MENU
नवीन लेखन...

नंदराज जटयात्रा – भाग 1

ही एक लोककथा आहे.

तिन्ही लोकांत असुरांचे प्राबल्य वाढले होते. देव, देवता, ऋषीमुनी, लोक असुरांच्या त्रासाने त्रस्त झाले. शिव संहारक आहे. सर्वांनी जाणले की शिव व शक्ती एकरूप झाल्याशिवाय असुरांचे निर्दालन होणार नाही. सर्वजण शंकराला शरण गेले. आपली व्यथा त्यांनी शंकराला सांगितली. शिव व शक्ती एकत्र येण्याची आवश्यकता पण शंकराला पटवून दिली. शंकरालासुद्धा तो विचार पटला.

हिमालयाची पत्नी मेना! हिमालय व मेनेच्या कन्येचे नाव ‘नंदा’! नाजूक फुलांसारखी, प्रेमळ, सर्वांशी गोड व प्रेमाने वागणारी नंदा तर सर्वांची जीव की प्राण होती. पशु-पक्षी, वृक्ष-लता, फुले-पानेसुद्धा नंदावर फार प्रेम करीत! नंदा आता उपवर झाली होती. सर्व देवदेवता, ऋषिमुनींनी जाणले की नंदा हीच शंकराला पत्नी म्हणून योग्य आहे. नंदा हे आदिमाया पार्वतीचेच रूप आहे व जगाच्या कल्याणासाठीच तिने हे रूप धारण केले आहे.

सर्वजण आनंदाने, हर्षाने ते हिमालयाच्या सदनी गेले. सर्वांना पाहून हिमालयपण आनंदला. सर्वांचे त्याने प्रेमाने स्वागत केले. आदरसत्कार केला. देवदेवतांनी, ऋषि-मुनींनी आपण येण्याचे प्रयोजन सांगितले. शिवासारखा जावई मिळणार या कल्पनेने हिमालय आनंदला. मोठ्या आनंदाने त्याने विवाहाला संमती दिली.

लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. मुहूर्त ठरला. देव-देवतांना, ऋषि-मुनींना, जनता-जनार्दनाला आग्रहाची निमंत्रणे गेली. एका शुभमुहूर्तावर शंकराचे सर्व गणासहित कैलासाहून विवाहस्थळी आगमन झाले. सीमेवर देवदेवतांनी, ऋषीमुनींनी शंकराचे स्वागत केले व मोठ्या मानाने त्याला विवाहस्थळी आणले. आपल्या पतीचे चोरून दर्शन घेताना नंदापण मोहरली. ठरवलेल्या शुभमुहूर्तावर कैलासपती शिवशंकर व हिमालयपुत्री नंदा यांचा शुभविवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. देवदेवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. ऋषीमुनींनी उभयतांना शुभाशीर्वाद दिले. सर्वत्र आनंद पसरला. सर्वजण तृप्त झाले.

आता रिवाजाप्रमाणे नंदा आपल्या सासरी जाणार! आणि शेवटी ती वेळ आली. नववधूने आपल्या पतीसमवेत सासरी जाण्यासाठी पाऊल उचलले व सर्वजण व्यथित झाले. नंदाच्या विरहाची कल्पनाच कोणी सहन करू शकत नव्हते. पिता व्यथित झाला, माता अश्रू ढाळू लागली. सर्वजण सैरभैर झाले. फुले कोमेजली, पक्ष्यांचे कुजन थांबले. ही रूपसंपन्न, गोड, प्रेमळ, सर्वांची लाडकी नंदा आता सर्वांना अंतरणार होती. नंदालासुद्धा हा विरह सहन होत नव्हता. ती वेलीवृक्षांना कुरवाळत होती. देवदार वृक्षांना मिठी मारत होती. ज्या हरणांशी, कस्तुरीमृगांशी ती खेळली, त्यांच्याबरोबर बागडली त्यांना आता ती कंवटाळू लागली. ती हरणे, कस्तुरीमृग, पशुपक्षी पण अश्रू ढाळत होते. नंदाला आता हे सर्वच कायमचे अंतरणार होते.

जड अंतःकरणाने नंदाने पाऊल उचलले. पती पाठोपाठ तिची वाटचाल सुरू झाली. क्षणाक्षणाला, प्रत्येक पावलाला तिची नजर पाठीमागे वळत होती. नंदाबरोबर मातापिता, ऋषीमुनी, लोक, पशूपक्षीपण चालू लागले. ‘नंदाशिवाय जीवन’ ही कल्पनाच ते सहन करू शकत नव्हती. शिवगण पुढे जाऊन वाट बनवत होते. दुर्गम वाटा सुकर करत होते. रस्त्यात राज्यातील पहाडी लोक नंदाला येऊन भेटत होते. तिला भेटी देत होते. फुले-फळे देत तिच्या पायावर अश्रू ढाळत होते व खिन्न मनाने तिचा निरोप घेत होते. एका वळणावर नंदाने आपल्या माहेराचे पाणावलेल्या नजरेने दर्शन घेतले. आता माहेरही दृष्टीआड झाले.

