नैवेद्य दाखवताना शरीर आणि मन शुद्ध हवे, हेच खरं. भाव महत्वाचा !
जेवणाला सुरवात करताना दारात आलेल्या याचकाला कधीही उपाशी, विन्मुख पाठवू नये. त्याला यथाशक्ती जे असेल ते द्यावे. इथे अतिथीची कधीही जातपात बघीतली जात नाही हे विशेष ! ही संस्कृती !
आपल्याला वाढलेल्या अन्नातून सर्व पदार्थांचा मिळून एक घास होईल एवढे अन्न काढून बाजूला ठेवावे. हा घास गोमातेसाठी असतो. याला गोग्रास असे म्हणतात.
( आता काही जणांना गाईला माता म्हणण्यावरच आक्षेप असतो, त्यांनी काय करावे ? जसा संकल्प तसे फळ मिळते. असो.)
घरातील कुत्रा, मांजर, पोपट, गाय बैल, इ.पाळीव प्राणी यांना प्रथम एक घास भोजन द्यावे.
एवढेच नव्हे तर कावळ्याला सुद्धा घास बाहेर नेऊन ठेवावा.
आणि भोजन संपल्यावर एक घास, संस्कार न होता मृत झालेल्या पितरांच्या नावे ताटाबाहेर ठेवावा. आपल्या पूर्वजांनी, आपण पोट भरत असताना इतरांचाही किती सूक्ष्मरीत्या विचार केला आहे ना !
पान वाढायला सुरवात केली की त्रिसुपर्ण नावाचे अन्नाची, अग्नीची स्तुती करणारे एक स्तोत्र आहे, ते म्हणावे. येत नसल्यास अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे, तेही येत नसल्यास एखादा श्लोक म्हणावा. किंवा नामस्मरण करावे.
सज्जनगडी भोजनप्रसादासाठी बसल्यावर श्रीराम जयराम जयजय राम असा मंत्र म्हणवून घेतात. राम नामाने विषहरण होते. म्हणून भोलेनाथांनीपण जो जप केला तो करावा. ( कदाचित ) प्रत्यक्ष अन्नामधील विष नष्ट होणार नाही, पण मनातील विचारांचे विष मात्र नक्कीच कमी होते, असा अनुभव आहे.
मंत्र म्हणत असताना वातावरण सात्विक होत जाते. मनातील रज, तम दोष नाहीसे होत जातात, हे सेवन केले जाणारे अन्न मला शतायुषी निरोगी बनविणारे आहे, असा संकल्प करावा.
कालानुरूप या अन्नामधे निर्माण झालेले दोष, देवाच्या नामस्मरणाने आणि आपण केलेल्या संकल्पाने नाहीसे होतात आणि अन्न शुद्घ होते. असा भाव मनात आणावा. म्हणजे जे दोष आपण टाळू शकत नाही त्याची तीव्रता कमी होते.
काहीजणांना ग्रंथात जसे वर्णन केले आहे, तसे शास्त्रोक्त भोजन मिळणे, योग्य वेळी मिळणे, सहा चवींच्या सर्व गुणांनी संपन्न मिळणे, योग्य व्यक्तीने उजव्या हातानेच गरमगरम वाढणे, दुरापास्त आहे. अशांनी काय करावे, यासाठी संकल्प करावा. कालानुरूप बदल म्हणजे हे असे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
13.09.2016
Leave a Reply