ही यात्रा हरिद्वार-बद्रीनाथ रस्त्यावरील कर्णप्रयागजवळील नौटी या गावापासून सुरू होते. ही यात्रा खडतर आहे. पण निसर्गाचे विलोभनीय दृश्य व गढवाल, कुमाऊँमधील रीतीरिवाज, संस्कृती, लोकगीते, लोककथा या यात्रेत अनुभवायला मिळतात. सरकार तसेच स्थानिक लोक या यात्रेला पूर्ण सहकार्य करतात. ही यात्रा अतिशय पुण्यप्रद समजली जाते. स्थानिक लोक मोठ्या संख्येने तसेच परदेशी पर्यटकसुद्धा या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेचे कार्यक्रम व टप्पे कासुवाचे राजघराणे व नौटी येथील नंदादेवी मंदिर व्यवस्थापन निश्चित करते. दिवस व टप्पे असे आयोजले जातात की यात्रा अमावास्येला कुलसारीला व नंदाष्टमीला होमकुंडला पोहचेल. वसंत पंचमीच्या दिवशी ह्या यात्रेची व्यवस्थापनाकडून अधिकृत घोषणा करण्यात येते.
कार्यक्रम निश्चित झाल्यावर राजघराण्यातील प्रतिष्ठित नौटीला येतात. येताना ते वस्त्रालंकार, आभूषणे व किंमती भेटी घेऊन येतात. बरोबर चार शिंगी मेंढ्याला पण आणलेले असते. यापुढे हाच मेंढा यात्रेत प्रमुख आकर्षण असतो व शेवटपर्यंत यात्रेचे नेतृत्व तोच करत असतो. विशेष म्हणजे प्रत्येक मुक्कामाच्या रात्री त्याचे वास्तव्य नंदादेवीच्या उत्सवमूर्तीपाशी असते. या यात्रेचा सर्वसाधारण कार्यक्रम असा असतो यात्रेच्या पहिल्या दिवशी नंदादेवीच्या सुवर्णमूर्तीला व मेंढ्याला गंगाजळाने स्नान घालून विधियुक्त पूजा केली जाते. भेटी अर्पण केल्या जातात. भेटवस्तू, वस्त्रालंकार डोलीत ठेवले जातात. हिमालयाच्या पुत्रीला, सर्वांच्या लाडक्या नंदाला सासरी पाठवायची तयारी होते. छत्रचामरे, रंगीबेरंगी सजवलेल्या छत्र्या जमा होतात. नंदादेवीची उत्सवमूर्ती सजवलेल्या डोलीत ठेवली जाते. वाद्यांचा गजर होतो. नंदादेवीचा जयजयकार होतो. गढवाली पारंपरिक वाद्ये वाजू लागतात व यात्रा सुरू होते व इडावधणीकडे कूच करते. हे अंतर १० कि.मी. आहे.
कर्णप्रयागपासून साधारण ६-७ कि.मी. अंतरावर इडावधणी ही वस्ती आहे. अशी कथा सांगतात की एके दिवशी नंदा स्नानाला गेली असता तिने हे गाव पाहिले व या गावाच्या ती प्रेमातच पडली. नंदा इडावधणी गावात आली. त्या ठिकाणी जदौडा गोसावी नावाचा नंदाचा भक्त रहात होता. नंदाला पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने नंदाचे खूप प्रेमाने स्वागत केले. तिचा पाहुणचार केला. नंदापण त्याचे प्रेम, भक्ती पाहून मनस्वी आनंदी झाली. तिने प्रेमाने आपल्या भक्ताला सांगितले, “सासरी जाण्यापूर्वी मी तुला भेटल्याशिवाय सासरी जाणार नाही.” जदौडा गोसावीला दिलेल्या शब्दाप्रमाणे आजही नंदा सासरी जाण्यापूर्वी इडावधणीला येते. नंदाचा या ठिकाणी रात्री मुक्काम असतो.
ही रात्र नंदागीते गाऊन जागवली जाते. त्या रात्री सुंदर गढवाली तरुणी नृत्ये करतात व नृत्यातून सासरी जाणाऱ्या मुलीच्या भावना व्यक्त करतात. गीताचा आशयही तसाच असतो.
दुसऱ्या दिवशी यात्रा परत नौटीला येते. परतीच्या प्रवासात या यात्रेत सहभागी होणारे भाविक यात्रेबरोबर नौटीला येतात पण सर्वांच्या मनात एक हुरहूर असते की त्यांची लाडकी नंदा आता सासरी जाणार आहे.
