(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
सकाळी ७.३० ला नाशिकरोड रेल्वे स्टेशन वरून ‘ पंचवटी ‘ एक्प्रेस मध्ये बसलो , माझा रेल्वे स्टेशन वर नेहमी वावर असल्याने सगळे फेरीवाले ओळखीचे होतेच माझ्या …बटाटावडा , चिवडा , द्राक्षे , कोल्ड्रिंक्स , खीरा काकडी असे पदार्थ रेल्वे डब्यात तसेच , स्टेशन वर विकणारे हे मित्र कलंदर असत त्यांच्या बरोबर राहून मी चालत्या गाडीत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाणे .. वेगात असणारी गाडी गाडीसोबत धावत जाऊन पकडणे ..सोडणे …असे प्रकार शिकलो होत . त्यांच्याशी गप्पा मारत बटाटेवडे वगैरे खात गाडीत छान टाईम पास केला , मात्र मी कुठे निघालोय हे मात्र कोणाला बोललो नाही फेरीवाले मित्र नाशिक रोड ते इगतपुरी व क्स्धी कधी कसारा इथपर्यंत अप -डाऊन करत असत , त्या मुळे कसा-या पर्यंत छान मजेत वेळ गेला..
कसा-या च्या पुढे गाडी गेली तेव्हा एकदम मला रिकामे वाटू लागले , मुंबईला या पूर्वी ठाणे , सांताक्रूझ , वांद्रे ..दादर , अश्या ठिकाणी नातलगांकडे गेलो होतो पण त्या वेळी सोबत कुटुंबीय होते असा एकटा आणि ते देखील घर सोडून जाणे म्हणजे जरा मनावरील दडपण वाढवणारे होते ( नंतर ब्राऊन शुगर च्या नादात अनेकदा मुंबई ला जाणे येणे केले , काही दिवस फुथपाथ वर देखील वास्तव्य केले ). कल्याण पासून मग मुंबईचे कारखाने , झोपडपट्या, रेल्वे लाईनच्या कडेला बसून विधी उरकणारे लोक , मोठे मोठे दुर्गंधी युक्त नाले , उघडी नागडी मुले , बाजूच्या ट्रॅक वरून समांतर धावणाऱ्या लोकल्स , त्यातील खच्चून भरलेली , दाराला लटकणारी माणसे वैगरे दृश्ये पाहून मन विषण्ण होत होते , माझा कसा निभाव लागेल इथे ? हा प्रश्न वारंवार मनात येत होता …
मध्यवर्ती ठिकाण म्हणून दादर येथे उतरण्याचे मी ठरवले होते , तेथे उतरल्यावर मग आपण लोकांकडे चौकशी करून लता मंगेशकरांचे घर विचारू आणि त्यांना भेटायला जाऊ असा सोपा सरळ विचार केला होता मी ..दादरला उतरल्यावर आधी स्टेशनच्या बाहेर आलो . सगळीकडे सतत धावपळीत , घाईत चालणारी माणसे होती , नेमके कोणाला लता मंगेशकरांचा पत्ता विचारावा हा संभ्रम पडला , एक दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर काय कटकट आहे अश्या अविर्भावाने माझ्या कडे पाहत ते घाईत निघून गेले… शेवटी एका पानठेल्यावर जाऊन विचारले तर त्यालाही वेळ नव्हता , त्याने नुसताच हाताने पुढे सरळ जा असा इशारा केला , शेवटी एक म्हातारा पेन्शनर होता बहुतेक त्याला थांबवले व पत्ता विचारला त्यावर तो हसला म्हणाला ‘ यहा कहा मिलेगो वो ? ‘ क्या काम है उनसे ? कहासे आये हो असे प्रश्न विचारू लागला , आमचे बोलणे पाहून एकजण मराठी असावा बहुतेक तो थांबला व मला म्हणाला असा त्यांचा पत्ता नाही सांगत तुला कोणी . तू विले पार्ले येथे जा तेथे दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे , त्यांच्या वडिलांचे आहे ते ,तेथे तुला पत्ता मिळेल …
