आज आठ बाराच्या लोकलला नाना भेटले होते . गाडीला तुफान गर्दी गाडीच्या खिडक्यांवर , दरवाज्यावर माणसे लोंबकळत होती. रेल्वेचे सर्व नियम धाब्यावर ठेवूनच हे प्रवासी या खिडक्यांवर लोंबकळत होते. या सर्व गर्दी मध्ये सुद्धा “नाना” ट्रेनमध्ये चढले. मला त्यांचे फारच कौतुक वाटले, वाटले मी जर या राज्याचा क्रीडामंत्री असतो तर , नानांना नक्कीच श्री शिव – छत्रपती पुरस्काराने सन्मानित केले असते . तरी असो, आज नाना खुपच गडबडीत दिसले . रोज संध्याकाळी सहा वाजता घर सोडणारे नाना आज इतक्या सकाळीच भेटलेले पाहून मला जरा आश्चर्य वाटले , पण नानांना विचारले असता ‘जरा काम आहे रे’ इतकेच बोलून नाना बांद्रा स्टेशनला उतरले
नानाचा व माझा गेल्या दहा वर्षा पासुनचा परिचय , माझा मित्र सुनील याचे वडील असाच . सौभाग्यवतींचे आठ वर्षापूर्वीच निधन झाले होते.
त्याने नाना काहीसे विक्षिप्त व एकाकी झाले होते. तरुण मुले व मुलगी यांच्याशी नानाचे काही खास अस जमत नव्हते.त्याचं स्वभाव हा खूपच मानी स्वरूपाचा होता व अजूनही आहे.एकदा जर एखादी गोष्ट ठरवली तर नाना ती तडीपारच नेत. पण त्यातून बहुतेक वेळा वाईटच परिणाम उद्भवत.पण तरी देखील नाना भक्कमच …..
नाना घड्याळे दुरुस्तीचा व्यवसाय करीत . घड्याळ कोणतेही असो ते, स्वस्त दारात दुरुस्त करण्याबाबत नानाचा खास लौकिक होता. त्यांचे घड्याळाचे दुकान वगैरे नव्हते.पण घड्याळे घरी आणुन ते दुरुस्त करीत व एकदा दुरुस्त केलेल्या घड्याळाची ते ग्यारंटीच देत . त्यांच्या अशा काही गुणांमुळेच त्यांचा एक विशिष्ट गिरह्याईक वर्ग निर्माण झाला होता.व तोआजतागायत टिकुन आहे.
जाड भिंगाचा चष्मा, विस्कटलेले केस , कमरेला लुंगी ,तोंडात पानाची गाठ , अशा एकाच रुपात मी अनेक वर्षे पाहत आलो आहे. त्यांना पोषाखाचे वगैरे विशेष नव्हते. पण खाण्या – पिण्याच्या बाबतीत नाना कधीच हायगय करीत नसत. मांसे, अंडी, मटण हे त्यांचे खास पदार्थ . जर आठवड्यात यापैकी
काही वर्ज्य झाले तर त्यांची तब्बेत लगेचच नाजूक होत असे.नानाचा स्वभाव खुपच विचित्र व विक्षिप्त होता.ते लगेच कुणावरही भडकत, व ज्यावर हा अग्नी कोसळला, तो त्यांच्या सावलीला उभ्या जन्मात
तरी उभा रहात नसे . अशा त्यांच्या वागण्यामुळे अनेक माणसे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातुन निघुन गेलेल्या ……….
“सुनील भडव्या तुला किती वेळा सांगितले, की वाण्याकडे जा व तांदुळ घेऊन ये, आता जातोस कि घालु कंबरड्यात लाथ?”
नानाच्या या गर्जनेने तो सुसाट धावत सुटलेला, सुनील मला आजही आठवतो . तो घामाने डबडबलेला चेहरा, कावरे बावरे डोळे हे त्याच्या मनाच्या नानाविषयी वाटणाऱ्या भीतीचे एक निखळ उदाहरण होते. नाना असे फक्त सुनील बरोबरच वागत नसत तर त्याच्या चारही अपत्यांशी असेच वागत.
एक बाप म्हणून वाटणारी भीती व तिरस्कार हा या चौघांच्या मनात ठासुन भरलेला.
