इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म १५ एप्रिल १८९३ रोजी झाला.
इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. भोर संस्थानात त्यांचे आजोबा कारभारी होते. तर सरकारी नोकरीमुळे वडिलांचे वास्तव्य उत्तर भारतात होते. त्यामुळे न. र. फाटकांचे शिक्षण उत्तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाले.
१९१५ मध्ये ते बी. ए. झाले. त्यावेळेस त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांची वाङ्मयीन कारकीर्द मुंबईच्या ‘इंदूप्रकाश या दैनिकात वृत्तपत्र संपादन करण्यापासून झाली. नंतर नवाकाळ मध्येही त्यांनी काम केले. महिला विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अध्ययन केले आणि त्यानंतर रुईया महाविद्यालयात ते शिकवू लागले.
प्रचलित विचार प्रवाहाविरूद्ध मत मांडून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचे वैशिष्ट्य ‘अंतर्भेदी’ या टोपणनावाने त्यांनी व्यक्तिचित्रे लिहिली. फाटकांनी चरित्रपर लेखनाला सुरुवात केली ती ‘न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे’ या ग्रंथापासून. त्यानंतर ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’, ‘ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’, ‘श्री एकनाथ ः वाङ्मय आणि कार्य’ ही संतचरित्रे तर लोकमान्य, आदर्श भारत सेवक, नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर यांची चरित्रे ही फाटकांनी लिहिली. त्यांचा पिड खरा तर इतिहासकाराचा. त्यांच्यासमोर गिबनचा आदर्श होता. त्यामुळे त्या व्यक्तीचे तिच्या काळाशी नाते असते ह्या जाणिवेने फाटकांनी ही चरित्रे लिहिली आहेत. न. र. फाटक हे जसे स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच ते इतिहासाचे दृष्टी ठेवून इतिहासाचा आणि वर्तमानाचा वेध घेण रे विचारवंत, भाष्यकार होते. त्यावरून फाटकांच्या वैचारिक आणि बौद्धिक पातळीची जाणीव होते. न. र. फाटक यांचे २१ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply