रत्नागिरीतील ज्येष्ठ उद्योजक व योजक उद्योग समूहाचे संस्थापक नानासाहेब भिडे यांचा जन्म ३ जून १९३१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सोमेश्वर गावातील वेसुर्लेवाडी येथे झाला.
कोकणातील जंगलात सापडणारी करवंदे, जांभळ, फणस, आंबा, आवळा याची नैसर्गिक चव जगासमोर आणण्याचे श्रेय रत्नागिरीतील नाना भिडेंच्या ‘योजक’ला जाते.
नानासाहेब भिडे यांचे खरे नाव कृष्णा परशुराम भिडे. जवळची त्यांना नानासाहेब भिडे या नावेच ओळखत असत.‘कोकणी मेवा‘ खऱ्या अर्थाने म्हणता येईल अशी विविध खाद्य उत्पादने मुंबई – कोकणातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या अन्य प्रमुख शहरांमध्येही लोकप्रिय करण्याची किमया करणारे नाना भिडे हे कोकणातील एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आजोबांचे पुण्यात हॉटेल होते ते त्यांनी रत्नागिरीत आणले. नानांनी शिकून मोठं व्हावं, भिडे घराण्याचे नाव उज्वल करावं ही त्यांच्या आईची भागीरथीबाईंची इच्छा. लहान वय असतांनाच वडील निर्वतले. त्यामुळे घराची जबाबदारी त्यांच्यावरच आली. ते सर्व सांभाळून नाना १९४९ साली मॅट्रीक झाले. पुढे कॉलेजला न जाता वडिलोपार्जित हॉटेलचा व्यवसाय त्यांनी पत्करला. त्याबरोबर आंबा विक्रीसाठी व्यवसाय सुरु केला. त्यातून चांगले पैसे मिळू लागले. आत्मविश्वास, धाडसी वृत्ती आणि कष्ट करण्याची तयारी, तरुण वय कल्पकता या सगळ्या गुणांनी अनुभव संपन्न बनलेल्या नानांनी कोकणातील विविध फळांपासून सरबते आणि खाद्यपदार्थ बनविण्याचा उद्योग सुरु करण्याचे ठरविले. पावसचे स्वरुपानंद हे नानांचे आध्यात्मिक गुरु. त्यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा. त्यांच्याच आशीर्वादाने आपण जीवनात यशस्वी झालो. ही विनम्र भावना त्यामुळे नानांनी ज्या व्यवसायाला हात घातला त्याचे सोने झाले. त्यांनी काय काय केले नाही? कलम नर्सरी, शेंगदाण्यापासून तेल काढणे, लाकडाचा व्यापार, आनंद इलेक्ट्रानिक्स हा चोक्स् तयार करण्याचा उद्योग, ग्लास प्रॉडक्टस, शिवाय हॉटेल होतेच. यातून व्यापार-उद्योगातले विविध अनुभव मिळाले, माणसे अनुभवली, यातून त्यांनी साकारली फळप्रक्रिया उत्पादनांची संकल्पना. कोकम सरबत हे ‘योजक‘ नावाने त्यांनी बाजारात आणले. उत्कृष्ट व दर्जेदार पेय म्हणून ते लोकप्रिय केले. योजकचे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. योजक असोसिएटस् या ब्रँडने त्यांनी आवळा, कोकम, करवंद, आंबा, जांभूळ या फळांपासून अनेक उत्पादने सुरु केली. पुढे पावस जवळ ‘संजीवनी हेल्थ फूड‘ हा कारखाना सुरु केला. या उत्पादनांमुळे विविध फळे पिकविणाऱ्या गरीब शेतकरी बागायतदारांच्या फळांना निश्चितपण चांगला दर मिळू लागला. ही उत्पादने मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील अन्य प्रमुख शहरात योजक असोसिएटच्या बॅनरखाली विकली जाऊ लागली. या कोकणी उत्पादनास फळांची मूळची चव टिकून राहील याची काळजी त्यांनी घेतली. याबरोबरच भिडे सेवा नावाने व्यवसाय सुरु करुन लोकांना लग्न, मेळावे, अन्य समारंभासाठी लागणारे निवासासाठी साहित्य, ५ हजार लोकांना जेवण्या-खाण्यासाठी लागणारा भांड्यांचा संच, समारंभासाठी लागणाऱ्या खुर्च्या, टेबले असे सर्व भाड्याने देण्याचा व्यवसाय ‘भिडे सेवा‘ या नावे सुरु केला. काही हजारात वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन सुरु केलेला नानांचा