गणेशजींना जसे मोदक आवडतात, तसे भगवान भोलेनाथना दूध आणि बेल आवडते. नागोबाला लाह्या, देवीला पुरणपोळी हे वैशिष्ट्याचे नैवेद्य.
भोलेनाथ जरी भोळे असले तरी उग्रसंतापी आहेत. जरा मनाविरूद्ध झालं की तांडवच सुरू. म्हणजे लगेचच पित्त वाढण्याचा प्रकार. मन बिघडले तरी तळपायाची आग लगेच मस्तकात जाणार ! थोडक्यात आजच्या भाषेत “यांचा ना क्षणात रक्तदाब वाढतो” आता बरे आहेत, तर पुढच्या क्षणाला काय होईल याचा नेम नाही, असे शंकर प्रत्येक घरात, प्रत्येक पार्वतीच्या वाट्याला आलेले असतात. (काही घरातील शंकर पार्वती अपवाद सोडून) अशा शंकररावांसाठी बेल हे ऊत्तम औषध आहे. मन बिघडल्यामुळे होणाऱ्या पित्ताचा दाह कमी होण्यासाठी बेलाची पाने हे छान औषध आहे.
भोलेनाथांची पिंडी बेलाच्या पानांनी याच कारणासाठी झाकून ठेवतात. रेडीएशनमुळे होणारे उपद्रव कमी होण्यासाठी देखील बेल काम करेल.
कारण एक अभ्यास असा सांगतो, की जिथे शंकरांची जागृत ज्योतीर्लिंगे आहेत, तिथे खाली अणुसाठे असण्याची शक्यता आहे. ते झाकण्यासाठी पिंडाकार डोम !!! जगामधे जिथे जिथे अणुभट्ट्या आहेत, तिथे तिथे पिंडीच्या आकारासारखे छत असते. (/ डोम असतात.)
हे त्याच्यातील साम्य.
महत्वाचे आहे ते म्हणजे पित्ताचा दाह कमी करणे.
आजचे संशोधन हेच सांगतेय की बेलपत्राचा वापर रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातोय.
यासाठी बेलाची चार पाने एक कप थंड पाण्यामधे सात आठ तास भिजवून ( आयुर्वेदीय परीभाषेत हिम करून ) ते पाणी पिण्यासाठी वापरावे. असे तीन महिने केल्याने रक्तदाब नियंत्रणात रहातो. असा अनुभव आहे.
तसेच पित्तशमनाचे काम दुधाचा अभिषेक पण करतो. नागोबालादेखील दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्यक्षात नागोबा दूध पित नाही, हे काय पूर्वजांना माहीत नव्हते ? नागोबाच्या लाह्या या उत्तम शोषक गुणाच्या आहेत. न पचलेले अतिरिक्त पाणी, आमसदृश्य विष शोषून घ्यायला लाह्याएवढे दुसरे चांगले औषध नाही.
प्रतिकपूजेमधे हे सर्व गृहीत धरलेले आहे.
देवाला वाहिलेली सर्वप्रकारची पाने फुले या पण औषधीच आहेत. या पानाफुलांनी, देवाला केलेल्या दुधाचा किंवा पाण्याच्या अभिषेकाने, हे पाणी किंवा दूध न रहाता, तीर्थ बनते. यातही या पानाफुलांचा औषधी अर्क उतरलेला असतो. म्हणजे हा तीर्थ प्रसाद औषधच झाले ना ?
आणि हा तीर्थ प्रसाद दररोज घ्यायचा. मग वेगवेगळ्या औषधांची गरज भासेल ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
10.09.2016
Leave a Reply