काल रात्री हॉटेलच्या डायनिग लाउंज मध्ये जेवायला गेलो तेव्हा ७-८ तरुण-तरुणींचा घोळका त्यांच्यापेक्षा वयाने किंचित (कदाचित १०-१२ वर्षांनी) मोठ्या असलेल्या एका तरुणीचे sermon चेहेऱ्यावर गांभीर्य पांघरून ऐकत होता. बहुधा कॉर्पोरेट ट्रेनिंग साठी मंडळी जमली असावीत आणि ती प्रशिक्षक असावी.
दिवसभर काय हवं होतं, कोण कोठे चुकलं याचं निर्ममपणे ती विश्लेषण करीत होती, हातात छडी नव्हती एवढंच फक्त पण आव तोच-पंतोजीचा ! कोणी काही खुलासा करायचा प्रयत्न केला तर अधिक वेगाने उसळून येत,तिचा मारा तीक्ष्ण व्हायचा. सुमारे १०-१५ मिनिटांनी ती दमली, संपली.
जेवण आलं टेबलवर आणि कारंजी उसळली. तिच्या अस्तित्वाची फारशी दखल न घेता हसत-खेळत भोजनास्वाद सुरु झाला. नाहीतरी परगांवचे प्रशिक्षण म्हणजे पिकनिक मानायची आपल्याकडे पूर्वापार प्रथा आहेच. दिवसभराची बौद्धीक सत्रे (एकदाची) संपली की दंगा सुरु !
मग एकाने स्वतःच्या पासपोर्टवरील नांवाची गंमत सांगितली. दुसरीने आपली लहान बहीण आपल्यापेक्षा वरचढ होण्याच्या प्रयत्नात कशी असते याचे किस्से सुरु केले. प्रत्येक कथनानंतर हास्याचा डोंब. लाउंजमध्ये असलेल्या आम्हां सर्वांकडे दुर्लक्ष करीत तो जोश सुरु होता.
क्वचित एखादं वाक्य बोलून ती कळपात शिरायचा प्रयत्न करायची आणि त्याची फारशी नोंद न घेता हास्यजत्रा पुढे जायची. स्वतःचे विषय, स्वतःचे किस्से, स्वतःचे विश्व यांत रमून गेलेली तरुणाई निरखणं नक्कीच धमाल असते. बरंच काही शिकायला मिळतं -कॉईन केलेली अपरिचित भाषा, देहबोली, उसासून जगण्याला भिडणे, सहजस्पर्श- पुरातन स्त्री-पुरुष अवडंबर नसलेले ! सगळं नैसर्गिक, उत्फुल्ल आणि स्वतःमध्ये गुंगलेलं जगणारी पिढी !
मूकपणे आपले सूप ढवळत ती नवलाईने सारं निरखत होती. थोड्या वेळापूर्वीची PIP ( Previously Important People) असलेली ती आपसूक परिघाबाहेर गेली.
काही वेळाने “बाय गाईज , सी यू टुमारो “म्हणत तिने मैफिलीतून काढता पाय घेतला. त्याचीही फारशी फिकीर कोणाला वाटली नाही. तिला वगळून सुरु असलेली मैफिल तितक्याच जोरकसपणे पुढील पानावर गेली.
कुटुंबात, समाजात, संस्थेत हे आपसूक, न ठरविता घडत असतं. तुमचं महत्व चिरकाल टिकत नाही. वेळ आली की मग (आणि ज्याला ते अचूक समेवर येणं समजतं) त्याने काढता पाय घ्यायचा असतो या जंजाळातून !
स्वतःला उच्च स्थानावर नेण्याची ती किंमत असते. तुम्ही कळपाचे राहात नाही आणि कळपाची गरजही संपलेली असते. परिघाबाहेर तुम्हांला टाकून वर्तुळ स्वतःला सांधून घेत असते.
तिचे आणि तिच्या निमित्ताने माझेही काल अनाहूत प्रशिक्षण झाले.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
True ! It is we however refuse to learn.
chhan, kharech pratyek prasang aapanas kahi tari shikaun jat asato.dhanyawad
mob 9403030939