नवीन लेखन...

नशीब

एखादी किरकोळ गोष्टही कधी मनासारखी घडली नाही की आपण लगेचच नशीबाला दोष देतो. आपण सोडून इतर सर्वांना नशीब भरभरुन साद देतं. मात्र आपल्या वाटेला वणवण पाचवीलाच पूजलेली, असं सर्वांनाच वाटतं! दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टींचं नातं थेट नशीबाशीच जोडलेलं असतं का? आणि संपूर्ण आयुष्य नशीबाला दोष देत रडतखडत जगणं कितपत योग्य आहे याचा कधीतरी विचार नको का करायला? माणसाच्या शरीरात उद्भवणाऱ्या अनेक आजारांचं मूळ आपल्या विचारांत दडलेलंच असतं असं शास्त्र सांगतं. घडोघडी नशीबाला दोष देण्याच्या सवयीला पूर्णविराम दिला की आपल्याला निरोगी आयुष्य जगता येईल का?

अगदी क्षुल्लक गोष्टींतही आपण नशीबाला कसा दोष देतो याचं उदाहरण सांगतो. कल्पना करा की तुम्ही बसस्टॉपवर चाळीस नंबरच्या बसची वाट पहात उभे आहात. प्रथम सदतीस नंबरची बस येते- मग अडतीस नंबरची बस येते- मग एकोणचाळीस नंबरची बस येते- तुमचा उत्साह वाढतो. आता आपली चाळीस नंबरची बस नक्की येणार या आशेने तुम्ही उत्साहीत होता. थोडयाच वेळात पुढची बस येते. तुम्ही बसचा नंबर पाहता तो पुन्हा सदतीस असतो, अडतीस असतो, कदाचित एकोणचाळीसही असतो मात्र चाळीस नसतो! तुम्ही हैराण होऊन जाता. तुम्हाला हवी असलेली बस वगळता इतर भलत्याच बसेस येत राहतात आणि तुम्ही पुरते बेजार होऊन जाता. “बघितलंस माझं नशीब! आपल्याला हवी असलेली चाळीस नंबरची बस सोडून इतर सर्व बसेस येत आहेत, मात्र आपल्या बसचा पत्ता नाही.” निराशेच्या सूरात तुम्ही सोबत्याकडे तक्रार नोंदविता. सोबतीही तुमच्या निष्कर्षाबाबत सहमती दर्शवतो. शेवटी नाईलाज म्हणून तुम्ही टॅक्सी करण्याचा निर्णय घेता. नशिबाला दोष देत चडफडत तुम्ही टॅक्सीत बसता. टॅक्सी सुरु होते. तुम्ही सवयीनुसार टॅक्सीतून मागे वळून पाहता. पाठीमागे बसस्टॉपवर चाळीस नंबरची बस आलेली असते! आपलं नशीब फुटकं या विचारावर तुम्ही शिक्कामोर्तब करता. पुढे टॅक्सीचा प्रवास तरी तुम्ही सुखाने उपभोगता का? मीटरवर खट्ट झालं की तुमच्या हृदयातली धडधड वाढते. आता टॅक्सीचे किती पैसे खर्च होणार या विचारांवे तुमची तगमग सुरुच राहते.

चाळीस नंबरच्या बसच्या उदाहरणाचा आणि नशीबाचा कितपत मेळ जुळतो ते आपण आता पाहू. एखादी हवी ती बस आली नाही की लगेचच नशीबाला दोष देणं कितपत योग्य आहे? एकदा टॅक्सीमध्ये बसल्यानंतर मागे वळून बसस्टॉपवर काय चाललं आहे हे जाणून घेण्याची खरोखरच गरज असते का? टॅक्सीने जायचं म्हणजे साधारणतः अमूक खर्च येणार याचा ठोकताळा येण्याइतपत जनरल नॉलेज आपल्याजवळ नक्कीच असतं. मग टॅक्सीत बसण्याआधीच तेवढा खर्च करण्याइतपत आपलं काम महत्त्वाचं आहे का याचा आपण विचार नको का करायला? तेवढं महत्त्वाचं काम असेल तर खर्चाचा बाऊ कशासाठी करायचा? आणि काम महत्त्वाचं नसेल, आज नाही तर पुन्हा कधी केलं तरी भागण्यासारखं असेल तर शांतपणे घरी जाऊन आपण ताणून का नाही देत? टॅक्सीचं मीटर वाढू लागलं की हृदयातली बेचैनी वाढू देणं कितपत रास्त म्हणायचं? गोष्टीचा सारांश एकच, अगदी क्षुल्लक गोष्टींबाबतही आपण पदोपदी नशिबाला दोष देत असतो आणि विनाकारण चिंतेचा पहाड उरावर बसवत असतो.

