१९८५ साली सदाशिव पेठेत, पेरुगेट चौकात ‘गोपी’ नावाचं नाॅनव्हेजचं हाॅटेल नुकतंच सुरु झालं होतं. तिथं एक खुरटी दाढी वाढवलेला काटकुळा तरुण, आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारताना अधूनमधून दिसायचा. त्यानंतर वर्षभराने ‘अंकुश’ चित्रपट प्रदर्शित होऊन व प्रचंड गाजल्यावर, त्या ‘गोपी’ हाॅटेलातच, काऊंटरच्या मागे तो मालकासोबत फोटोफ्रेममध्ये जाऊन बसला… तो तरुण म्हणजेच.. नाना पाटेकर!!
१९५१ साली मुरुड जंजिरा येथे १ जानेवारी रोजी जन्मलेल्या या नानाचं बालपण अतिशय साधारण परिस्थितीत गेलं. माध्यमिक शाळेत असताना, वडिलांकडून चित्रकलेचा वारसा मिळाल्याने, त्या कलेची त्याला रुची निर्माण झाली. सोबत त्याच विषयाची आवड असणारा ‘समर्थ आर्ट्स’च्या गुरुजींचा सुपुत्र, सुबोध हा त्याचा जिवलग मित्र होता..
माध्यमिक शिक्षणानंतर त्यानं जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. तिथं कमर्शियल आर्ट्सचा डिप्लोमा प्राप्त केला. त्याच दरम्यान नाट्यकलेविषयी आकर्षण वाटू लागल्याने, तो विविध नाट्य स्पर्धेत भाग घेऊ लागला. विजया मेहतांच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या व्यावसायिक नाटकात त्याने सत्तारची भूमिका साकारली तर ‘पुरुष’ या नाटकात, गुलाबराव साकारला.. ‘पुरुष’ नाटक सादर करताना काही अतिउत्साही प्रेक्षक नानाचेच संवाद ऐकण्यासाठी इतर कलाकारांच्या सादरीकरणाचे वेळी थिएटरमध्ये गोंधळ घालायचे, अशावेळी तो व्यथित होत असे..
काही मराठी चित्रपटात छोट्या भूमिकेतही नाना चमकला. ‘सिंहासन’ मधील त्याची छोटी भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्यानंतर त्यानं, ‘भालू’ चित्रपटातील खलनायकी भूमिका साकारली.
१९८२ साली ‘राघू मैना’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या पेपरमधील जाहिराती आम्ही केलेल्या होत्या. साहजिकच ‘प्रिमिअर शो’ ला आम्ही दोघेही बंधू गेलो होतो.. रात्री प्रेससाठी पार्टी ठेवली होती. राजदत्त, अरविंद सामंत, गजानन सरपोतदार अशी अनेक मंडळी उपस्थित होती. मी गजाकाकांना नानाची ओळख करुन देण्याची विनंती केली.
गजाकाकांनी परिचय करुन दिल्यावर, नानाने मला मिठीच मारली.. एका सच्चा कलाकाराने, उमेदवारी करणाऱ्या कलाकाराचे मनापासून कौतुक केले…
१९८६ साली एन. चंद्रा या मराठी दिग्दर्शकाचा ‘अंकुश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तुफान गाजला व नानाला एकापाठोपाठ चित्रपट मिळू लागले. एन. चंद्रा यांच्याच ‘प्रतिघात’ मध्येही त्यानं काम केलं.
‘परिंदा’ चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सई परांजपे यांच्या ‘दिशा’ चित्रपटातील, पोटापाण्यासाठी खेड्यातून शहरात येऊन हताश झालेल्या कामगाराची त्याची भूमिका, अविस्मरणीय अशीच आहे.
‘तिरंगा’ चित्रपटात त्याची संवादफेकीची जुगलबंदी ‘डायलाॅग किंग’ राजकुमारशी झाली.. ‘राजू बन गया जंटलमन’ चित्रपटात, चाळीतील अनेक नमुन्यांतील लक्षात राहणारा ‘अवलिया’, नानाने अफलातून साकारला होता..
‘प्रहार’ हा चित्रपट नानाने स्वतः लिहिला व दिग्दर्शित केला. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी’, ‘गुलाम ए मुस्तफा’, ‘हम दोनो’, ‘यशवंत’, ‘शक्ती’ अशा अनेक चित्रपटांतून त्याने वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या मात्र तो लक्षात राहिला.. तो ‘क्रांतिवीर’ म्हणूनच!
या चित्रपटाने त्याला राष्ट्रीय, फिल्मफेअर व स्टार स्क्रिनचा पुरस्कार मिळवून दिला. आजही कुणीही त्याच्या आवाजाची नक्कल करताना, ‘क्रांतिवीर’ मधील संवादच प्राधान्याने सादर करतात..
आम्हा बंधूंना ‘पैंजण’ चित्रपटाची सर्वोत्कृष्ट जाहिरात केल्याबद्दल राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त रोटरी क्लब तर्फे आमचा टिळक स्मारक मंदिरात, नाना पाटेकरच्या हस्ते सत्कार झाला..
‘तू तिथं मी’ चित्रपटाची सर्वोत्कृष्ट जाहिरात केल्याबद्दल आम्हाला दुसऱ्यांदा राज्य पुरस्कार, माधुरी दीक्षितच्या हस्ते मिळाला. त्यावेळी नाना पाटेकर यांची सन्माननीय उपस्थिती होती.
हिंदीत कितीही नाव मिळविले असलं तरी नानानं मराठीला, आपुलकीनं जपलेलं आहे.. ‘सूत्रधार’, ‘नागीण’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘पक पक पाक’, ‘देऊळ’, ‘डाॅ. प्रकाश बाबा आमटे’, इ. चित्रपटांतून तो मराठी प्रेक्षकांना भावलेला आहे..
‘नटसम्राट’ चित्रपटातील त्यानं साकारलेला, ‘अप्पा बेलवलकर’ अप्रतिम आहे!!
नाना, नाटकासाठी विजया मेहतांना व चित्रपटासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, यांना गुरुस्थानी मानतो..
नानांच्या सिनेसृष्टीतील या योगदानाबद्दल भारत सरकारने त्याला २०१३ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे.
२०१५ पासून नाना व मकरंद अनासपुरे या दोघांनी ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना करुन महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे सामाजिक कार्य सुरु केले आहे.
नाना पाटेकर यांचे मित्र, श्रीकांत गद्रे यांनी नानाच्या तीस पस्तीस सवंगड्यांचे लेख संकलित करुन, ‘तुमचा आमचा नाना’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
‘नाना’ हे नाव जरी नकारात्मक असलं तरी ‘सकारात्मक’ विचार करणाऱ्या नानावर, आम्ही ‘नाऽनाऽ करते’… भरभरुन प्रेम करत आलो आहोत…
अशा या मराठी मातीतल्या कलाकाराला, या वर्षीचा ‘गदिमा पुरस्कार’ आज मिळालेला आहे.. महाराष्ट्राचे ‘वाल्मिकी’ ग. दि. माडगूळकर म्हणजे साक्षात सरस्वती पुत्र!! त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं म्हणजे ‘हिऱ्या’ला कोंदण लाभणं!!
आॅस्करपेक्षाही, सर्वश्रेष्ठ असणारा हा ‘मराठी पुरस्कार’ स्विकारणाऱ्या नानाचा आम्हा सर्वांना, सार्थ अभिमान वाटतो!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१४-१२-२१.
Leave a Reply