सर्वजण नंदाबरोबर चालत होते. कोणीच मागे फिरत नव्हते. नंदावरील सर्वांचे प्रेम शंकर जाणत होते व त्यामुळे त्यांना ‘परत फिरा’ असे सांगण्याचे धाडस शंकरांनापण होत नव्हते. नंदाच्या प्रेमाने हे लोक कुठपर्यंत येणार हेच त्यांना समजत नव्हते.

नंदा दमली होती. तिला तहान लागली. शंकरांना तिने सांगितले, जवळ कुठेच पाणी दिसत नव्हते. शंकरांनी आपल्या त्रिशुळाचा जमिनीवर प्रहार केला. जलधारा वाहू लागल्या. एक सुरेख सरोवर निर्माण झाले. नंदा हसली. पाणी पिण्यासाठी वाकली. पाण्यात आपले प्रतिबिंब पाहू लागली. रूप न्याहाळू लागली.

स्वतःला विसरली व शिवाशेजारी ही दुसरी कोणती स्त्री, असा विचार करू लागली. भोळी नंदा रूसली. शिवाने तिच्या रूसण्याचे कारण ओळखले. तिला समजावले. तिच्या आत्मरूपाची तिला ओळख करून दिली. शंकर सांगू लागले, शिव शक्ती सदैव एकरूप आहेत. आपणास कोणीही अलग करू शकत नाही. माझ्याजवळ ये व माझ्या रूपात एकरूप होऊन जा. नंदा हसली. लाजली. शिवाजवळ गेली व शिवात एकरूप झाली, शिवरूप झाली. सर्वांनी शिवाचा ‘अर्धनारीनटेश्वर’ म्हणून जयजयकार केला. नंदाने रूप पाहिलेल्या शिवनिर्मित सरोवराला ‘रूपकुंड’ म्हणून ओळखू लागले.

रूपकुंडापासून लोक मागे वळतील, असे शंकराला वाटत होते. लोक नंदाच्या प्रेमाने आणखी किती चालणार आहेत? पण त्यांना ‘परत फिरा’ असे सांगणे शंकरांना जमत नव्हते. स्थिती विचित्र झाली होती. या पुढचा मार्ग दुर्गम होता. शेवटी शंकरांनी धाडस केले. समजुतीच्या सुरात ते सर्वांना सांगू लागले, ‘नंदा जशी माझ्यात आहे तशी ती तुमच्यातही आहे. ती आदिशक्ती आहे. सर्वत्र तिचा निवास आहे. जगाच्या कल्याणासाठी तिचा जन्म आहे व आता अवतारकार्य सुरू करण्याची वेळ आली आहे. नंदावरील तुमचे प्रेम मी जाणतो. यापुढे हा सर्व परिसर नंदाच्या नावाने ओळखला जाईल. ही पर्वतशिखरे नंदादेवी, नंदाकोट, नंदाखाट इ. नंदाच्या नावाने ओळखली जातील. ही नदी ‘नंदाकिनी’ म्हणून ओळखली जाईल. या पर्वतशिखरांच्या, नद्यांच्या, झऱ्याच्या दर्शनाने तुम्हाला नंदा भेटल्याचे सुख लाभेल. आता तुम्ही नंदाला आशीर्वाद द्या व परत फिरा.’ लोक अश्रू ढाळत स्तब्ध उभे राहिले. कोणीच परत फिरायला तयार नव्हते.

सर्वजण नंदाबरोबर परत चालू लागले. शंकराची अवस्था फारच अवघड झाली. सर्वजण होमकुंडापाशी आले. जवळच्या एका शिळेवर शंकराने त्रिशुळाच्या साहाय्याने श्रीयंत्र काढले व सर्वांना सांगितले, या यंत्रात नंदाचे कायम वास्तव्य असेल. त्याच्या दर्शनाने तुम्हाला नंदाभेटीचा आनंद लाभेल. आमचे निवासस्थान कैलास सदैव अस्पर्श राहणार आहे. तिथे कोणीही मानव येऊ शकणार नाही. आज भाद्रपद अष्टमी आहे. हा दिवस नंदाष्टमी म्हणून ओळखला जाईल. या परिसरात फिरल्यास तुम्हाला नंदाचे वास्तव्य जाणवेल. म्हणून हा परिसर ‘घुमकी’ म्हणून ओळखला जाईल. आता तुम्ही परत फिरा. त्यात सर्वांचे कल्याण आहे.

