पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० व २००० च्या नोटा का चालू ठेवल्या असाव्यात? मला वाटणारे एक कारण.
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे सर्वच थरातून स्वागत होत आहे. विशेषतः सामन्यांसाठी हा निर्णय अतिशय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया मुंबईतल्या ट्रेन मध्ये, रस्त्यावर फिरताना प्रवासी, रिक्षा-टॅक्सीवाले, किरकोळ भाजी विक्रेते यांच्याकडून ऐकायला येत आहेत. मोदींचा निर्णय आणि त्यातील संदेश अतिशय प्रभाविरीतीने समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोहोचला आहे असा निष्कर्ष यातून काढता येतो.
असे असूनही काही जणांच्या मनात श्री. मोदींनी पुन्हा ५०० व २००० च्या नवीन स्वरूपातील नोटा का आणल्या असाव्यात या विषयी संभ्रम आहे. अर्थात माझ्याही मनात गेले दोन दिवस ही शंका होती. थोडा विचार केल्यास याच उत्तर मी कॉलेजात असताना वाचलेल्या अर्थशास्त्रात होत असं आता मला वाटतं. लॉजिकली मला ते पटलंय.
जगातील ज्या अर्थव्यवस्था शेतीआधारीत असतात त्या बहुतांशी विकसनशील आणि अविकसित समजल्या जातात. अशा अर्थव्यवस्थांमध्ये शिक्षण आणि बँकिंग समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोहोचलेल नसतं. अशा अर्थव्यवस्थेत शहरी भाग सोडला तर बहुतांशी ग्रामीण जीवन हे चलनी नोटांवर आधारित असत. मोठ्या नोटा अस्तित्वात ठेवण्याच एक कारण म्हणजे अशा बहुसंख्य लोकांचे व्यवहार सुरळीत चालावेत हे असतं. अफिका, दक्षिण आफ्रिका वैगेरे विकसनशील अथवा अविकसित देशात अशी मोठी चलनं आढळतील. एवढाच कशाला युरोपात जेंव्हा युरो चलन आणलं गेल तेंव्हा ५०० युरोची नोटही अस्तित्वात होती. आता ती आहे कि नाही हे माहित नाही. युरोची मोठी नोट अस्तित्वात आणण्यामागे युरोपातील गरीब देशांचा विचार केला गेला होता..
कोणतीही गोष्टीचे बरे-वाईट परिणाम असतातच. आपल्या देशात शेतीचा विचार करून मोठ्या किमतीच्या नोटा व्यवहारात आणल्या गेल्या परंतु त्याचा फायदा काळाबाजारवाल्यांनी आणि लाचखोरांनी उठवला, मोठ्या राजकारण्यांनी उचलला त्याचे कारण शेती उत्पन्नावर आजही आपल्या देशात कर नाही. आणि तसा कर नसण्याचे एक कारण शिक्षणाचा आणि बँकिंग सुविधांचा ग्रामीण भागात झालेला कमी प्रसार. बँकिंग तळागाळापर्यंत पोहोचावं म्हणूनच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीनी बँकांचं राष्ट्रीयीकरण केल होतं..परंतु काही लोक त्याचा गैरफायदा घेतात म्हणून बहुसंख्यांच्या फायद्याकडे सरकारला दुर्लक्ष करता येत नाही आणि म्हणून श्री. मोदींनी ५०० व २००० च्या नोटा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ज्या शहरी व्यक्ती आजही रोखीच्या स्वरुपात व्यवसाय करतात आणि सर्व हिशोब व्यवस्थित ठेवतात त्यांनी घाबरण्याच काहीच कारण नाही..शेतीवर एकदा का टॅक्स लावला की मग अशा मोठ्या चलनी नोटांची आपोआप गच्छन्ति होईल. अमेरिकेत शेती मोठ्या प्रमाणावर असूनही तिथे 100 डॉलर्सपेक्षा मोठ्या रकमेची नोट नाही याच कारण तो देश विकसित असून सर्वदूर शिक्षण आणि बँकिंग सुविधा पोहोचलेल्या आहेत हे आहे. भारतात तशी स्थिती येण्यास अद्याप काही कालावधी जाण्याची गरज आहे. आगामी काही काळात ते ही होईलच..!!
५०० व २००० च्या नोटा चलनात ठेवण्याचं एकाच कारण मला दिसत ते म्हणजे आपली अजूनही शेतिआधरित असलेली अर्थव्यवस्था आणि सर्वदूर न पोहोचलेल बँकिंग. मोदींनी देशात ‘जन-धन योजना’ सुरु केली त्याचं कारण बँकिंग सर्वदूर पोहोचाव हेच होत हे आता आपल्या लक्षात येईल. सर्वांची, किमान जास्तीत जास्त लोकांची झिरो बॅलंस ने खाती उघडावीत हे एक त्या दिशेने टाकलेलं एक महत्वाच पाऊल होत हे आता अनेकांच्या लक्षात येतंय.
– नितीन साळुंखे
Leave a Reply