गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना बघीतलंय ? नीट बघा.
कर्मकांडामधे आयुर्वेद कसा भिनलाय पहा.
नैवेद्याच्या ताटात पंचपक्वान्न सजलेली असतात.पाच प्रकारच्या भाज्या असतात. कोशींबीर, चटणी, वरण भात तूप असतेच.
नैवेद्य दाखवताना मंत्र आहेत.
प्राणाय स्वाहा
अपानाय स्वाहा
व्यानाय स्वाहा
उदानाय स्वाहा
समानाय स्वाहा
ब्रह्मणे स्वाहा
सहा वेळा हे मंत्र म्हणत ताटाभोवती पाणी फिरवायचे असते. हे घास आपण देवाला भरवतोय आणि देव जेवतोय, असा नामदेवाचा भाव मनात हवा.
लक्षात आले का , हे वायुचे पाच प्रकार आहेत. यातील प्रत्येक घास प्रत्येक वायुला अर्पण केला आहे. “आता याची जबाबदारी तुझी. पुढे न्यायचे, आणि पोटातील पाचकाग्नीच्या ताब्यात द्यायचे.माझी जबाबदारी संपली.” आजच्या भाषेत रिले रेस !
त्यांच्या नावाचा पुकारा करून स्मरण केले की, तो तो वायु सूक्ष्म रूपात तिथे हजर राहून आपली जबाबदारी पूर्ण करतो.
एखाद्या संघटनेमध्ये कसे कामाचे वाटप केले जाते. पाहुण्यांची जबाबदारी एकाने, निमंत्रणे दुसर्याने, रंगमंच व्यवस्था तिसर्यावर, चौथा भोजन. ज्याला जे काम नेमून दिले आहे ते तेवढेच सांगितलेले काम त्याने पार पाडायचे. दुसर्याच्या कामात जरापण ढवळाढवळ करायची नाही, तरच सगळी कामे उत्तमरीत्या पार पडतात. तसेच प्रत्येक वायुला, प्रत्येक पित्ताला काम नेमून दिलेले आहे. याची आठवण फक्त त्यांना नावे घेऊन करून दिली जाणे, म्हणजेच नैवेद्य दाखवणे.
सहा वेळा पाणी फिरवून झाले की पुनः एक मंत्र म्हणतात,
“मध्ये पानीयम् समर्पयामी ”
आणि ताम्हनात पाणी सोडायला सांगतात. म्हणजे देवाला अन्नाचे सहा घास भरवल्यानंतर भोजनाच्या मधे पाणी प्यायला दिले जाते. आणि पुनः सहा घास भरवले जातात.
“जेवताना मधे मधे पाणी प्यावे,” हा साधासोपा नियम या नैवेदयामी मधे दिसला.
जे जे देवाला ते ते देहाला या नियमानुसार, तोच नियम आपणालाही लागू पडतो.
ज्ञानमार्ग्याला या नैवेद्याच्या ताटात तूप वरण भात आणि गुळखोबर्यातल्या कॅलरीज दिसतील, त्या बर्न करण्यासाठी किती पॅडलमारावे लागतील, याचे गणित त्याच्या डोक्यात सुरू होईल.
कर्ममार्ग्याला त्या मंत्रामागील अनुभव दिसेल, आणि ग्रंथोक्त रेफरन्स न शोधता, तो त्यामागील कार्यकारण भाव शोधेल.
भक्तीमार्गी व्यक्तीला त्यातील भोळा अर्पणभाव दिसेल. देवाचा प्रसाद म्हणून, अन्य कोणताही विचार न करता, ताटाभोवती निःशंक मनाने तो पाणी फिरवेल.
नैवेद्याचे भरलेले ताट तेच आहे, पण एखाद्या चिकित्सक मनात केवळ शंका आणि शंकाच येत रहातील. तो नजरेसमोर जिम ठेवील, त्याचे ग्रंथोक्त रेफरन्स शोधत बसेल आणि ताटाभोवती पाणी फिरवत उगाच नुसता चिखल करेल.
बाकी तिघेजण, तो समोरचा नैवेद्य सहज फस्त करून टाकतील, पण चौथा वैद्य मात्र केवळ त्याची चिकित्साच करत बसेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
07.09.2016
Leave a Reply