(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
सोडावॉटर च्या बाटल्यांचा वर्षाव झाल्यावर जमावाची जी पळापळ झाली ती गमतीशीर होती , वाट फुटेल तसे सगळे सैरावैरा पळत होते , तितक्यात समोरून पोलिसांचे गाडी आली तसे अजूनच गोंधळ झाला , आम्ही देखील पळत दुर्गा गार्डन गाठले , व तेथे अंधारात लपून बसलो , आम्हाला स्वतचेच खूप हसू देखील येत होते , इतक्या तावातावाने निघालेला जमाव केवळ १५ ते २० सोडावॉटरच्या बाटल्यांनी पांगवला होता . जमावाची ही अजून एक खासियत आहे एकाने दगड मारला की सगळे आक्रमक होतात आणि एक पळू लागला की सगळे पळतात . मला मनातून बरे वाटत होते असे झाले या बद्दल कारण जेव्हा आम्ही जमांवात सामील होऊन ‘बग्गा ‘ यांच्या इमारतीकडे निघालो होतो तेव्हा एक विचार माझ्या मनात होता की जर ते कॉलेजला असलेले बग्गा बंधू खरोखर माझ्या समोर आले असते तर त्यावेळी मी त्यांच्यावर हात उचलू शकलो असतो का ? कारण आमचे व्यक्तिगत काहीही शत्रुत्व नव्हते अर्थात मैत्री देखील नव्हती पण कॉलेजला रोज तोंडावर तोंड पडत असे अश्यावळी एखाद्या नेत्याच्या हत्येवरून ज्यांचा त्या हत्येशी काही संबंध नाही तर केवळ एखादी विशिष्ट जात अथवा धर्म या वरून त्या व्यक्तीला मारणे मला तरी जमले नसते…
जमावाच्या नादाने जरी मी गेलो असलो तरी फक्त काहीतरी थ्रीलिंग घडणार आहे म्हणूनच मला जावेसे वाटले होते आणि तारुण्याची खुमखूमी होतीच अर्थात अंगात, अनेक तरुण बहुधा त्या जमावात माझ्या सारखेच असणार जे केवळ काहीतरी थ्रिलिंग अनुभवायला मिळणार म्हणून जमावात सामील झाले होते …दुर्गाबागेत जाऊन आम्ही पुन्हा चिलीम ओढून ताजेतवाने झालो आणि मग घराकडे निघालो रेल्वे स्टेशनच्या पलीकडे रेल्वे क्वार्टर्स होते त्यामुळे रेल्वे स्टेशनवर जाणे आलेच , पाहतो तर काय ..रेल्वे स्टेशन वर देखील असेच तरुणांचे घोळके उभे होते सगळी मुले सिन्नर फाटा , विष्णुनगर , स्टेशनवाडी येथील आमच्या ओळखीचीच होती ..मग काय पुन्हा आम्ही तेथे थांबलो .. रात्रीचे साधारण १२ वाजून गेले होते आणि हावडा कडे जाणारी कलकत्ता मेल थोडी लेट होती ती स्टेशनवर येत होती गाडी स्टेशनवर येताच घोळक्यांनी उभी असलेली मुले प्रत्येक डब्यात चढली आणि आत कोणी शीख दिसतोय का ते पाहू लागली एका डब्यात एक कुटुंब सापडले तशी एकदम शिवीगाळ करत मुलांनी त्या कुटुंबप्रमुखाला डब्याबाहेर खेचण्यास सुरवात केली , त्या कुटुंबातील स्त्री चे रडणे , किंचाळणे ,लहान मुलांचा मोठा आक्रोश झाला तो पुरुष भेदरला होता हाता पाया पडत होता तरीही त्याला कोणाला दया आली नाही मला ते पाहून कसेसेच होत होते वाटले आपण मध्ये पडून त्याला सोडवावे पण सगळी मुले आमच्याच एरियातील होती त्यांना माझी मध्यस्ती चालली नसती,..
लाथा बुक्क्यांनी त्या माणसास मारणे सुरु होते ,अजूनही दोन डब्यातून असेच तिघांना खाली खेचत आणले गेले होते फलाटावर गोंधळ माजला होता . तो माणूस सारखा सुटून डब्याकडे धाव घेत होता , आता त्याची पत्नी व मुले देखील नवऱ्याला वाचवायला खाली उतरली होती आणि मध्ये पडत होती त्या माणसाची पगडी सुटली होती अतिशय करुण दृश्य होते ते , त्याच्या खिशातील चिल्लरआणि नोटा बाहेर पडल्या होत्या , दोन तीन जणांनी लगेच त्या उचलून स्वतच्या खिशात टाकल्या एकाने त्याच्या हातातील घड्याळ हिसका मारून ओढले . हे पाहून मात्र मला राग आला , यांचा नेमका हेतू काय आहे ? लुटमार की बदला ? तसे पहिले तर दोन्ही हेतू निरर्थक होते मी मग आरडा ओरडा सुरु केला घड्याळ परत दे म्हणून त्या मुलाच्या मागे लागलो तेव्हा ते घड्याळ त्याने त्या स्त्री च्या हाती दिले एव्हाना रेल्वे पोलीस जे लांब उभे होते ते पण मध्ये पडले आणि ते कुटुंब पुन्हा गाडीत जाऊन बसले . गाडी या गोंधळात गाडी सुमारे १५ मिनिटे थांबली होती स्टेशनवर .
हा सगळा घटनाक्रम आठवला की अजूनही मन खिन्न होते…
माणसे व्यक्तिगत शत्रुत्व नसताना देखील एखाद्या नेत्याच्या हत्येवरून इतकी क्रूर होऊ शकतात ? हत्या करणाऱ्या व्यक्तीला सोडून इतर निरपराध माणसांना असे मारणे , त्यांची मालमत्ता जाळणे , लुटमार करणे कितपत योग्य आहे ? या जमावात खरोखर इंदिरा गांधी यांच्या बद्दल तळमळ असणारे किती लोक होते ? की फक्त संधीसाधुच सामील झाले होते ? मी जरी व्यक्तिगत जिवनात नशा करत होतो तरी देखील माझे संवेदनशील मन मात्र हा सगळा प्रकार पाहून अंतर्मुख झाले होते . जाती -धर्माच्या , पंथाच्या , राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोक कधी विचार करू शकतील माणुसकीचा ? तो खरोखर भाग्याचा दिवस असेल ..
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
अतिशय महत्वाचा भाग वाचून माणुसकीची भीषणता समोर येते लेखकांनी अतिशय योग्य मुद्दे मांडलेत.