“मुस्कुराईये की आप लखनऊ में हैं।” लखनऊ एअरपोर्टवर पाऊल टाकता क्षणी तिथल्या भिंतीवर लिहिलेल्या ह्या वाक्याने माझं लक्ष वेधून घेतलं.ते वाचून खरंच काहीही कारण नसताना चेहऱ्यावर हसू उमटलं.वाटलं नुसतं हे वाक्य वाचून जर इतकं प्रसन्न वाटतंय तर मग लखनऊ मध्ये फिरताना किती प्रसन्न वाटेल.पण आधीच फ्लाईट उशिराने पोहोचली होती त्यामुळे अजून वेळ न दवडता पटापटा बेल्टवरून बॅगा उचलून आम्ही बाहेर आमच्यासाठी उभ्या असलेल्या टॅक्सीत बसून अयोध्येकडे निघालो.
उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं कृषीप्रधान राज्य.मोहोरी,ऊस आणि बटाटे इथली प्रमुख पिकं.महामार्गांच्या अगदी लगत जर्द पिवळ्या फुलांनी आच्छादलेली लांबच लांब पसरलेली मोहोरीची हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत होती.त्यात हवेत अगदी दुपारच्या दोनच्या टळटळीत उन्हातसुद्धा हवेत किंचित असलेला गारवा छान आल्हाददायक वाटत होता.अयोध्येला जाण्याच्या वाटेवर टॅक्सीत बसल्या बसल्या लहानपणी टीव्हीवर पाहिलेल्या रामराज्य,भरतभेट सारख्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांमधली काही दृश्यं झरझर डोळ्यांसमोर तरळून गेली. त्यावेळी बऱ्याच तांत्रिक मर्यादा असूनसुद्धा हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करून अशा सिनेमांमध्ये जे ट्रिक सीन्स चित्रित केलेले असायचे ते त्या बालपणीच्या कोवळ्या वयात असे काही मेंदूत कोरून बसायचे की आज वयाची पन्नाशी गाठली तरी तसेच्या तसे डोळ्यांसमोर येतात.बालपणीच्या आठवणींमध्ये असा अंदाधुंद संचार करताना आम्ही कधी अयोध्या गाठलं ते कळलंच नाही.पोहोचेपर्यंत सूर्य बुडाला होता आणि मिट्ट काळोख झाला होता त्यामुळे फिरायला बाहेर पडण्याचा तर प्रश्नच नव्हता.असंही उशिराने पोहोचलेल्या फ्लाईटचा आणि लागलीच नंतर टॅक्सीच्या प्रवासाचा थकवा असा काही आमच्या अंगावर आला की उदरम् भरणम् करून आम्ही अंगच टाकून दिलं.
सध्या राममंदिर पुनर्निर्माण कार्याचे वारे टीव्हीवर अधूनमधून इतके जोरदार वाहतात की कधी काळी रामराज्य असलेलं अयोध्या प्रत्यक्षात कसं असेल ह्याचे बरेच कल्पनाविलास मी ट्रिप सुरू होण्याआधी केले होते.त्यातून राम,लक्ष्मण आणि सीतेच्या अखण्ड मूर्ती घडवण्यासाठी नुकत्याच नेपाळहून तिथे पोहोचलेल्या शाळिग्राम शीळा बातम्यांमध्ये पाहिल्यावर तर माझ्या कल्पनांचे मनोरे जरा जास्तच उंचावले होते.पण प्रत्यक्षात मात्र माझ्या ह्या मनोऱ्यांना सुरूंगच लागला.मंदिराच्या उभारणीचं काम तर जोरात सुरू आहे,राम जन्मभूमी असलेल्या ठिकाणी आज उभ्या असलेल्या देवळामधल्या राम,लक्ष्मण,भरत,शत्रुघ्न ह्यांच्या मूर्तीसुद्धा देखण्या आहेत पण देवळाच्या आजूबाजूच्या परिसरात असलेला कमालीचा बकालपणा,दारिद्र्य मात्र सतत डोळ्यांना टोचत रहातं.त्यातून जागोजागी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे उडत राहणारा धुरळा ह्या सगळ्या अस्वच्छपणात अजूनच भर घालत होता.ह्या सगळ्यात जर का काही सुखावणारं असेल तर ते होतं शरयू नदीच्या काठावरची स्वच्छ शुभ्र घरं आणि शांतपणे वाहणारी शरयू नदी.ह्या शरयू नदीवर अगदी बनारसच्या गंगा आरतीसारखीच पण छोटेखानी पद्धतीने सूर्यास्ताच्या वेळी आरती केली जाते.ह्याचं गंगा आरतीसारखं ब्रॅण्डिंग केलं गेलेलं नसल्यामुळे इथे आरती पाहायला येणारी लोकंसुद्धा गंगा आरतीच्या जवळपास एक दशांश असतात असं म्हणता येईल पण आरतीचा सोहळा कमीजास्त अंशाने साधारण त्याच पद्धतीने पार पडतो.
बाकी जगात भारताचे धागेदोरे कुठे सापडतील ह्याचा काही नेम नाही.ह्या अयोध्येचं आणखी एक गंमतशीर वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे इथलं Queen Heo Hwang Ok Memorial Park.आहे ना Tongue Twister? राम जन्मभूमीमध्ये काही कोरीयन connection पण सापडेल ह्याची जराही कल्पना नव्हती.कोरीयन पर्यटकांसाठी हे काशीपेक्षा कमी नाही.वास्तविक अजून हे पर्यटकांसाठी खुलं केलं गेलेलं नाही.भारत सरकार आणि कोरियन सरकार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ह्याचंही सध्या बांधकाम आणि सुशोभीकरण सुरू आहे,कदाचित लवकरच हे पर्यटकांसाठी खुलं केलं जाईल.ह्या स्मारकामागची आख्यायिका फार रोचक आहे.ही दक्षिण कोरीयन राणी Queen Heo Hwang Ok जन्माने भारतीय.अयोध्येमधल्या कौसला प्रांताचा राजा पद्मसेन आणि राणी इंदुमतीची ही मुलगी.इसवीसनपूर्व ४८ मधला तेव्हाचा हा कौसला प्रांत,आज मितीला अयोध्या आणि ओडिसापर्यंत मिळून पसरलेला आहे. ह्या राणीचं मूळ नाव राजकुमारी “सुरीरत्ना”.असं म्हटलं जातं की एक दिवस राजा पद्मसेनला आपल्या कन्येचा विवाह दक्षिण कोरियाचा तत्कालीन राजपुत्र “किम सुरो”शी होत असल्याचं स्वप्न पडलं.त्यामुळे जेमतेम सोळा वर्षाची असताना सुरीरत्ना आपल्या पित्याच्या आदेशावरून आपल्या दासदासींच्या काफिल्यासकट किम सुरोशी लग्न करायला बोटीने दक्षिण कोरीयाला पोहोचली जिथे मग त्या उभयतांनी यथावकाश लग्न केलं.ही कथा आपल्याला ह्या स्मारकाच्या आतल्या भिंतींवर चितारलेली पाहायला मिळते.आज जवळपास सहा लाख कोरीयन आपण ह्या राणीचे वंशज असल्याचा दावा करतात आणि आपल्या ह्या लाडक्या राणीला आदरांजली वाहायला दरवर्षी लाखोंच्या संख्येने अयोध्येमध्ये गर्दी करतात.
तसं आपली प्रसारमाध्यमं,समाजमाध्यमं आणि बॉलिवूड कोणत्याही देशाचा,ठिकाणाचा,छोट्याशा बातमीचा किंवा साध्याशा समारंभाचा सोहळा साजरा करून त्याचा मोठा ब्रँड तयार करण्यात वेळोवेळी फार मोलाचा वाटा उचलत असतातच.अगदी ७० च्या दशकात झीनत अमिताभच्या द ग्रेट गॅम्बलर मधल्या गाण्याने तमाम जनतेला व्हेनिसच्या गंडोला राईडची जी भुरळ घातलीय ती आजतागायत तितकीच ताजीतवानी आहे.पॅरिस,ग्रीस,स्पेन,काश्मीर,मिर्झापूर,बनारस,गोवा अशी बॉलीवूडने किंवा प्रसारमाध्यमांनी रातोरात नशीब उजळून टाकलेल्या ठिकाणांची,देशांची यादी न संपणारी आहे.तसं काहीसं चेतन भगतचं “ट्वेंटी ट्वेंटी” पुस्तक आणि विकी कौशल,रिचा चड्ढाचा “मसान” पाहून बनारस बद्दलचं चित्र माझ्या मनात तयार झालं होतं.ट्वेंटी ट्वेंटी मध्ये लिहिलेलं वाराणसीच्या गंगा आरतीचं वर्णन आणि “मसान”मधली बनारसच्या मणिकर्णिका घाटावरची दृश्यं, कधी उत्तर प्रदेशला जाईन तेव्हा हे नक्की पाहीन म्हणण्याइतकं बनारसच्या गंगा घाटाचं वर्णन डोक्यात घट्ट रुतून बसलं होतं.
प्रत्यक्षात काशी विश्वेश्वराचं देऊळ, देवळाच्या फक्त अगदी लगतचा परिसर आणि देवळाच्या मागून मणिकर्णिका घाटाकडे जायला तयार केलेला प्रशस्त मार्ग गंगा आरतीच्या आमिषाने जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंनी बनारसमध्ये ओतणाऱ्या पर्यटकांना विचारात घेऊन तयार केला असल्यामुळे तेवढा स्वच्छ आहे.पण संध्याकाळची गंगा आरती ज्या दश्वमेध घाटावर होते तिथपर्यंत जाणारी वाट,गंगा आरतीच्या निमित्त्याने आपलं उखळ पांढरं करू पाहणारे आशाळभूत पुजारी,एका जागेमागे लठ्ठ पैसे आकारून आरती पाहायला आपल्या दुकानात मोक्याची जागा उपलब्ध करून देण्याचाही व्यवसाय करणारे तिथले दुकानदार किंवा अगदी नावाडीसुद्धा आपल्या देशाची काय प्रतिमा परदेशी पर्यटकांच्या मनात तयार करत असतील हा विचार मनाला सतावत राहतो.तिथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार “अब २०१६ से हमारा बनारस बहुत साफ सुथरा हो गया हैं ।”. मग जर सध्याचं बनारस म्हणजे बनारसची स्वच्छ सुधारित आवृत्ती असेल तर २०१६ च्या आधीचं अस्वच्छ बनारस कसं होतं ह्याची कल्पनाच न केलेली बरी.आपण म्हणतोय एकोणिसावं शतक ब्रिटिशांचं होतं,विसावं अमेरिकेचं आणि एकविसावं भारताचं असणार आहे.२१ व्या शतकात भारताला एक महासत्ता म्हणून उदयास आल्याचं स्वप्नं पाहत असताना मणिकर्णिका घाटापासून दश्वमेध घाटापर्यंत जाणाऱ्या वाटेवर शिक्षणाच्या “श”पासूनसुद्धा कोसो दूर असलेली बिना कपड्यांची उनाडक्या करणारी कळकट मळकट मुलं,संन्यासी,भिकार वर्ग नक्की आपण त्याच २१ व्या शतकात जगतोय का हा विचार करायला आपल्याला भाग पडतात.वाहतूक शिस्तीचा आणि बनारसचा तर सुतराम संबंध नाही.समोरचा रस्ता पूर्ण रिकामा असला तरी अकारण कर्णकर्कश्श हॉर्न पिटत जाणारी वाहनं,कधीही,कुठूनही अचानक समोर येणारी माणसं आणि वाहनं म्हणजे केवळ उच्छाद.सैन्य छावणीचा भाग तेवढा बऱ्यापैकी स्वच्छ आहे.काशीचं पूर्वापार असलेलं आध्यात्मिक महत्त्वं पहाता अधिकाधिक परदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठी केलं गेलेलं गंगा आरतीचं ब्रॅण्डिंग वगैरे सगळं ठीकच आहे पण मला मात्र शांत आणि संथपणे वाहणाऱ्या शरयू नदीच्या काठावरची,कोणताही व्यावसायिक बाजारूपणाचा स्पर्श नसलेली आरती जास्त भावली.
