जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९८
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५४
प्रदक्षिणा आणि साष्टांग नमस्कार करायला कोणत्याही बाह्य साधनांची गरज नाही. फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे. एकदा मन तयार झाले की, शरीराला हवे तसे वळवता येते.
नवविधा भक्तीमधे सहावी भक्ती वंदन भक्ती सांगितलेली आहे. कोणाला कसा नमस्कार करावा, तर “अधिकारे करावा”. असा शब्द समर्थ वापरतात. ज्याचा जैसा अधिकार…..
साष्टांग नमस्कारास अधिकारू ।
नाना प्रतिमा देव गुरु ।
अन्यत्र नमनाचा विचारु,
अधिकारे करावा ।।
वेद जाणणारे, शास्त्र जाणणारे, सर्व विद्या जाणणारे, पंडित, पुराणिक, विद्वान, याज्ञिक, वैदिक, आणि पवित्र माणसांना नमस्कार जरूर करावा, असे समर्थ म्हणतात.
पूर्वीची माणसे एकमेकांना भेटली की, राम राम म्हणत किंवा नमस्कार म्हणत. हा आई वडिलांनी केलेला संस्कार होता. एकाने “राम राम” म्हटले की साहाजिकच समोरील माणूस देखील राम रामच म्हणतो. सुरवात आपणापासून करावी, असे प्रत्येकाने करावे, की झाले. आज भेटीची सुरवातच “हाय” ने होते. मग पुढे जाऊन हाय हाय होणारच ना !
साष्टांग नमस्काराने शरीराला व्यायाम तर होतोच, पण नुसत्या “नमस्कार ” म्हणण्याने, मनाला देखील व्यायाम होतो.
नमस्काराने लीनता येते, अहंकार कमी झाल्याने विकल्प कमी होतो. अनेक माणसांशी आपण सहज जोडले जातो.
दुसऱ्याला नमस्कार करण्याने आपले अवगुण कमी होतात. मोठी चूक घडली तरी नमस्काराने क्षमा होऊ शकते. मी शरण आलो आहे, हे समोरच्याला सांगण्यासाठी फक्त एक नमस्कार पुरतो. यथायोग्य व्यक्ती समोर मान झुकवायला लाज कशाला बाळगायची ? ज्याच्या समोर मान झुकवली, त्यालाच त्या मानेच्या रक्षणाची जबाबदारी येते. म्हणून नमस्कारामधे मोठे सामर्थ्य दडलेले आहे.
देवाला आणि थोरामोठ्यांना नमस्कार करण्याने नुकसान तर काहीच होत नाही. नमस्काराने संत आणि भगवंत दोन्ही आपले होतात. समर्थांनी दासबोधामध्ये हे नमस्कार माहात्म्य इतक्या अचूक शब्दात बद्ध केले आहे. ते मूळ दासबोधातूनच वाचावे.
आपले पंतप्रधान मोदीजी जेव्हा संसदभवनात प्रथम आले, तेव्हा सर्व राजनैतिक शिष्टाचार बाजूला ठेऊन, संसदेच्या पायऱ्यांवर डोके ठेवून केलेला साष्टांग नमस्कार साऱ्या जगाने पाहिलाय. नमस्कार हा संस्कार आहे. आपल्याहून वयाने, मानाने, ज्ञानाने, अनुभवाने मोठी मंडळी जेव्हा दुसऱ्याना नमस्कार करतात हे जेव्हा छोटी मंडळी पाहातील, तेव्हा त्यांना, आपणदेखील नमस्कार करायचा असतो, ही जाणीव होऊ लागते. यालाच संस्कार म्हणतात.
नमस्काराचा हा संस्कार आपण मुलांवर नकळत करायचा असतो. आपले अनुकरण मुले करीत असतात, समजा, दूरध्वनीवर बोलताना सुरवातच “हॅलो” या शब्दाऐवजी,” नमस्कार ” या शब्दाने करायची ठरवली तर ? सहज शक्य आहे. प्रयत्न करून पहा. मुले पण बदलतात.
कोणाही एका व्यक्तीला केलेला नमस्कार, हा त्या शरीराला नसून, त्या शरिराचा जो स्वामी, जो आत्मा आहे, त्याला असतो. म्हणून तर एखाद्या लहान मुलाला जरी पाय लागला तर आपण मोठी मंडळी देखील त्या छोट्याला परत नमस्कार करतो. आणि आत्म्याला वय नसते. म्हणून हा आत्मनमस्कार कधीही व्यर्थ जात नाही.
प्रदक्षिणा घालताना आपण आपल्या स्वतःतील आत्मारामाला नमस्कार करीत असतो. कारण “तो” आहे, तोपर्यंत जिवंतपणा ! तोपर्यंतच नमस्कार करून घ्यावा, म्हणजे ‘त्याला’ नमस्कार केलेला कळेल तरी ! नाहीतर एकदा का “तो” हे शरीररूपी घर सोडून गेला की, उरलेल्या शरीराला ‘नमस्कार’ करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
18.07.2017
आजची आरोग्यटीप
Leave a Reply