आज ‘नरकचतुर्दशी’.. आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी वसुबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळसणाचा आजचा तिसरा दिवस..बहूजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस.. नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले असा पुराणांमधे उल्लेख आहे. त्याची आठवण म्हणून आंघोळ केल्यावर तुळशीपाशी पायाच्या अंगठ्याने कारीट फोडण्याची प्रथा आहे.
कोकणातल्या ग्रामीणभागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्यांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे…शहरात याचे शहरात फराळाच्या विविध प्रकारात रुपांतर झाले..शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात, फटाके उडवतात..देवळात जाऊन देवदर्शन करून आल्यावर एकत्र बसून फराळ करतात..हल्ली ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रमही जोरात असतात. मात्र मला तरी घरातलं सणासुदीचं भारलेलं वातावरण सोडून सकाळी लवकर उठून गाणी वैगेरे ऐकायला जायला आवडत नाही..त्याऐवजी मी घरात बसून आई-वडील, पत्नी, मुलांसोबत गप्पा मारणं जास्त पसंत करतो..आपापली आवड, दुसरं काय..!
हा दिवस येणाऱ्या व जाणाऱ्या विक्रमसंवताचा संधीकालातला दिवस..सरते वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं गेल त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची कृषीसंस्कृतीची ही प्रथा होती..कृष्ण व नरकासुराच्या कथेचा साज त्यास नंतर कधीतरी चढवण्यात आला असावा..
– नितीन साळुंखे
9321811091
पूर्व प्रसिद्ध –
साप्ताहीक लोकप्रभा दि. २८.१०.२०१६
Leave a Reply