बनारस मध्ये आलेल्या कोणत्याही स्त्री ला ठठेरी बाजार मध्ये खरेदी न करता परत न निघण्याचा मोह आवरणार नाही.हो मात्र बायकांची खरेदी पाहून आपल्या खिशाला नक्की किती कात्री लागणार आहे ह्या सध्या कल्पनेने सुद्धा बिचाऱ्या पुरुषांना घाम फुटतो एवढं मात्र खरं.ह्या ठठेरी बाजारात अगदी हजार रुपयांपासून ते काही हजारांपर्यंत अगदी मऊ, तलम अस्सल बनारसी साड्यांपासून जामदानी पर्यंत हवी ती साड्यांची variety पाहून काय घेऊ काय नको असं होऊन जातं .साड्यांचे मऊ पोत आणि तितकेच मोहक रंग यांनी स्त्री मनाला वेड नाही लावलं असं होणंच शक्य नाही.पण पुरुषांनी सुद्धा खट्टू होण्याची गरज नाही विशेषतः जे अस्सल खवय्ये आहेत त्यांच्यासाठी आहे,थंडीच्या दिवसांत इथे खास मिळणार पदार्थ ,तो म्हणजे मलैय्यो.बायकांनी खरेदी करून खिसा रिकामा केल्या नंतर ह्या “मलैय्यो”चाच काय तो जीभेला आणि मनाला थंडावा ! त्याशिवाय गरम गरम खस्ता कचोरी,जिलबी नाही तर १/२ किलो किंवा १ किलोचा एक असा वजनावर केला जाणारा जलेबा,हो बरोबर वाचलंत ..जिलबी नाही इथे जलेबा मिळतो.जिथे एका जिलबीचं वजन कमीत कमी अर्धा किलो असेल त्याला जिलबी म्हणावं तरी कसं ? असे एक ना एक अनेक बनारस ची खासियत असलेले पदार्थ आहेत जे चाखून न पहाणं म्हणजे बनारसचा अपमानच म्हणायला हवा.
ह्या उत्तर प्रदेशने आपल्या देशाला कबीर,तुलसीदास सारखे अतिशय महान संत,अकबर इलाहाबादी,महादेवी वर्मा,मुन्शी प्रेमचंद सारखे अनेक मनस्वी कवी,कवयित्री आणि साहित्यकार तर दिलेच पण लालबहादूरशास्त्री,चंद्रशेखर आझाद सारखे निडर स्वातंत्र्य सेनानी सुद्धा दिले.तरीही अलाहाबाद आणि अमिताभ बच्चन हे समीकरण आपल्या सगळ्यांच्या जास्त लक्षात रहातं. गंगा,यमुना आणि अदृश्यरूपात असलेली सरस्वती नदी अशा तीन विस्तीर्ण नद्यांच्या संगमावर वसलेल्या अलाहाबादने म्हणजे आजच्या प्रयागराजने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावलीय.इथलं आनंद भवन आणि चंद्रशेखर आझाद पार्क ह्या इतिहासाची साक्ष आहेत.संध्याकाळच्या वेळी चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये दाखवला जाणारा लाईट आणि साऊंड शो अलाहाबादच्या एकंदरीतच इतिहासाविषयीची बरीच काही सत्यं आपल्यासमोर उलगडतो.