मग पुन्हा रेल्वे स्टेशनवर आलो आणि विले पार्ले कडे जाणाऱ्या लोकल मध्ये बसलो दुपारचे १२ वाजून गेले होते त्यामुळे लोकल्स ची गर्दी कमी झालेली होती , विलेपार्ले येथे आल्यावर दिनानाथ मंगेशकर नाट्य गृहाचा पत्ता विचारून तेथे पोचलो बहुतेक कोणताही प्रयोग नसावा कारण सगळीकडे शांत होते तेथील एका पहारेकऱ्याला लता मंगेशकरांचा पत्ता विचारला त्यावर तो म्हणाला ‘ तू इथे कशाला पत्ता विचारतो आहेस त्यांचा ? ‘ मी सांगितले की हे नाट्यगृह त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे म्हणून विचारतोय ‘ त्यावर हसून म्हणाला ‘ अरे हे महापालिकेने बांधलेले नाट्यगृह आहे आणि येथे दिनानाथ मंगेशकरांचे नाव ते एक जेष्ठ नाट्यकर्मी होते म्हणून दिलेय , लता मंगेशकर यांचा येथे काहीही संबंध नाहीय . झाले माझे अवसान गळाले अर्धवट माहितीवर आपण येथे आलो हा मोठा मुर्ख पणा केला असे वाटू लागले .जड पावलांनी परत फिरलो आता एक क्षण देखील मुम्बईत थांबू नये असे वाटू लागले , जवळची गांजाची पुडी सिगरेट मध्ये भरून प्यावी म्हंटले तर आसपास सतत अशी गर्दी की कोणाला जर गांजाचा वास समजला तर वांधे होतील म्हणून दादरला परतलो आणि तेथे ओव्हर ब्रीज वर जाऊन एका म्हाताऱ्या भिकाऱ्याच्या बाजूला उकिडवा बसलो आणि हळूच सिगरेट मध्ये गांजा भरला , एक दोन झुरके मारले मग जरा डोके शांत झाले ….पुन्हा सगळ्या घटनांचा विचार करू लागलो..
घरात भांडण झाले म्हणून काय लगेच घर सोडायचे आपण ? आपला हा आततायी पणाच झालाय , आणि भांडणाचे मूळ तर आपलीच चूक होती , आईबाबा किवा भाऊ काही आपले शत्रू नाहीत , ते जरा जास्त रागवत असतील पण ते आपल्या भल्यासाठीच ना ? असे स्वतःलाच समजावू लागलो अर्थात हा सगळा विचार घरी परत जाण्यासाठीच चालला होता मग निर्णय घेतला आता मिळेल ती गाडी पकडून सरळ घरी जायचे . घरी जाण्याचा निर्णय झाल्यावर पुन्हा जरा हुशारी वाटली . मनमाड कडे परत जाणारी पंचवटी एक्प्रेस दादर ला ४.३० ला येते बोरीबंदरहून . एव्हाना साडेतीन वाजलेच होते , मग एक तास स्टेशनवर बसून राहिलो , मनाशी आता या पुढे , आई वडिलांचे ऐकायचे , फालतू धंदे सोडून द्यायचे वगैरे निश्चय करत होतो . एकदाचा गाडीत बसलो आणि रात्री १०.३० ला पुन्हा नाशिक रोडस्टेशन वर उतरून सरळ दोन टांगात घर गाठले . मला परत आलेला पाहून सर्वाना आनंद झाला सकाळपासून कुठे गेला असावा या काळजीतच होते घरचे . एकंदरीत जेमतेम १५ तासात माझा स्वाभिमान वैगरे गळून पडला होता . नंतर काही दिवस जरा बरा वागलो . मनातील पश्चातापाची बोच कमी झाली तसा पुन्हा स्वैर वर्तन सुरु केले …
( व्यसनी व्यक्तीला अनेकदा त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत असतो , व काही दिवस जरा आपल्या वर्तनात सुधारणा दाखवतो मात्र काही दिवसातच तो सगळे विसरून पुन्हा आपल्या मूळ पदावर येतो…..)
(बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply