वाचन हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विचार असतो. काय वाचायचे? किती दिवस वाचायचे? कोणत्या विषयाचे वाचायचे? कोणत्या लेखकाचे वाचायचे? इ. इ. तच भाषा ही ज्याची त्याची जन्म, शेजार, गाव, मोहल्ला, भाग, विभाग इत्यादी गोष्टीना त्या व्यक्तीच्या बोलण्यातून त्याची भाषा प्रतिनिधीत्व करते. हल्ली आपल्या देशात तथाकथित अभ्यासक मार्गदर्शक निर्माण झाले आहेत. त्यांना सतत कोणीतरी चुकत आहे, आपण ती चूक दुरुस्त केली पाहिजे, हा मार्गदर्शक विचार त्यांच्या कल्पक बुद्धीतून येतो आणि सुरु होतो. आपले विचार आपली संस्कृती दुसऱ्याच्या डोक्यावर थोपवण्याचा प्रकार!
मुळात भाषा ही विचारांची आदानप्रदान करण्याची प्रक्रिया आहे. आपल्याला काय पाहिजे, हे दुसऱ्याला कळण्यासाठी भाषेची निर्मिती झाली आहे. आदिम काळात जेव्हा भाषा विकसित झाली नव्हती, तेव्हा आपल्याला काय सांगायचे आहे ते आपले पूर्वज सांकेतिक भाषेत सांगायचे पण ही सांकेतिक भाषा रात्रीच्या काळोखात, कमी दृष्टीच्या किंवा अंध व्यक्तीला समजावण्यासाठी अपुरी पडत असे. त्यावर तोडगा म्हणून प्रगतशील माणूस प्राण्याने भाषेची उत्पती केली. ही झाली भाषेच्या उत्पत्ती ची गोष्ट. त्यानंतर माणूस अजून अजून प्रगत होत गेला त्यानंतर भाषेचे रूपांतर साहित्यात होऊ लागले. भाषेमध्ये कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या जाऊ लागल्या. (अजूनही काही बोलीभाषा अशा आहेत की ज्यांना स्वतःची लिपी सुद्धा नाही आणि देवनागरी मध्ये त्यातले काही शब्द लिहिले जाऊ शकत नाहीत. त्या भाषेमध्ये अजूनही साहित्य उपलब्ध नाही.) प्रगत माणसाला आता वैचारिक श्रेष्ठत्व आलं. आता हे श्रेष्ठत्व तथाकथित विचारवंत दुसऱ्या चुकलेल्या (त्याच्या मते) व्यक्तीवर लादू लागला.
उदाहरणार्थ, एखादा वऱ्हाडी व्यक्ती जर बोलला, ‘काय करून राहिला रे बावा?’ तर ती व्यक्ती बोलण्यात कशी चुकली? मराठी भाषा बोलता येत नाही म्हणून खिल्लीही उडवली जाऊ शकते (हे माझ्या बाबतीत झाले आहे असं अजिबात नाही. हे फक्त उदाहरण आहे.) तर त्या व्यक्तीचा तथाकथित विचारवंत कडून मराठी भाषा कशी बोलल्या जाते आणि आपण कसे चुकलो याबाबतीत तास घ्यायला सुरुवात होते. त्याला समजावून सांगितले जाऊ लागतं, काय करून राहिला रे बावा?” हे अस नसून, काय करतोयस रे बाबा?” हे अस आहे. उपरोक्त दोन्ही वाक्याचा विचार करता दोन्हीही वाक्य भाषा ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर आहेत. पण तथाकथित श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात व्यक्तीच्या विचारावरच नकळत गदा आणण्यात येते. खर तर उपरोक्त वाक्य, ‘काय करून राहिला रे बाबा?’ व्याकरणिकदृष्ट्या बरोबर आणि पूर्ण वाक्य आहे पण, काय करतोयस रे बाबा?’ या वाक्यातला करतोयस हा चुकीचा शब्द आहे त्याऐवजी करतो आहेस’ व्याकरणिक दृष्ट्या बरोबर आहे, असे मला वाटतं.