नाना असे का वागायचे? ते हि आपल्या पोटच्या मुलांशी, मुल अठरा वर्षाचे झाले की त्याने घरात आपल्या खानावळीचे पैसे द्यायचे हा नानाचा एक विशिष्ठ व जगावेगळा नियम होता. आज कोणत्याही मुलांने नीट कसेबसे शिकून सावरून स्वतःच्या पायावर उभे राहण्या पर्यंत वयाची चोवीस-पंचवीस वर्षे निघुन गेलेली असतात . परंतु नानाच्या या नियमाने त्यांच्या चारही कर्तबगार , सदगुणी व मेहनती मुलांमध्ये व त्यांच्या मध्ये जी भावनिक दरी निर्माण झाली ती आजतागायत टिकून आहे. काहीसा चमत्कारिक वाटणारा हा नियम परंतु नानांना मात्र स्वतःच्या चाणाक्ष ,व्यवहारी दृष्टीचे सदैव कौतुक होते.आठवड्याच्या एका ठराविक तारखेला ठराविक इतकीच रक्कम मिळालीच पाहिजे यावर त्यांची खूप शिकस्त असे.
सुनीलच्या आईने जिवंत असताना अत्यंत मायेने वाढविलेली मुले मात्र आईच्या मृत्यूनंतर आज स्वतःच्या वडिलांकडून लाथाडली गेली, उपेक्षिली गेली याचा परिणाम म्हणजे चारही मुले नानांना एकदम सोडून दुसऱ्या ठिकाणी राहावयास गेली त्यामुळे नाना जास्तच खवळले ,
“साल्या,भडव्यांना आयतच खायला पाहिजे . आता बघतोच मी , कसे घरात पाऊल टाकतात ती . जर लाज असेल तर माझ्या प्रेतालाही शिवायला नका येऊ”.
नानाची भूमिका मात्र मला घृणास्पद वाटली . म्हणतात ना, ‘ चोराच्या उलट्या बोंबा ‘ तशातलाच प्रकार हा होता. स्वतःच्या मुलीच्या लग्नात एका कवडीचीही मदत न करणारा हा बाप , लग्नाला हजार राहिला म्हणून पोरीवर त्याचे उपकार सांगत होता. परिणामी ही कटुता खोल खोल या चौघांच्या मनात रुजली. ज्ञानेश्वराना आपले आई – वडील लहानपणी गेल्यामुळे, ते व त्यांची भावंडे पोरकी झाली होती परंतु संस्कारांचा एक स्वच्छ या चारही भावंडानी फुलवला होता . आजही या संस्कारांचा पगडा आपल्या जनमानसावर आहे. पण ही चार भावंडे मात्र, बाप असुनही पोरकेच होते.दिवसा मागून दिवस गेले. अन एक दिवस नाना चक्क आजोबा झाले.मुलीला वाटले, निदान माझ्या नशिबात बापाचे सुख नाही ,पण माझ्या मुलाच्या नशिबात आजोबांचे सुख हवे म्हणून ती आपल्या सहा महिन्याच्या गोड बाळाला घेऊन वडिलांकडे गेली पण या करंट्या बापाने दारातुनच या मुलीला हकलुन दिले, व पुन्हा दारात पाय ठेवू नकोस असे फर्मावले.
नानाचे त्यांच्या मित्राबरोबर ,शेजारी, नातेवाईक यांच्या बरोबर चांगलेच पटत असे . या सर्व हितचिंतकांनी आपापल्या परीने नानांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला . पण सर्वांनाच अपयश आले.
एके दिवशी ऐन रंगात(गप्पांच्या)आलेल्या नानांना मी,सहज विचारले नाना तुमचा ज्योतिषावर विश्वास आहे का? नाना पुन्हा गंभीर झाले म्हणाले तुम्हां पोरांना सारच खेळच वाटतो , अरे बघ , मला एका ज्योतीषानेच सांगितले होता, तुम्हाला म्हातारपणी कुणीच बघणार नाही आणि बघ रे या म्हाताऱ्याला आता कोण बघतो रे”……….
नानाच्या या उत्तराने मात्र , तोंडात मारल्यासारखाच मी गप्प झालो.
लेखक : संतोष दत्तु पाटील.
Leave a Reply