व्यवसाय आज दरमहा लाखो रुपयांच्या उलाढालीवर पोहोचला आहे. कोकमापासून सुरू झालेल्या ‘योजक’च्या व्यवसायात नानांनी आल्याचे पाचक, कुळीथ, नाचणी सत्व यासह अन्य पदार्थाचा समावेश केला होता. काही वर्षापासून दिवाळीचा फराळ पाठविण्यात ते यशस्वी झाले होते. तरीही नानांची राहणी साधी होती. लोकसंग्रह मोठा होता. उपयुक्त अशा सामाजिक कार्याला मदतीचा हात आहे आणि स्वामी स्वरुपानंदांवर तितकीच श्रद्धा आहे. आपल्या नवीन उत्पादनातील पहिला प्रकार ते स्वामींच्या तसबिरी समोर ठेऊन आशीर्वाद घेत असत. शेवटपर्यत नाना तरुणाच्या तडफेने सर्व कामे करीत असत. नानांचे तिन्ही मुलगे आनंद, श्रीकांत आणि किशोर हे योजकच्याच व्यवसायात आहेत. उत्पादन, मार्केटिग यामध्ये ते कार्यरत आहेत. तिन्ही सुनाही नाना आणि वसुधाताईंना आई-वडिलांप्रमाणेच मानतात. एकत्र कुटुंबपद्धतीचा एक आदर्शच नानांच्या घरी पहायला मिळतो.
मुळात कोणतेही फळ हे नाशिवंत. फारकाळ न टिकणारे. उत्पादन खूप झाले तर त्याचे करायचे काय ही सुधा समस्याच. पण त्याच फळांवर प्रक्रिया करुन त्यापासून टिकावू खाद्यपदार्थ बनविता येतात हे भारतीय परंपरेतले शास्त्र. त्याला थोडी नव्या तंत्राची जोड दिली तर तेच टिकावू पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनविता येतात आणि जिथे मूळचे फळ किवा त्यापासून बनविलेले पदार्थ मिळत नाहीत तेथे विकता येतात हे नानांनी कल्पकतेने हेरले आणि कोकम पासून सुरुवात करुन इतर अनेक फळांपासून सिरप, सरबते, जाम याबरोबरच नाचणी, कुळीथ व अन्य अनेक कडधान्यांपासून सत्व अशी इतरही उत्पादने सुरु करुन कोकणात काय करता येईल त्याचा आदर्श घालून दिला आहे. त्यांचे अनुकरण करुन कोकणातील अनेक गावात, अनेक तरुणांनी फळप्रक्रिया उद्योग सुरु केले आहेत.
नाना स्वभावानं मृदू असले तरी व्यवहाराच्या बाबतीत पक्के शिस्तप्रिय होते. वस्तूंची उधळमाधळ करणं, फुकट घालवणं दिसलं की त्यांना रागावर नियंत्रण करता येत नाही. ते स्वतः कधीही गल्ल्यावर मालकाच्या थाटात आजपर्यंत बसले नाहीत. रोजची रोकड किती जमा झाली एवढेच नानांना माहीत असते. घरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी रोजचे कुठूनही मिळालेले पैसे, व्यवहारातील, कौटुंबिक भेटी-पाकीटे सर्व एकत्र राहिले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे. पर्यटक कोकणात मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. त्यांना आकर्षण असते ते इथल्या निसर्ग रमणीयतेचे आणि इथल्या खाद्य संस्कृतीचे. त्यामुळे भविष्यात या फळप्रक्रिया उद्योगांना मोठा वाव आहे. आज विविध प्रकारची यंत्र सामुग्री व अन्य प्रक्रिया पद्धतीने हे काम काहीसे सोपे झाले आहे. पण जेव्हा मनुष्यबळाच्या जोरावर केवळ हातांनी ही कामे केली जात त्याची मुर्हूतमेढ कोकणात नाना भिडे यांनीच रोवली आहे हे सर्वजण मान्य करतील. नाना भिडे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. रत्नागिरीसह योजक उद्योग समूहाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपला व्यवसाय वाढविला आहे या सर्वांमागे नानासाहेब भिडे यांचे कष्ट होते योजक उद्योग समूहाचा भार त्यांचे पुत्र आनंद, श्रीकांत,किशोर आदी जणांनी यशस्वीरित्या सांभाळला आहे. नानासाहेब यांची नात शमिका ही प्रसिद्ध गायिका आहे.
नानासाहेब भिडे यांचे १६ मे २०२० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply