ग्रामीण भागात पूर्वी व आतासुद्धा सणांना फार महत्व असते. हिंदू धर्मात पहिला सण नागपंचमी तर शेवटचा सण हा अक्षय तृतिया असतो..अक्षय तृतीया नंतर जवळ जवळ दोन अडीच महिने कोणताही सण नसतो. त्यामुळे ग्रामीण भागातील अबालवृद्ध नागपंचमी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात .
पूर्वीच्या काळात सणांबद्दल असलेली आतुरता आता तितकीशी राहिली नाही. पूर्वी नागपंचमी हा सण खूप उत्सवात साजरा केला जायचा. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात असतो.
पूर्वी भरपूर पाऊस पडायचा. शेतीभातीची कामे नागपंचमीच्या आधी जवळजवळ पूर्ण होत असत. शेतकऱ्यांना थोडासा विसावा मिळायचा.अशातच नागपंचमी यायची.
नागपंचमीच्या दोन दिवस आधी नवीन लग्न झालेल्या नववधूला आपल्याला माहेरी घेऊन जाण्यासाठी कोणीतरी येईल याची त्या आतुरतेने वाट पाहत असायच्या. त्याकाळात आजच्या सारखी मोबाईल सारखी सुविधा नव्हती.गाड्या नव्हत्या.रस्ते नव्हते.पाऊलवाटा असायच्या.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी नवीन लग्न झालेल्या नववधूला आणण्यासाठी माहेरून नववधूचा भाऊ किंवा कुणीतरी जात असे. त्याला मु-हाळी असे म्हणत. माहेराहून आलेल्या भावाला पाहून नववधू हरकून जात असे. तिला आभाळ ठेंगणे होई.
त्याकाळात नववधूला सासू कडून खुपच सासुरवास व्हायचा.जेवणावर सुध्दा तिचा हक्क नसे.सासु जे शिळेपाके देई त्यावरच अर्धपोटी रहावे लागे.सासू खोबरेल तेल व साबण सुध्दा देत नसे. जेवण कुलूपबंद पेटीत ठेवले जाई.असे ते दिवस होते.
इकडच्या तिकडच्या गप्पा चहापाणी झाल्यावर मु-हाळी नववधूच्या सासूला नागपंचमी निमित्त माहेरी घेऊन जाण्याबाबत हळूच विषय काढायचा. सासरकडची मंडळी परवानगी देतात की नाही याबाबत नववधूच्या हृदयात धडधड व्हायची. कारण तिला माहेरची ओढ वाटायची. रडतखडत सासरकडच्यांची मिनतवारी करून मु-हाळी कसेतरी दोन दिवसाच्या बोलीवर नववधूला माहेरी घेऊन जाण्यासाठी तयार करायचा.
मग नववधूची लगबग सुरू व्हायची. तिला माहेरी कधी जाईल आणि आणि आई-वडील यांना कधी पाहिल असं होऊन जायचं.
सर्व तयारी पूर्ण झाल्यावर एका गाठोड्यात थोडेसे पीठ, एखादी भाकर व गुळ सासू तिला बांधून देत असे. आणि पंचमी झाल्यावर दोन दिवसांनी लगेच सासरी ये अशी सासू दटावणी देत असे.आणि मग नववधू आणि तिचा भाऊ माहेरच्या वाटेला लागत.
त्यावेळेस रस्ते नसत, गाड्या नसत पायवाट हाच एक मार्ग असायचा. डोंगरावरून, माळावरून, झाडाझाडातून ही पाय वाट या गावावरून त्या गावाला जात असे. श्रावण महिना असल्यामुळे सगळीकडे हिरवेगार डोंगर आणि पांढरे शुभ्र धबधबे ,कधी कधी ऊन तर कधी पावसाच्या हलक्या सरी पडत असत.
प्रत्येक नववधू ही त्या काळात सासुरवाशीण असायची. खूप सासवा नवीन सुनांना प्रचंड त्रास द्यायच्या. पाय वाटेने जात असताना नववधू तिच्या भावाला सासू कशी त्रास देते, परंतु नवरा कसा चांगला आहे हे सांगायची. माहेरी आई बाबा कसे आहेत? अमुक-तमुक मैत्रीण कशी आहे ?अमुक-तमुक लग्न झालेल्या मैत्रिणीचे काय चालले आहे? लग्न झाल्यानंतर कोण कोण मुली माहेरी आल्या होत्या? शेतीची काय कामे झाली? छोटू शाळेत जातो का ?असे अनेक नाना प्रश्न ती तिच्या भावाला विचारत असे. हे विचारत असताना तिला कधी एकदा आपल्या माहेरी जाईल आणि सर्वांना पाहिल असे वाटायचे.