तिसऱ्या दिवशी यात्रा नौटीचा निरोप घेते व कसुवा या ठिकाणी येते. हे पण अंतर साधारण १० कि.मी. आहे. या ठिकाणी महादेव घाटावर व चांदगढीत पूजाअर्चा होते. चौथ्या दिवशी यात्रा सेमला पोहचते. हे अंतर साधारण १२ कि.मी. आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील लोक आपल्या ग्रामदेवतांना डोलीतून नंदा भेटीसाठी आणतात. बरोबर येताना ते रंगीबेरंगी सजवलेल्या छत्र्या घेऊन येतात. काही लोक यात्रेत सहभागी होतात, तर काही देवाच्या डोल्या घेऊन परत आपल्या गावी जातात. प्रत्येक मुक्कामावर यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढतच जाते. पाचव्या दिवशी यात्रा कोटीला पोहचते. कोटीमध्ये ‘कोटीचा लाटू’ व ‘भगोलीचा लाटू’ नंदाला भेटतात. ‘लाटू’ म्हणजे भाऊ! आता यात्रेत त्यांची निशाणे अग्रभागी राहतात. कोटी या ठिकाणी काही अति प्राचीन दगडी मूर्ती आहेत.
सहाव्या दिवशी यात्रा कोटीहून निघून भगोलीसाठी मार्गस्थ होते. मार्गात धारकोट व सिमतोली घाट या ठिकाणाहून नौटी दृष्टिआड होते. नंदाचे डोळे भरून येतात. वारंवार तिची नजर पाठीमागे वळत असते. ती खाली बसते. त्यावेळी गीतातून तिला उपदेश केला जातो. तिची समजूत घातली जाते. शेवटी जड अंतःकरणाने ती उठते. माहेरचे डोळे भरून शेवटचे दर्शन घेते व वाटचाल सुरू करते. या सर्व भावना गीतातून व्यक्त केल्या जातात. यात्रा भगोलीला पोहचते.
सातव्या दिवशी यात्रा कुलसारीकडे चालू लागते. भगोलीच्या पुढे क्यूर, चांदपूर, गधेरा या नद्या म्हणजे नंदाच्या माहेराची हद्द! गधेरा नदी ओलांडून नंदा सासरच्या हद्दीत प्रवेश करते. माहेर संपले! माहेराच्या विरहाने तिचे डोळे अश्रूंनी भरतात. नंदाचा संचार झालेली तरुणी खूप शोक करते. हा प्रसंग मोठा कारूण्यपूर्ण असतो. सर्वांचे डोळे पाणावतात. शोकाकुल नंदाचे प्रार्थना व लोकगीते गाऊन सांत्वन केले जाते. शेवटी नंदा आपल्या माहेराचा निरोप घेते.
यात्रा कुलसारीला पोहचते. नंदाने आता आपल्या सासरी प्रवेश केला. या ठिकाणी नंदादेवीचे खूप उत्साहाने स्वागत होते. हा दिवस अमावास्येचा असतो. या रात्री जमिनीत पुरलेले कालीयंत्र बाहेर काढले जाते व नंदाशी त्याची स्पर्शभेट घडवली जाते व कालीयंत्र परत आपल्या मूळ जागी पुरले जाते. कुलसारीला दक्षिणकाली, हनुमान, सूर्य, त्रिमुखी शिव, लक्ष्मीनारायणाची मंदिरे आहेत. आठव्या दिवशी यात्रा चेपूडिया या गावी येते. बुटोला थोकदार या पहाडी जमातीचे हे गाव आहे. हे अंतरसुद्धा साधारण १२ कि.मी. आहे. पारंपरिक वाद्ये वाजवून लोक नंदाचे स्वागत करतात. यात्रेकरूंच्या सुविधांची काळजी घेतात. मुक्कामातील प्रत्येक गावातील लोक आपल्या घराचे दरवाजे यात्रेकरूंसाठी उघडे ठेवतात व प्रत्येकजण यात्रेकरूंना मदत करण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो.
नवव्या दिवशी यात्रा फलदिया या मुक्कामी येते. हे अंतर साधारण १५ कि.मी. आहे. गावात मीधधार मंदिरात देवीचा मुक्काम असतो. या स्थळी नंदाने म्हणून हे चंडिकेचे रूप घेतले व तिलवा राक्षसाला मारले, असे मानतात. स्थळ ‘तीलफाडा’ म्हणून सुद्धा ओळखले जाते.
या मार्गावर नंदकेसरी नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी नंदाने अष्टभुजाधारी रूप घेऊन मधुकैटभ राक्षसाचा वध केला, अशी श्रद्धा आहे. हे स्थळ पवित्र मानले जाते. असेही सांगतात की, या परिसरात फिरत असताना नंदाचा केशसंभार सुराईच्या झाडात अडकला. नंदा हतबल झाली. राक्षसांनी तिला वेढले. असहाय्य नंदा भैरवाची, शंभू महादेवाची करूणा भाकू लागली. श्रीशंकर प्रकट झालं. त्यांनी असुरांचा वध केला. त्या वेळेपासून हे स्थान नंदकेसरी म्हणून ओळखले जाऊ लागले. यात्रेच्या वेळी गढवाल-कुमाऊँमधील देव-देवतांचे हे भेटीचे स्थळ आहे. करुडची नंदा पण या ठिकाणी भेटण्यासाठी येते व सर्वजण मुख्ययात्रेत सहभागी होतात. चारशिंगी मेंढ्याला या ठिकाणी प्रसाद चढवला जातो.
नंदप्रयागपासून साधारण १८ कि.मी. अंतरावर घाट नावाचे गाव आहे. या घाट गावाजवळ नंदाकिनी नदीच्या काठावर चीड-पाईन वृक्षांच्या दाटीत करूड नावाचे छोटेसे गाव दडले आहे. या गावातील नंदादेवीचे स्थान परिसरात खूप प्रसिद्ध आहे. नंदादेवीचे हे रूप राज-राजेश्वरी म्हणून ओळखले जाते. नंदादेवीच्या मंदिरात देवीची सुवर्ण मूर्ती आहे. करूडहून सुद्धा नंदराज यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहाने केले जाते. या यात्रेत नंदादेवीची सुवर्णाची उत्सवमूर्ती वाजत-गाजत उस्तोली, भेनटी, सुना, कोटी मार्गे नंदकेसरीला येते. या ठिकाणी करूडची ही राज-राजेश्वरी नौटीहून आलेल्या नंदाला भेटते व सर्वजण नौटीहून आलेल्या मुख्य यात्रेत सहभागी होतात.
फलदिया नंतरचा मुक्काम १० कि.मी. अंतरावरील ‘मुंडोली’ या ठिकाणी! मुंडोलीजवळ ‘लुहाजंग’ म्हणून पर्वत आहे. या पर्वतावर नंदादेवीचे ‘रक्तबीज’ राक्षसाशी युद्ध झाले व देवीने त्याचा वध केला. म्हणून हा पर्वत ‘लुहाजंग’ म्हणून ओळखला जातो. देवीच्या विजयाप्रीत्यर्थ यात्रेकरू या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतात. रात्री नंदागीते गायली जातात. नौटी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद बनवला जातो व प्रसाद सर्व यात्रेकरूंना वाटतात. दुसरे दिवशी सकाळी पूजा व आरती होते. ज्यांची वंशवृद्धी होत नाही, असे लोक मुंडोली या ठिकाणी सुराईचे झाड लावतात व चौथरा बांधतात. हा चौथरा बांधणाऱ्या व्यक्तींच्या नावाने ओळखला जातो.
अकराव्या दिवशी यात्रा वाणला येते. हे पण अंतर १५ कि.मी. आहे. २४३९ मी. उंचीवरील वाण हे या यात्रामार्गातले शेवटचे मनुष्यवस्तीचे स्थान आहे. हा १५ कि.मी. रस्ता चढउताराचा व दुर्गम आहे. पण नंदादेवीवरील श्रद्धा सर्व गोष्टींवर मात करते. ४०-५० घरांचे वाण गाव! हे निसर्गरम्य स्थळ आहे. लोककथेनुसार देवीने या ठिकाणी लोहासर दैत्याचा वध केला. या ठिकाणी नंदादेवीची स्थापना एका घरी केली जाते. या ठिकाणी दशमद्वार दशोली व अल्मोडा येथून अनेक भक्त नंदादेवीच्या मूर्ती घेऊन येतात. देवांच्या नंदादेवीशी भेटी घडवल्या जातात. भाविक लोक देवीचे दर्शन घेतात. मग देवता आपल्या गावी परत फिरतात. आतापर्यंत यात्रेत जवळजवळ २०० छत्र्या/निशाणे सहभागी झालेली असतात.
वाण गावात नंदादेवीच्या चुलतभावाचे ‘लाटुदेवाचे’ मंदिर आहे. नंदा सासरी जात असताना याने नशापाणी करून गोंधळ घातला. नंदा रागावली. तिने लाटुदेवाला या ठिकाणी बंद करून टाकले. आज हे मंदिर उघडले जाते. नंदादेवीची व लाटुदेवाची भेट होते व परत मंदिर बंद केले जाते. आता मंदिर उघडण्यासाठी लाटुदेवाला पुढील यात्रेची वाट पाहावी लागते. पण पाठीराखण म्हणून त्याचे निशाण यात्रेत सहभागी होते. मेंढ्याच्या पाठीमागे त्याचा मान असतो.
वाणच्या पुढे स्त्रिया या यात्रेत सहभागी होत नाहीत. नंदाला सासरी पोहोचवण्यासाठी आलेल्या स्त्रिया अश्रू आवरत नंदाचा निरोप घेतात.
वाणच्यापुढे मात्र राहण्याचा कोणत्याही सुविधा नाहीत. यात्रेकरूंना या सर्व सुविधा स्वत:लाच कराव्या लागतात.
यापुढे यात्रा मौन धरून चालते. वाद्ये बंद होतात. एक गंभीर वातावरणात मेंढ्यापाठोपाठ जनसरिता वाहत असते.
-प्रकाश लेले
Leave a Reply