लोकांची समजूत पटली. दु:खी मनाने सर्वांनी नंदाला निरोप दिला. शंकरापाठोपाठ नंदा चालू लागली. तिची नजर वारंवार मागे जात होती. दूर जाणाऱ्या नंदाकडे लोक अश्रूपूर्ण नजरेने पाहत होते. नंदा दृष्टिआड झाली. आता परत नंदा कधीच आपल्या मूळ रूपात भेटणार नव्हती. लोकांना शंकराचे शब्द आठवत होते. ‘जेव्हा नंदाला माहेरची आठवण येईल तेव्हा ती माहेरच्या तुम्हा लोकांना भेटायला येईल. माहेरचे सुख व आनंद उपभोगील.’ लोक परत वळले एकटेच! लोक घरोघर नंदाला पुजू लागले. तर नंदाष्टमीला होमकुंडाची खडतर यात्रा करू लागले. नंदाभेटीचे सुख अनुभवू लागले. ७ व्या शतकात गढवालमध्ये भानुप्रताप म्हणून राजा होऊन गेला. तो नंदादेवीचा भक्त होता. दर नंदाष्टमीला तो होमकुंडाला जाऊन श्रीयंत्राची पूजाअर्चा करीत असे. नंदादेवीच्या कृपेने त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. तो म्हणेल ते होत असे. लोक त्याला ‘बदरीनाथ’ म्हणत. लोक होमकुंडाची यात्रा उत्साहाने करीत पण या खडतर यात्रेत भक्तांना खूप त्रास होई. निसर्गकोपाला काही वेळा लोक बळी पण पडत. एके दिवशी नंदादेवीने भानुप्रताप राजाला दृष्टांत दिला व सांगितले की, माझ्या प्रेमाने लोक यात्रेला येतात..पण त्यांना फार त्रास होतो. त्यामुळे मला खूप वाईट वाटते तरी जेव्हा मला माहेरची आठवण येईल, तेव्हा मीच माहेरी येईन पण आता मी शिवरूपी झालेली असल्यामुळे मला माझ्या मूळ रूपात येता येणार नाही. मी चारशिंगी मेंढ्याच्या रूपाने जन्म घेईन. माहेरचे सुख उपभोगीन आणि मग मला होमकुंडापर्यंत येऊन निरोप द्या. यापुढे दरवर्षी होमकुंड यात्रा करण्याची गरज नाही.”

दरवर्षी निघणारी यात्रा बंद झाली. घरी, गावी लोक नंदादेवीची पूजा करू लागले. एके दिवशी भानुप्रताप राजाला बद्रीनाथाने दृष्टान्त दिला व दृष्टान्तात वानप्रस्थ आश्रम स्वीकारून पुढील आयुष्य ईश्वर चिंतनात व्यतित करण्यास सांगितले. बदरीनाथाच्या दृष्टान्ताप्रमाणे भानुप्रताप राजाने वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. आपले राज्य व कन्या त्याने धारमाळवा येथील राजकुमार कनकपाल याला दिले व तो जंगलात निघून गेला. ईश्वराच्या चिंतनात रममाण झाला. पण नंदादेवीवरील त्याचे प्रेम, निष्ठा व भक्ती अढळ होती. जेव्हा नंदादेवीला माहेराची आठवण येई तेव्हा ती चारशिंगी मेंढ्याच्या रूपाने जन्म घेत असे. पण भानुप्रताप राजाला वाटे, दरवर्षी नंदादेवीने माहेरी यावे. आपण तिला आमंत्रित करीत नाही, म्हणून ती दरवर्षी येत नाही. शेवटी एके दिवशी भानुप्रताप राजाने आपल्या धाकट्या भावाच्या, कासुवाच्या स्वप्नात जाऊन सांगितले की, ‘तू दरवर्षी माहेरी येण्याचे नंदादेवीला आमंत्रण देत जा.’ कासुवाच्या नावावरून कसुवा वास्तव्य करीत असलेल्या त्या गावाचे नाव कासुवा पडले व अजूनही कासुवाच्या राजघराण्यातील प्रतिष्ठित व्यक्ती नौटी या गावी दर ललितापंचमीला नंदादेवीच्या मंदिरात येऊन नंदादेवीला माहेरी येण्यासाठी आमंत्रित करतात. नौटी हे नंदाचे माहेर मानले जाते.

आणि खरंच! साधारण दर १५-२० वर्षाच्या काळात गढवाल हिमालयात चार शिंगे असलेला एक मेंढा जन्म घेतो. नंदा समजून त्याचे प्रेमाने लाडाने संगोपन केले जाते व समारंभपूर्वक मेंढारूपी नंदाची सासरी पाठवणी केली जाते. पुरातन काळी या यात्रेला नंदाजाट यात्रा म्हणत. जाट म्हणजे मेंढा! पण भानुप्रताप राजाने गढवाल, कुमाऊँमधील राजांना सुद्धा या यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. सर्व यात्रेचे आयोजन व नियोजन राजघराणे करत असे. म्हणून सर्वजण या यात्रेला नंदराजजट यात्रा म्हणू लागले व यात्रेचे तेच नाव रूढ झाले.

-प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..