सासरच्या आणि माहेरच्या गप्पा मारत असताना एकदाचे माहेरच्या गावात यायचे. गावातून येत असताना प्रत्येक घरातून वडीलधारे नववधूला प्रेमाने तोंड भरून खुशाली विचारायची. आणि नववधू आपण कसे खुश आहोत सर्व सासरचे कसे चांगले आहेत हे सांगायची.
गावातून एकदाची नववधू दारात यायची.आपली मुलगी आली आहे याची खबर आईला आधीच लागायची.आई भाकरीचा तुकडा आणि तांब्या भरून पाणी घेऊन यायची. मुलीच्या डोक्यावरून उतरून दूर टाकायचे. आणि मग मायलेकींची भेट व्हायची. दोघींचेही डोळ्यात अश्रू दाटून यायचे.परंतु ते प्रेमाचे अश्रू असायचे.
आई मुलीला घरात घेऊन जाई तोपर्यंत आजूबाजूच्या बाया मुलीची ख्यालीखुशाली विचारायला येत असत. त्यामध्ये कसा वेळ जाई हेच कळत नसे. संध्याकाळी मग जेवण होत.
नववधू घरातील लहान मुले मुली यांच्या हाताला मेंदी काढायची. सर्व काम आटोपले की आई आणि मुलगी यांचा संवाद चालायचा. हा संवाद रात्री दोन अडीच वाजेपर्यंत चालायचा. नववधू तिची सुखदुःख आईला सांगायची. एकमेकींच्या डोळ्यात अश्रू यायचे. हे अश्रू कधी सुखाचे तर कधी दुःखाचे असत.आई तीला अनुभवाच्या चार गोष्टी सांगायची.
दुसऱ्या दिवशी नागपंचमीचा सण असे. अनेक नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी आलेल्या असत. नागपंचमी या सणाच्या दिवशी या सगळ्या जणींची भेट होत असे.काही नववधू त्यांच्या खाष्ट सासवांनी पाठवलेल्या नसत. त्यामुळे प्रत्येकीला आपल्या मैत्रिणी बद्दल सहानुभूती वाटे.अनेक गप्पागोष्टी होत.
प्रत्येकाच्या घरात पुरणपोळीचा स्वयंपाक असे. दुपारच्या वेळेस सर्व बायका, मुली, लहान मुले जवळच असलेल्या माळावर नागोबाचे वारूळ असलेल्या ठिकाणी जमा होत. सार्वजनिक रित्या वारुळाची पूजा केली जाई. नागोबाला लाह्या, दूध यांचा प्रसाद दाखवला जाई. त्यानंतर झिम्मा, फुगडी व गाणी विविध प्रकारचे त्या काळातील खेळ खेळले जात. झोक्यावर बसून झोका खेळला जाई.
हिरवागार निसर्ग, दुथडी भरून वाहत असलेले नदी-नाले ,आभाळात दाटून आलेले ढग ,कधी कधी रिमझिम पाऊस तर कधी मध्येच ऊन पडत असे. कधीकधी आकाशात इंद्रधनु दिसत असे. तर कधीकधी ऊन आणि पाऊस या दोघांचेही दर्शन घडायचे. झिम्मा फुगडी व गाणी गाताना कधी अंधार पडायचा हे कळायचे सुद्धा नाही.
सर्वांना घरी जायची घाई असायची. घरी गेल्यावर हात पाय धुऊन देवपूजा आटोपून सर्वजण जेवायला बसत. पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. प्रत्येक जण नववधूला भरपूर खाण्याचा आग्रह करायचे.
रात्रीची सर्व कामे आटोपून नववधूला तिच्या सासरच्या मंडळी विषयी अनेक प्रश्न, ख्यालीखुशाली विचारली जात असे. माहेरची मंडळी तिला आपण पण कसे संयमाने वागायला पाहिजे हे पटवून देत असत.आपण कामात कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल सांगत असत. पुढे कधीतरी चांगले दिवस येतील असा सल्ला दिला जाई. या गप्पातच खूप रात्र झालेली असे.
अशाच प्रकारे दुसऱ्या दिवशी गावातील सर्वांच्या भेटीगाठी ख्यालीखुशाली विचारली जाई. आणि अशा रीतीने दुसराही दिवस कधी संपला हे कळत नसे.
तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नववधूला सासरी जायची तयारी करावी लागे. अतिशय दुःखी अंतकरणाने सर्वांची भेट घेऊन ती सासरच्या पाऊलवाटेने चालू लागे. परंतु तिचे मन मात्र माहेरच्या माणसांमधून निघायला तयार नसे.
Leave a Reply