देव म्हणजे नक्की काय ? तो कसा असतो ? कसा दिसतो वैगरे प्रश्न मला लहानपणा पासून पडत व या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देखील कोणी देण्यास तयार नव्हते देव्हा-यातील मूर्ती , मंदिरीतील मूर्ती , विविध देवतांचे आकर्षक आणि तेजोवलय असलेले फोटो पाहताना मात्र निश्चितच मनात एक प्रकारचा शांततेचा भाव उमटत असे , कदाचित देवाबद्दल ऐकलेल्या दिव्य कथांचा तो परिणाम असावा ,पुढे जेव्हा मोठा होत गेलो तश्या तश्या व्यक्तिगत खाणे पिणे, कपडेलत्ते , खेळाची साधने वैगरे मिळवण्याच्या इच्छा जागृत होत गेल्या व अनेकदा आई बाबा देत नाहीत मग देवाकडे मागितले की देव नक्की देईल या आशेने स्वार्थी हेतूने देवाकडे मागणे मागत गेलो ,काही मागण्या पूर्ण झाल्या तर काही नाही झाल्या , जेव्हा आसपासची विषमता , गरिबी , अनाथ , अंध , अपंग , गुन्हेगार , चोर , खुनी लोक वैगरे परिस्थितीची जाणीव झाली तेव्हा प्रश्न पडला की देव सगळ्यांना सुखी का करत नाही ? जगात देव आहे तर मग तो लोकांना असे का करतो , तो जर बुद्धीदाता आहे तर काही लोकांना अन्याय करण्याची , गुन्हे करण्याची , चोरी , दरोडे घालण्याची वाईट बुद्धी का देतो ?
अनेक उलटे सुलटे प्रश्न मनात फेर धरत आणि शेवटी देव नाहीच असे उतर निघत असे , देव नाहीच म्हणजे ,मग पाप – पुण्याचा हिशेब करणारा देखील कोणी नाही , असा सोपा निष्कर्ष निघाला . तेथूनच कदाचित मी देव धर्माच्या संस्कारांचे ओझे फेकून द्यायला सुरवात केली कौटुंबिक , सामाजिक ,धार्मिक बंधने तोडायला सुरवात केली , यात स्वतच्या इच्छापूर्तीचा आग्रहच नव्हे तर अट्टाहास देखील सामील होता , आणि इच्छापूर्ती झाली नाही की राग , निराश्या , वैफल्य , वैगरे भावना बळावत त्यातच मग पुढे जीवनात व्यसने आली , एके दिवशी मरायचेच आहे मग जीवनातील सगळ्या मौज-मस्ती च्या गोष्टी केल्या पाहिजेत हा दृष्टीकोन तयार झाला आणि अनिर्बंध जीवन जगणे सुरु झाले …
एकदा त्याच काळात म्हणजे मी बारावीला असताना वडील अर्धांगवायूने आजारी पडले आणि कोणीतरी सांगितले की निफाड गावाजवळ गणपतीचे एक जागृत स्थान आहे तेथे जाऊन जर आम्ही सहस्त्रावर्तने केली तर वडिलांना लवकरात लवकर बरे वाटेल मी मात्र विश्वास नसल्याने त्या कार्यक्रमाला गेलो नाही मोठा भाऊ व व इतर नातलगांनी ती सहस्त्रावर्तने पूर्ण केली . सहावी सातवी पर्यंत घरात शुभंकरोती म्हणणारा मी आता देवावरची श्रद्धा सोडली होती . अगदी नाईलाजाने घरी देवासमोर किवा कुठे , सत्यनारायण पुजेच्या प्रसादला गेलो की इतरांना बरे वाटावे म्हणून ‘ देखल्या देवा दंडवत ‘ सुरु होते .
( क्रमशः)
— तुषार पांडुरंग नातू
(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
Leave a Reply