नशीबालाही संधी देण्यासाठी माणसाने कष्ट उपसणं गरजेचं असतं. इप्सित ध्येय गाठण्यासाठी केवळ नशिबावर अवलंबून न राहता सर्व अंगांचा विचार करुन परिश्रम घ्यावेच लागतात. एकप्रकारे तुम्ही त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी कितपत गंभीर आहात याची परीक्षा जणू नशीब आजमावत असतं. आरंभशूळ मंडळी बरीच असतात. यंव करीन अन् त्यंव करीन गमजा मारणारेही बरेच असतात. मात्र येणाऱ्या संकटांवर खूबीने तोंड काढत ध्येयपूर्तीसाठी घाम गाळणारे अभावानेच आढळतात.या मंडळींच्या चिकाटीला मग नशिबाचीही साथ मिळते. ध्येयाच्या शिखरावर ही मंडळी विराजमान होतात.

चंद्रयानात सामील होणारा पहिला भारतीय म्हणून आपण अभिमानाने राकेश शर्माचा उल्लेख करतो. चंद्रयानात सामील होणारा वैमानिक होण्याआधी राकेशने अनेक चाचण्यांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. अंगी कर्तृत्व असलं की नशीब कसं साथ देतं याचं उदाहरण म्हणून राकेश शर्माच्या उदाहरणाचा आपण थोड्या खोलात जाऊन विचार करु. चंद्रयानात वैमानिक पाठवण्याआधी संबंधित अधिकाऱ्यांनी अनेक जणांच्या चाचणी परीक्षा घेतल्या असतील. आपण उदाहरणासाठी सुमारे पाचशे जणांनी प्राथमिक परीक्षा दिली होती असं गृहीत धरु. या पाचशे इच्छुकांच्या नंतर टप्याटप्याने पुढील चाचण्यांना सामोरं जावं लागलं. पाचशेतून नंतर शंभर वैमानिक पुढे गेले व चारशे बाद झाले असं समजू. या शंभरातून नंतर पन्नास, पन्नासातून पंचवीस, पंचवीसातील दहा अशी निवड होत अंतिम टप्प्यात केवळ दोन वैमानिकांची निवड करण्यात आली. राकेश शर्मा बरोबर अंतिम टप्पा गाठणाऱ्या दुसरा वैमानिक होता रविश मल्होत्रा. या दोन्ही वैमानिकांना चंद्रयान मोहिमेचं संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आलं. निवड राकेश शर्माची झाली, मात्र काही समस्या उद्भवलीच तर राखीव उमेदवार म्हणून रविश मल्होत्राला तत्पर ठेवण्यात आलं. प्रत्यक्षात कसलीही समस्या उद्भवली नाही. राकेश शर्मा सुरळीतपणे चंद्रयान मोहिमेत सामील झाला. रविश मल्होत्राचं नाव बहुतेकांच्या विस्मृतीत गेलं.

राकेश शर्मा इतकंच कर्तृत्व अंगी असताना आपल्याला प्रत्यक्ष यश गाठता आलं नाही याचा दोष रविश मल्होत्राने नशीबाला दिला तर त्याच्याबरोबर युक्तिवाद करणं कुणालाही कठीण जाईल. मात्र प्राथमिक फेरीतच बाद झालेल्या चारशेपैकी एखादा वैमानिक चंद्रावर जाणं भाग्यात लिहिलेलं नव्हतं असं म्हंटलं तर त्याचं म्हणणं कुणी ग्राह्य धरील का? थोडक्यात नशीबाला दोष देण्याआधी प्रथम कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. अंगी कर्तृत्व नसताना केवळ नशीबाला दोष देणाऱ्यांची लोक टवाळी करतात, सर्वच स्तरांवर त्यांचं हसं होतं.

वरील उदाहरणांवरुन केवळ नशीबाच्या जोरावर यश संपादित करणारे भाग्यवान नसतातच का? असा प्रश्न उद्भवतो. समाजात असे भाग्यवानही आपल्याला भेटतात. माझ्या परिचयाचे एक गृहस्थ गिरगावातील चाळीत राहात असत. एकदा त्यांची मावशी निवर्तली. मावशीला मूलबाळ नव्हतं. मावशीचा अंधेरीचा फ्लॅट नशीब घेऊन जन्माला आलेल्या भाच्याला विनासायास मिळाला. याच सद्गृहस्थाचे नंतर आणखी एक जवळचे नातेवाईक निवर्तले. या नातेवाईकाकडून गोष्टीतल्या नायकाला लोणावळ्याचा बंगला, नवी कोरी गाडी आणि बऱ्यापैकी पैसाअडकाही मिळाला! ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ या म्हणीचं उदाहरण म्हणून सदर सद्गृहस्थाकडे उंगली निर्देश बिनधास्तपणे करता येईल. केवळ नशिबाच्या जोरावर हा इसम गडगंज संपत्तीचा वारस बनला.

मात्र असे भाग्यवान समाजात किती आढळतात हेही आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. हजारात एखादा इसम असा भाग्यवान निघत असावा असा माझा अंदाज आहे. उरलेल्या नवशे नव्याण्णव मंडळींना केवळ नशिबावर विसंबून न राहता कष्ट हे उपसावेच लागतात. असे कष्ट उपसणाऱ्या मंडळींपैकी कित्येक जणांना नंतर नशीबाची साथ मिळते. आपण हजारातील एक भाग्यवान आहोत की उरलेल्या नऊशे नव्याण्णव पैकी एक याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःतच शोधावं हे उत्तम !

–सुनील रेगे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..