नवीन लेखन...

‘नमकीन’- एक हरवलेली अभिजात कविता !

ग्रामीण संस्कृतीवर भाष्य करणारा हा चित्रपट – काहिसा दुर्लक्षित ! यात राजकारण नाही ,अतिरेकी नाहीत फक्त एक छोटासा जीव असलेले कथाबीज आहे. अशा विषयावर इतकी सुंदर चित्रकृती निर्माण करणे फक्त गुलजारसारख्या प्रतिभावंताला जमू शकते. कलावंतांनी आपल्या अभिजात अभिनयाने हा चित्रपट सजीव केलेला आहे.काहीसा अप्रसिद्ध तरीही पारितोषिकांच्या भाषेत आपली इयत्ता सिद्ध केलेला ! प्रेक्षकाश्रय मात्र तितकासा नाही. यशापयशाच्या तराजूत डावा, पण समृद्ध करणारा ! अगदी दहापैकी सात किंवा आठ गुण सहज प्राप्त होतील असा मनाचा कोपरा अडवून ठेवलेला नमकीन !
गुलजारची आवडती बिछडना -मिलना थिअरी ! बऱ्याचदा तो पात्रांना सहज अथवा सक्तीने वियोगाची चव चाखायला लावतो. “आँधी “, “मौसम ” ,अगदी थोडया वेळाकरीता का होईना (प्लॅटफॉर्मवरच्या वेटिंग रूम मध्ये ) पण “इज़ाजत ” मधेही तो हा खेळ खेळतो. वियोगानंतरची पुनर्भेट त्या पात्रांना तपासणारी असते. शारीरिक अंतर अपरिहार्यपणे पडले असले तरीही मानसिक दृष्ट्या ती कधीच विलगलेली नसतात. काळाचा एक तात्कालिक तुकडा फक्त त्यांच्यात अंतराय निर्माण करतो. पण त्या छोट्याशा कालावधीत खूप काही सोसून /भोगून ही पात्रे शहाणी ,प्रगल्भ ,शांत ,सहनशील झालेली आढळतात. काहीतरी जरूर हरवलेले /हातून निसटलेले (विशेषतः वय )असते. पण त्यांच्यातील हे बदल नकळत आपल्यालाही संयत करून जातात. आणि काळाचे हे तुकडे जोडण्याची “फ्लॅशबॅक ” नावाची किमया गुलजार इतकी कोणालाही जमलेली नाही. हे त्याचे हातखंडा तंत्र आहे.
विरह हा गुलजारचा आवडता “शिक्षक ” आहे.
नमकीन मधील गेरुलाल (संजीव कुमार) हा पेशाने ट्रक ड्रायव्हर अपघाताने एका स्त्री -कुटुंबात भाडेकरू म्हणून काही कालावधीसाठी दाखल होतो. तेथून भावभावनांची घुसळण सुरु होते. वहिदा रेहमान (पूर्वाश्रमीची नौटंकीतील कलावंत ) आपल्या तीन तरुण मुलींचे जिवाचा कोट करून जगापासून (आणि विशेषतः किशनलाल या त्यांच्या सारंगी वादक दारूडया बापापासून ) रक्षण करीत असते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने भाडेकरु हे त्या कुटुंबासाठी एक अर्थार्जनाचे साधन असते. गेरुलालचे सांधे या मंडळींशी जुळायला साहजिकच वेळ लागतो. त्याची बेदरकार वृत्ती ,स्त्री नामक मार्दवाशी परिचित नसणे हे सुरुवातीला सगळ्यांनाच अवघड जाते. वयोमानानुसार विस्मरण होणारी वहिदा त्यात नवनवे खोडे घालत असते. करिअरच्या या टप्प्यावर वहिदा सारखी कसलेली अभिनेत्री या भूमिकेचे अक्षरशः सोने करून जाते.
