणि मोटरसायकल आणि तो ट्रकच्या पुढच्या आणि मागच्या चाकांच्या मधल्या जागेत अडकले होते.
या गोष्टीला आता वीस वर्षे होऊन गेली. नागेशरावला लोक विसरुनही गेले होते. सध्या मी या विभागाचा लोकप्रिय नगरसेवक आहे. लवकरच आमदार आणि मंत्रीपण होण्याचे योग आहेत. सुनीताचे लग्न झाले. तिचा नवरा एक मोठा उद्योगपती आहे. ती पण त्याच्या उद्योगधंद्यात त्याच्या बरोबरीने काम पहाते. ती खूप सुखी आहे.
माझ्या बहिणीवर माझे जिवापाड प्रेम आहे.
***
–विनायक अत्रे
Leave a Reply