पण आमच्या ह्या सहलीचं काहीसं surprise package निघालं कानपूर.तसं तिथे फार काही आवर्जून जाऊन पाहण्यासारखं दिसलं नव्हतं पण दिवसभर हॉटेलवर बसून नुसत्या तुंबड्या लावण्यापेक्षा संध्याकाळच्या वेळी थोडे पाय मोकळे करावे म्हणून हॉटेलवरून बाहेर पडलोच.कानपूरपासून १७-१८ किलोमीटरवर आहे वाल्मिकी आश्रम आणि लवकुशांचं जन्मस्थान.ह्याच वाल्मिकी आश्रमात वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले.ज्या पिलू वृक्षाखाली बसून त्यांनी घोर तपश्चर्या केली होती तो वृक्ष आजही तिथे उभा आहे.बाकी माणूस विज्ञानाची कास धरून कितीही मोठा झाला,प्रगत झाला तरी निसर्गाने काही पत्ते स्वतःकडे राखून ठेवले आहेत हेच खरं.निसर्गाच्या मनाचा पुरता थांगपत्ता माणसाला लागणं तसं कठीणच.ह्या “पिलू” वृक्षाच्या बाबतीतली निसर्गाची किमया तरी कशी असावी,जसजसा खोडाकडून हा वृक्ष थकत जातो तसतसं आतूनच ह्या वृक्षाचं पुनरूज्जीवन सुरू होण्याची प्रक्रिया सुरू होते.त्यामुळे वर्षभर हा वृक्ष हिरवागार असतो,फारशी पानझड होत नाही.जसा वृक्ष वरून जीर्ण होत जातो,तसं ह्याच्या खोडाच्या वरच्या भागाचा भुसा व्हायला सुरुवात होते पण तिथेच आतून आपल्याला नवीन खोड फुटत असल्याचं पाहायला मिळतं.त्याचबरोबर ह्या आश्रमात सीता धरणी दुभंगून पृथ्वीच्या पोटात सामावते ती जागाही इथेच पाहायला मिळते.ह्या वाल्मिकी आश्रमापासून जवळच ब्रम्हावर्त घाटावर ब्रम्हदेवाच्या खडावेमधली पडलेली चूक,जी कधी काळी सोन्याची होती असं सांगितलं जातं,ती पाहायला मिळते.ही चूक किंवा खिळा जिथे रुतलेला आहे तो संपूर्ण पृथ्वीचा केंद्रबिंदू समजला जातो.ह्या ठिकाणाहून दोन्ही ध्रुवांपर्यंतचं भौगोलिक अंतर सारखंच आहे असं म्हणतात.ह्या ब्रम्हावर्त घाटापासून थोड्या अंतरावर ध्रुव टिला आहे,ज्या ठिकाणी ध्रुव बाळाने तपश्चर्या करून आकाशात स्वतःसाठी अढळ स्थान मिळवलं.इथेच एक छोटेखानी पेशवेकालीन दत्तमंदिर सुद्धा आहे ज्याची देखरेख करण्याचं काम “मोघे” नामक मराठी कुटुंब आज पिढ्यानुपिढ्या करतंय,आताच्या ह्या मोघ्यांचे आजोबा पेशव्यांच्या दरबारी होते.अमराठी मातीत मराठी माणूस भेटल्याचा आनंद काही वेगळाच असतो.