श्री चक्रधर स्वामींच्या काळात आणि संत ज्ञानेश्वरांच्या काळात जे काही साहित्याचे लेखन झाले आहे, त्यामध्ये वापरलेली मराठी भाषा शतप्रतिशत (प्राकृत) मराठीच आहे. यामध्ये इतर कुठल्याही भाषेचे अतिक्रमण झालेले नाही. पण त्यानंतरच्या काळात मराठी भाषेवर इतर भाषांचे अतिक्रमण होऊन मराठी भाषेतल्या काही शब्दांवर त्या त्या भाषेतल्या शब्दांनी जागा घेतली आणि सोयीस्कररित्या शब्दाची लांबी कमी करून कमी शब्दाने किंवा एकाच शब्दाने घेतली. उदाहरणार्थ – ‘उदकात जठराग्नी प्रज्वलित जाहला यास आहुती देतो’ याचाच अर्थ “पोटात आग पेटली आहे ती विझवतो” म्हणजेच “जेवण करतो”.
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो होतच असतो, याबद्दल दुमत नाही. पण जर माझ्या डोक्यात माझ्या बोलीभाषेतून विचार प्रकट होत असतील ते कोणाच्या तरी सांगण्यावरून, त्यांना आवडत नाही म्हणून, मी माझी बोली भाषा वापरायची बंद केली तर त्यामुळे दोन गोष्टीचा ऱ्हास होतो. एक म्हणजे स्वतःची विचारक्षमता आणि दुसरं म्हणजे मी माझ्याच बोलीभाषेचा ऱ्हास करायला हातभार लावतो.
नटाला भाषेची ओळख असणे, जाण असणे तितकेच महत्वाचे आहे पण ते अभिनय करत असताना इतर दैनंदिन जीवनात भाषेचे स्वातंत्र्य ठेवता आले पाहिजे आणि त्याचबरोबर अभिनय करत असताना आपले पात्र काय आहे? त्या पात्राची काय भाषा आहे? याचा अभ्यास करणे हे महत्वाचे आद्यकर्तव्य आहे. काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये अमरावतीच्या एका चमूचे नाटकाचे सादरीकरण पाहिले त्यांनी शहरी भाषेमध्ये सादरीकरण केले होते पण त्यांच्या बोलण्याचा वैदर्भीय हेल काही काही ठिकाणी शब्दांचा उच्चार वहऱ्हाडीच होता. आपल्याला शहरामध्ये सादरीकरण करायचे आहे या दडपणाखाली कदाचित त्यांनी शहरी भाषेचा उपयोग केला पण सादरीकरणामध्ये पाहिजे तो आत्मविश्वास दिसला नाही. नाटकाचा आशय कितीही उत्तमअसला तरी अपुऱ्या आत्मविश्वासामुळे सादरीकरण चांगले झाले नाही जे की त्यांचे सादरीकरण नेहमी चांगले होत असते. मला तेव्हाही हाच प्रश्न पडला होता की गरज नसताना शहरी भाषेचा किंवा इतर कुठल्याही भाषेचा उपयोग का करायचा? बरं तरीही करायचाच असेल तर मग त्या भाषेचा पुरेपूर अभ्यास का करू नये?
मराठी भाषा दिनानिमित्त मी फेसबुक वर अनेक अशा पोस्ट पाहिल्या होत्या, “आणिला आनि आणि पाणीला पानी म्हणणाऱ्यांनाही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!” बोलताना भाषेतल्या शब्दरचना जरी बदलल्या तरी आपल्याला काय बोलायचे आहे, ते समोरच्यांना बरोबर कळतं आणि मुळात यासाठीच भाषेची उत्पत्ती झाली आहे. पण आपल्याला त्यातली समज आहे. आपण आपल्या भाषेबद्दल किती एकनिष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी दुसऱ्याला हिणवतो, त्याला लाजवतो? पण या सगळ्या गोष्टींचा ते कदाचित आसुरी आनंद घेत असावेत बहुदा.
नट आणि भाषा हे एक समीकरण आहे. पण माझ्यामते नटाने भाषेच्या शब्दरचनेत न अडकता त्या वाक्याच्या मधला आशय पोहचविण्यावर विचार आणि काम करावं, म्हणूच तर नाटक या माध्यमाची निर्मिती झाली. नाटक हे दृक-श्राव्य प्रकार आहे. भाषेच्या मर्यादा पार करून अभिनय आणि त्यातील बारकावे याचा अभ्यास हेच नटाचे प्रथम काम आहे असे मला वाटते.
हे सगळं वाचताना काही भाषापंडित ह्यातल्या व्याकरणाच्या चुकाही शोधत असतील. मी व्याकरणामध्ये कधीच विचार करू शकलो नाही.
– अंकुर विठ्ठलराव वाढवे
“The Focus” च्या डिसेंबर 2021 च्या अंकातून साभार
Leave a Reply