इंग्रजीमध्ये एक एक विद्यार्थी विचारतो, आपल्याकडे गोष्ट आहे. धर्मोपदेशकाला पूर्वीच्या काळी अशी माणसे असायची ज्यांना देवाचा चेहरा दिसायचा. सध्याच्या काळी असे का होत नाही? तो उपदेशक म्हणतो, कारण अलीकडे कोणी खाली वाकत नाही, लवत नाही, वाकून पाहात नाही! वाकणे-लवणे हे शब्द नम्रतेसाठी वापरले आहेत. आपल्याकडे असलेल्या कोणत्याही ज्ञान-रुपादी गुणांचा एवढा ताठा वाटायला लागतो, की ‘माझ्यासारखा मीच’ ही जाणीव जन्माला येते. आता कुणाकडून काही शिकण्यासारखे राहिलेले नाही त्याची खात्री पटते. इतरांना विचारात पाडणारे निरुत्तर करणारे किती प्रश्न आपण तयार करू शकतो याचा अभिमान येणारा बौद्धिक अहंकार आपल्याच ज्ञानाची वाट बंद करतोय हे लक्षात येत नाही. बह मितो जागरणा आड न ये नारायणा असे संत म्हणतात ते ह्याचसाठी आत्मविकासाच्या आड येणाऱ्या बौद्धिक धनाला शहाणपणा कसे म्हणायचे?
नम्न होण्याची सवय तुटत जाते…मग सृष्टीपुढेही नम्र न होता तिला वेसण घालण्याच्या योजनाच पुढे लोटायच्या…वर असे म्हणायचे की नम्र होणे, लीनता म्हणजे abject surrender आणि असे शरण जाणे म्हणजे स्व-अभिमानाशी प्रतारणा ! अशा submissive, मिळमिळीत जगण्याला अर्थच काय? उत्क्रांतीच्या प्रवाहात अहंकार या भावनेचा जन्म अधिक आदिम आहे. दररोज जीवशास्त्रीय आव्हानांना सामोरे जाताना भीतीवर मात करणाऱ्या दुसऱ्या भावनेची गरज होती. त्यासाठी आदिमानवापुढे असणाऱ्या पळा या पर्यायाचे रुपांतर ‘लढा’ या पर्यायामध्ये करण्यासाठी अहंकाराचा पूल उपयोगी पडू लागला. संस्कृतीच्या पाऊलखुणांसह समाजजीवन जन्माला आले. शेतीपासून अनेकउत्पादनप्रक्रियांमध्ये Team work ची गरज भासू लागली. उदात्त, उन्मत्त अहंकाराला जनसेवेकडे वळवताना त्यातील स्वार्थ उदात्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली. तसेच सत्ता आणि अहंकाराच्या ‘कॉम्बो ला वेसण घालण्यासाठी पर्यायी सत्तास्थाने तयार झाली. राजसत्ता-धर्मसत्ता या दोन अहंकाराचे कधी कधी तुंबळ युद्धही झाले…माणसाला अहंकार काबूत ठेवण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे ठरले. त्यासाठी तत्वज्ञानातला फलत्याग आला. इंद्रापासून जरासंधापर्यंत गर्वहरणाचे प्रसंग ठळकपणे मांडले गेले. तरीही हा गेले. तरीही हा egoचा फणा सदा फुत्कारलेलाच…म्हणूनच बौद्धिक स्वातंत्र्य आणि विनाशर्त स्वीकार यांचे रसायन कसे असावे हे सांगण्यास्तव भगवद्गीतेला १८व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत यावे लागले.
– डॉ. आनंद नाडकर्णी
Leave a Reply