तेहज़ीब और नज़ाकत जहाँ मिले उस जगह को लखनौ कहते हैं |
इत्र से जहाँ लोगों को अपनी पहचान मिले उसे कन्नौज़ कहते हैं |
अत्तरांची मायभूमी “कन्नौज”.आमच्या पिढीपर्यंत डॉक्टर,इंजिनियर हेच काय ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं ध्येय असावं आणि तसा तो किंवा ती घडली की त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य सफल संपूर्ण झालं असाच समज रूढ आणि दृढ होता.पण आताची तरूणाई खूप वेगळी आहे. तिच्यात इतकी धडाडी आहे की अगदी नकळत्या वयापासूनच उद्योजक होण्याची ती नुसती स्वप्नं पहात नाहीये तर अनवट वाटा चोखाळातेही आहे. आपल्या सरकारी संस्थांमध्ये भावी उद्योजक घडवण्याच्या हेतूने असे कित्येक अभ्यासक्रम राबवले जातात ज्यांच्याबद्दल आपल्याला थोटुकभर सुद्धा माहिती नसते पण इंटरनेटने ज्ञान आणि जग इतकं जवळ आणलंय की सगळं काही घर बसल्या हाताच्या बोटांवर उपलब्ध झालंय आणि आजची तरूणाई त्यांना हवी असलेली माहिती बरोबर ढिगातून सुई शोधून काढावी तसं शोधून काढतेही आहे.असे अभ्यासक्रम राबवणाऱ्यांपैकीच एक संस्था म्हणजे आपलं “FFDC” “फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर डेव्हलपमेंट सेन्टर” अर्थात शुद्ध हिंदीत सांगायचं तर “सुगंध एवं सुरस विकास केंद्र”.सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग खात्याच्या अंतर्गत १९९१ मध्ये ह्या संस्थेची स्थापना झाली.अत्तर बनवण्याच्या प्रक्रियेत उपयोगी असलेल्या किंवा वापरात येणाऱ्या नानाविध वनस्पतींचा संशोधनपूर्ण अभ्यास ही संस्था करते.संस्थेत आपल्याला अत्तर तयार करण्याची शास्त्रशुद्ध प्रक्रियासुद्धा समजावली जाते.इथे दोन महिन्यांचे,तीन महिन्यांचे आणि एक वर्षाची पदविका असे तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवले जातात जे ह्या क्षेत्रातले भावी महत्त्वाकांक्षी उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने तयार केले गेलेले आहेत.तिथे एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम शिकत असलेल्या अशाच दोन भावी तरूण उद्योजकांशी संस्थेच्या संचालकांनी आमची ओळख करून दिली.त्या दोघांनी आम्हाला वेगवेगळ्या वनस्पतींची ओळख करून देण्यापासून,Quality कंट्रोलपर्यंत अत्तर तयार करण्याच्या प्रक्रियेची अतिशय सखोल माहिती पुरवली.सध्याच्या संचालकांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या बारा वर्षांमधला FFDC च्या प्रगतीचा आलेख थक्क करणारा आहे.आज ही संस्था इतकी स्वयंपूर्ण आहे की कोणत्याही आर्थिक अनुदानासाठी तर नाहीच पण संचालकांपासून ते संस्थेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यापर्यंत कोणाच्याही पगारासाठी सुद्धा ह्या संस्थेला सरकारकडे हात पसरण्याची गरज भासत नाही.वर्षभराच्या अभ्यासक्रमाच्या जेमतेम तीन महिन्यांच्या कालावधीतच ह्या दोन्ही मुलांनी शुद्ध गुलाबपाण्यापासून घेऊन ते “शमामा” पर्यंत वेगवेगळी अत्तरं तयार करून बाहेरच्या बाजारपेठेत विकायला सुरूवात सुद्धा केलीय ह्यावरूनच ह्या अभ्यासक्रमाची ताकद समजते.