शर्मिला मोठी मुलगी ,साहजिकच कुटुंबाचा शब्दशः भार तिच्या खांद्यावर असतो. त्या बलिदानात ती इतकी बुडालेली असते कि गेरुलालला स्वतः ऐवजी छोटया बहिणीचे (शबाना आझमी ) स्थळ सुचविते. शबानाचे पात्र कवयित्रीचे पण मुके ! कवीला मूक दाखविण्याचा हा गुलजारचा मास्टर स्ट्रोक स्तंभित करून जातो. शबाना बोलू शकत नाही हे गेरुलाल इतकेच आपल्यालाही खूप उशिरा कळते. धाकटी (किरण वैराळे ) मात्र तेजतर्रार, बंडखोर ! आई -बहिणींसारखे बेचव आणि सतत स्वार्थत्यागी जीवन तिला पसंत नसते. ती गावाला पुरून उरते.
हळूहळू गेरुलाल त्या कुटुंबातील कर्ता पुरुष बनतो. रासवट स्वभाव थोडा मऊ करतो. सगळ्यांचा विश्वास संपादन करतो. पुढे ही कथा सरळसोट मार्गाने जाणार या विचाराने आपण थोडे सैलावतो तोच वर वर्णन केलेली बिछडना -मिलना थिअरी गुलजार वापरतो. कामाच्या स्वरूपामुळे त्याला ते गाव सोडावे लागते. नुकत्याच स्थिरावलेल्या त्या चौघींसाठी हा परीक्षेचा क्षण ठरतो.
गेरुलाल जातो आणि काही वर्षांनी परततो. त्यासाठी काही खास कारणमीमांसा नाही. बस्स जातो आणि येतो. एका तमाशात त्याला किरण वैराळे दिसते आणि तो दचकतो. दारुडा बाप वहिदाच्या कोटकिल्ल्याला खिंडार पाडण्यात यशस्वी होतो. किरणने स्वभावानुसार स्वतःची जगण्याची शैली आणि त्याचा खुलासा तयार ठेवलेला असतो. आपल्या पश्चात त्या कुटुंबाची काय वाताहत झाली असेल याचे लख्ख चित्र गेरुलाल च्या नजरेसमोर उभे ठाकते. किरणच्या निवडलेल्या वाटेच्या धसक्याने वहिदा मृत्यू पावते. मानसिक तोल ढासळलेल्या कवी प्रवृत्तीच्या शबानाने आत्महत्येचा मार्ग निवडलेला असतो. आणि त्या खंडहर रुपी घरात वयाने अकाली प्रौढ झालेली शर्मिला एकटीच दिवस कंठत असते. ” खूप दिवसात माझे नावही कोणी विचारले नाही सबब मी ते आता विसरून गेले आहे ” अशा अर्थाचे वाक्य शर्मिला बोलते तेव्हा तिच्या एकाकी पणाची धग आपल्यातही खोलवर पोहोचते.
हे सारे का घडले, त्याचा नियती या एका शब्दखेरीज काही खुलासा /कार्यकारण भाव हाती लागत नाही पण मोडक्या घरातील व्यक्तींनाही काळ आपल्या कराल हातानी तुमच्या -आमच्या नजरेसमोर कसे उध्वस्त करतो याचे विषण्ण करणारे चित्र गुलजार रंगवतो आणि गेरुलाल प्रमाणे आपणही निःशब्द होतो. अभिजात कलाकृतीत हे सामर्थ्य असते. गेरुलाल परिस्थिती सावरतो ,चूक दुरुस्त करतो आणि शर्मिलाला घेऊन सहजीवनाच्या वाटेला लागतो. आपल्याला हायसे वाटते. अन्यथा शर्मिलाचे काय झाले असते ?
शर्मिला ALL TIME GREAT असली तरी “नमकीन” मध्ये मनात रेंगाळते ती शबाना ! वेगळ्या वाटेवरची ही भूमिका , ती अभिनेत्री म्हणून किती श्रेष्ठ आहे याचा रुपेरी पुरावा आहे. कथावस्तू इतकी सक्षम आणि अभिनय इतका तगडा की इतर कुठेही लक्ष जात नाही.
“निमकीं “, “मिट्टू ” आणि “चिंकी ” या नमकीन नावाच्या तीन मुली आपल्याला कायमच्या वेढून राहतात त्यांच्या भागधेयासह !
(माझ्या “गुलज़ार समजून घेताना ” या पुस्तकातील हा लेख आहे)
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..