FFDC चे संचालक मूळचे बनारसचे त्यामुळे बनारसबद्दल भरभरून बोलताना म्हणाले होते ,”दो दिन में क्या देखोगे बनारस,कम से कम चार दिन लेके आईयेगा अगली बार । बनारस की सुबह नहीं देखी तो क्या देखा और रात में लखनौ नहीं देखा तो क्या देखा ?” त्याच वेळी ठरवलं होतं की बनारसच्या घाटाचं उगवत्या सूर्याच्या कोवळया किरणांमधलं सौंदर्य पहाणं भलेही आमचं हुकलं असलं तरी लखनौ मात्र रात्री पहाणं चुकवायचं नाही.लखनौ मध्ये पाऊल टाकेपर्यंत माझ्या मनात लखनौचं खूप वेगळंच चित्र होतं.आता पर्यंत फिरताना सगळीकडे नजरेस पडलेला बकालपणा,अस्वच्छपणा,दारिद्र्य ह्याचाच डोळ्यांवर पडदा होता.पण प्रत्यक्षात लखनौमध्ये पोहोचल्यावर मात्र मी प्रेमातच पडले लखनौच्या.ब्रिटिश राजवटीच्या काळात गोऱ्यांना सुद्धा अगदी माझ्यासारखीच मोहिनी पडली असावी लखनौची त्यामुळे त्यांच्या राजवटीच्या काळात अनेक गोरे साहेब मंडळी अगदी आनंदाने ह्या लखनौ मध्ये आपला डेरा जमवून बसले असावेत.
१८५७ च्या राष्ट्रीय उठावात आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी गोळीबार केल्यामुळे आज उभी असलेली भग्नावस्थेतली रेसिडेंसिची वास्तू आणि मेजर जनरल Claude Martin ह्या धनाढ्य फ्रेंच अधिकाऱ्यानी १८ व्य शतकात बांधलेली La Martiniere शाळेची वास्तू हे त्याचे सबळ पुरावे.लखनौ आहेच तसं प्रेमात पडण्यासारखं.रेसिडेन्सीच्या अवाढव्य परिसरावरून ब्रिटिशांच्या त्यावेळच्या शाही इतमामाचा पुरेसा अंदाज बांधता येतो.त्यावेळी भारतीय रयतेचं यथेच्छ शोषण करून गोरे कसे विलासी आयुष्य जगत होते हे पाहिल्यावर आपल्या भारतीयांची तळपायाची आग मस्तकात नाही गेली तरच आश्चर्य.La Martiniere शाळेची भव्य आणि देखणी प्रासादिक वास्तू पाहून ती शाळा आहे हे सांगावं लागेल.पण अशी रम्य शाळा असेल तर मुलांची काय बिशाद की ती शाळेत रमणार नाहीत.असं म्हणतात कि हुसैनाबाद मध्ये जो क्लॉक टॉवर आहे त्याच्या मनोऱ्यावर १८ व्या शतकात सोन्याची चिमणी होती.पण अर्थातच असं काही दिसलं आणि ब्रिटिशांनी ओरबाडून नेलं नाही हे तर शक्य नाही.ह्या क्लॉक टॉवर म्हणजे “घंटाघर”च्याच जवळ असलेल्या बारादरीच्या म्युझियम मध्ये आपल्याला बाराव्या आणि तेराव्या शतकातली ब्रिटिश चित्रकारांनी भाज्या फळांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगानी आणि रत्नांचा बारीक चुरा वापरून काढलेली वेगवेगळ्या पिढीतल्या तत्कालीन मुघल नवाबांची आणि शासकांची जी ३डी तैलचित्रं पाहायला मिळतात ती निव्वळ लाजवाब.. अर्थातच ते सगळे चित्रकार पुन्हा तशाच कोणत्याही कलाकृती घडवू शकणार नाहीत ह्याचा बंदोबस्त सुद्धा त्या त्या मुघल शासकांनी केला हे वेगळं सांगायला नको !
कधी कोणत्या हयात असलेल्या मुख्यमंत्र्याने स्वतःचं स्मारक बांधलेलं पाहिलंय का कधी.नसेल पाहिलं तर लखनौ मध्ये मात्र असं स्मारक पाहायला मिळेल.गोमती नगर सारख्या अगदी मध्यवर्ती भागात सुद्धा आधी जिथे ओसाड रान होतं,त्याचा कायापालट झालाय “मायावती नगरी” या नावाने.ह्या स्मारकाचं जे सुशोभीकरण केलं गेलंय ते निर्विवाद सुंदरच आहे पण सुशोभीकरणासाठी जयपूर दगडातून साकारलेला एक एक हत्ती जर का सत्तर लाखांचा असेल तर हे स्मारक इतकं सुंदर घडलं नसतं तरच नवल. इथेच उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती देवींनी फक्त स्वतःचा नाही तर बरोबरीने आपल्या वडिलांचा सुद्धा पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे.पण मायावती नगरी,गोमती रिव्हर फ्रंट येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी होतं हे मात्र खरं.लखनौमध्ये सगळंच कसं भव्य दिव्य.इथले छान सुंदर प्रशस्त रस्ते दिल्लीच्या चाणक्यपुरीची आठवण करून देतात.जुनं लखनौ थोडंफार अस्वच्छ असलं तरी अवधी पदार्थ चाखून पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी जुन्या लखनौपेक्षा योग्य जागा नाही.तसं दिल्ली इतकंच किंबहुना किंचित जास्तच,लखनौसुद्धा आंग्लाळलेलं वाटलं.एअरपोर्टच्या रस्त्यावरचे किंवा शहराच्या मध्यवर्ती भागामधले एक से एक भव्य मॉल्स आपल्या मुंबईच्या मॉल्सना सुद्धा लाजवतील असे.एक क्षणभर तर मुंबईला पवईच्या हिरानंदानी गार्डन्स सारख्या उच्च्भ्रू भागात फिरतोय की लखनौमध्ये असा प्रश्न पडावा.FFDCचे संचालक म्हणाले होते ते खरंच होतं.रात्रीच्या रोषणाईत लखनौचं सौंदर्य कसं निखरून निघालं होतं.रात्री सतत बदलणाऱ्या रंगांच्या सुंदर रोषणाईत लखनौचं विधानभवन आणि लोकभवन तर अगदी एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखीच दिसतात.
आमचा ड्राइवर सांगत होता की आज उत्तर प्रदेशात गुन्हा करताना गुन्हेगार शंभर वेळा विचार करतो,कारण गुन्हा केल्यावर त्याचे भोगायला लागणारे परिणाम इतके गंभीर आहेत की साधी गाडी सुद्धा लोकं आता वाटेल तिथे लावत नाहीत.गुन्हेगारी तर जवळपास संपुष्टात आलेलीच आहे पण अयोध्यायेच्या देवळाच्या मंदिर उभारणी बरोबरच जागोजागी राष्ट्रीय,राज्य महामार्गांची कामं आणि इतर अनेक पायाभूत सुविधांची कामं जोरदार सुरु आहेत.परिणामी अगदी छोट्याशा गावाकडे जाणारा रस्तासुद्धा छानच आहे. नुकत्याच खुला झालेल्या आग्रा लखनौ महामार्गाचा प्रवास तर एक शब्दातीत अनुभव होता.आणि हा विकास सिने आणि संगणक उद्योगांसारख्या मोठ्या उद्योगांमधली गुंतवणूक उत्तर प्रदेश मध्ये वळवण्याचा दृष्टीने अतिशय जाणीवपूर्वक केला जातो आहे हे तिथल्या स्थानिक लोकांशी गप्पा मारताना जाणवलं.मुंबई मात्र देशाची आर्थिक राजधानी असूनसुद्धा तिच्या ह्या रुदब्याला शोभेल असा तिचा मेकओव्हर अजूनही केला गेलेला नाही ह्याचं वैषम्यही वाटलं.यंदा होऊ घातलेल्या २०२३च्या G20च्या शिखर परिषदेच्या निमित्त्याने लवकरच मुंबईलासुद्धा तिच्या आर्थिक राजधानीच्या दर्जाला शोभेलसा नवीन साज ल्यायला मिळेल अशी आशा.
माधुरी गोडबोले माईणकर
२६ मार्च २०२३
Leave a Reply